झेंडू- टोमॅटो- दोडका पीक पद्धतीतून समृद्धी

निमज (ता. संगमनेर, जि. नगर) येथील तुकाराम गुंजाळ यांच्या एकत्रित परिवाराने १२ एकरांत झेंडू- टोमॅटो- दोडका या बारमाही पीकपद्धतीतून शेती व कौटुंबिक समृद्धी मिळवली आहे.
झेंडूच्या शेतीचा आकर्षक प्लॉट.
झेंडूच्या शेतीचा आकर्षक प्लॉट.

निमज (ता. संगमनेर, जि. नगर) येथील तुकाराम गुंजाळ यांच्या एकत्रित परिवाराने १२ एकरांत झेंडू- टोमॅटो- दोडका या बारमाही पीकपद्धतीतून शेती व कौटुंबिक समृद्धी मिळवली आहे. शेतीला प्रयोगशाळा समजून नव्या तंत्रांचा कुशलतेने वापर करताना बाजारपेठांचाही चांगला अभ्यास करून शेती प्रगल्भ केली आहे.   नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यातील शेतकरी अलीकडील काळात व्यावसायिक शेतीत कुशल झाला आहे. दोन्ही तालुके आता टोमॅटोचे हब झाले आहेत. निमज (ता. संगमनेर) येथे गोपीनाथ, उत्तमराव, तुकाराम व देवराव या चार गुंजाळ भावांचा एकत्रित परिवार आहे. त्यात एकूण २५ सदस्य आहेत. उत्तमराव पोलिस खात्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. गोपीनाथ नोकरी करतात. तर देवराम व तुकाराम पूर्णवेळ शेती करतात. परिवारातील संदीप, राजेंद्र, दीपक, किरण या नव्या पिढीने शेतीची संपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे. स्मार्ट पीकपद्धती

  • पूर्वी गुंजाळ पारंपरिक पिके, ऊस घेत. मात्र उत्पन्न आणि खर्च यातील तफावत परवडणारी नव्हती. तेरा वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली दोन एकरांत ठिबकचा वापर करून तांत्रिक पद्धतीने तीन पीक पद्धतीचा प्रयोग सुरू केला. तो यशस्वी होऊ लागल्याने टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली.
  • आज बारा एकरांत झेंडू- टोमॅटो- दोडका अशी पीकपद्धती. यातील प्रत्येक पीक १२ एकरांवर.
  • मेमध्ये नांगरणी. त्यानंतर एकरी सहा ट्रॅक्टर शेणखत व कोंबडी खताचा वापर करून
  • पाच जूनच्या सुमारास झेंडू लागवड. (१२ एकरांत). एकरी आठ हजार रोपे लागतात.
  • झेंडूची काढणी झाल्यावर १० ऑक्टोबरच्या दरम्यान टोमॅटो लागवड. (१२ एकरांत)
  • टोमॅटो काढणी ७० ते ७५ टक्के आटोपताना त्याच जागेत दोडक्याची लागवड.
  • टोमॅटो प्लॉट संपलेला असताना दोडका सुरू होतो.
  • दोडका संपल्यानंतर मेमध्ये पुन्हा मशागत व पीकपद्धतीचे चक्र सुरू
  • उत्पादन व विक्री व्यवस्था झेंडूचे एकरी १० ते १२ टनांपर्यंत उत्पादन मिळते. श्रावण व गणपती काळात फुले येत असल्याने किलोला २५ रुपयांच्या दरम्यान दर मिळतो. टोमॅटो एकरी ४० टनांच्या पुढे उत्पादन मिळते. दोडक्यास किलोला किमान ३० रुपये व कमाल ६० रुपयांपुढे दर मिळाला आहे. राज्यभरात कोणत्या भागात किती लागवड आहे, कोणत्या मार्केटमध्ये बाजार कसा राहील याची माहिती तुकाराम घेतात. तोडणी सुरू झाल्यानंतर ज्या बाजारात दर चांगला आहे तेथे माल पाठवतात. टोमॅटो संगमनेर, सुरत, नारायणगाव, मुंबई, दादरला पाठवतात. झेंडूला गुजरातेतील भावनगर, सुरत येथे अधिक दर मिळतो. दोडका सुरतला सर्वाधिक पाठवतात. अलीकडे चाकण, संगमनेर. अकोले येथे विक्री करतात. मागील वर्षीपासून गुंजाळ यांनाही कोरोना संकटाचा फटका सहन करावा लागला. दोन वर्षांपूर्वी टोमॅटोला जिथे ६० रुपये प्रति किलो दर मिळाला होता, त्याची यंदा तीस ते पस्तीस रुपये दराने विक्री करावी लागली. शेतीची वैशिष्ट्ये

  • माउली फार्म नावाने गुंजाळ परिवाराची शेती प्रसिद्ध झाली आहे.
  • तुकाराम सांगतात की मी निवडलेली तीन पिके अशी आहेत की
  • प्रत्येकाचे हार्वेस्टिंग दीड ते दोन महिने चालते. त्यामुळे एका टप्प्यात दर मिळाला नाही, तर दुसऱ्या टप्प्यात तो मिळतो.
  • झेंडू बाजारात आणण्याचे ‘टायमिंग’ असे असते, की अन्य ठिकाणाहून खूप आवक त्या वेळी असणार नाही. टोमॅटोची देखील थंडीत रोपे वाढवून जानेवारीत प्लॉट सुरू होतो. त्या काळात अन्यत्र आवक कमी असल्याने दरांत फायदा होतो.
  • तीनही पिकांत गादीवाफा, पॉली मल्चिंग यांचा वापर. त्यातून तणनियंत्रण.
  • द्रवरूप शेणस्लरी देण्यासाठी ९०० लिटर क्षमतेचा टॅंक घेतला आहे. शेण व देशी गोमूत्र त्यासाठी बाहेरून विकत घेण्यात येते. कुजवलेले शेणखत वापरल्याने त्याचा रिझल्ट दिसतो.
  • मे महिन्यात शेतीला महिनाभर विश्रांती देण्याचा बारा वर्षांपासून नियम आहे.
  • किडींना रोखण्यासाठी चार सोलर ट्रॅप्स शेतात बसवले आहेत. फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चॉकलेटसारखी असणरी वडी, वायर व ती टांगून ठेवण्याचे तंत्र वापरतात. बारा एकरांत
  • अशा शंभर वड्यांचा वापर.
  • सन २००९ मध्ये एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले. दोन विहिरी आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर. पाणी सुरू असताना वीज गेल्यास उपाय म्हणून डिझेल संच.
  • शेतकऱ्यांच्या भेटी गुंजाळ यांच्या शेतीला विविध भागांतील शेतकरी, विद्यार्थी व अभ्यासक भेटी देतात. चहा, नाश्‍ता, जेवण व प्रसंगी राहण्याची सोयही गुंजाळ परिवार करतो. यापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, पाशा पटेल, इंद्रजित थोरात, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, यांच्या देश- परदेशातील अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. गेल्या वर्षीपासून कोरोना संकटामुळे भेटी थांबल्या आहेत. तुकाराम ‘सोशल मीडिया’द्वारेही मार्गदर्शन करतात.

    प्रतिक्रिया  आपले मन पॉझिटिव्ह ठेवून शेती केली पाहिजे. शेती परवडत नाही हा नकारात्मक विचार मनात येऊन उपयोगाचे नाही. हवामान, बाजारपेठांचा अभ्यास व उत्पादन खर्चात बचत होईल असे नियोजन करूनच पीक निवड हवी. -तुकाराम गुंजाळ, ७०३८०३३०००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com