Choose the right breed for cultivation of gladiolus
Choose the right breed for cultivation of gladiolus 
फूल शेती

ग्लॅडिओलस लागवडीसाठी निवडा योग्य जात

डॉ. मोहन शेटे, डॉ. सुनील काटवटे, डॉ. विनय सुपे

ग्लॅडिओलस फुलांना जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत चांगली मागणी असते. चार ते सहा महिन्यांच्या अल्प काळात या फुलपिकांपासून भरपूर नफा मिळण्याची शक्‍यता असली तरी या पिकाची शास्त्रशुद्ध लागवड, योग्य जातींच्या कंदांची उपलब्धता आणि रोग व किडींचे वेळीच नियंत्रण या बाबींवर सर्व काही अवलंबून असते. कंदवर्गीय फुलपिकांपैकी ग्लॅडिओलस हे एक व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे फुलपिक समजले जाते. मूळचे दक्षिण आफ्रिकेतील, परंतु जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये याची लागवड केली जाते. भारतात दिल्ली, कोलकता, मुंबई, बेंगलोर आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या परिसरात याची लागवड केली जाते. ग्लॅडिओलसच्या लांब दांड्यावर असणारी आकर्षक रंगाची फुले फुलदाणीत ठेवल्यास सात ते आठ दिवस क्रमाने उमलतात. हवामान

  • कडक उन्हाळा आणि सतत व जोरदार पावसाचा कालावधी वगळता वर्षभर ग्लॅडिओलस पिकाची लागवड करता येते. तरीही खरीप आणि रब्बी हेच दोन हंगाम प्रमुख समजले जातात.  
  • सरासरी २० अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअस तापमानात या पिकाची वाढ चांगली होऊन फुलांचे रंगही चांगले येतात. महाबळेश्‍वरसारख्या ठिकाणी उन्हाळा सौम्य असल्यामुळे हे पीक चांगले येते आणि या कालावधीत फुलांचा तुटवडा असल्याने बाजारभावदेखील चांगले मिळतात.  
  • वर्षभरातील बाजारभाव व फुलांची मागणी यांचा विचार करून संपूर्ण पिकाची एकाच वेळी लागवड न करता १५ ते ३० दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने केल्यास फुलांना बाजारभाव चांगला मिळू शकतो.
  • जमीन

  • मध्यम ते भारी प्रतीची, परंतु पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी जमीन या पिकास मानवते.  
  • चोपण, खारवट तसेच चुनखडीयुक्त जमीन या पिकास मानवत नाही. सर्वसाधारण जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.
  • जाती

  • ग्लॅडिओलसच्या ३० हजारांहून अधिक जाती आहेत. दरवर्षी यात नवीन जातींची भर पडतच असते. व्यापारीदृष्ट्या लागवडीसाठी योग्य जातींची निवड करणे फार महत्त्वाचे आहे.  
  • उत्तम प्रतीच्या जातीच्या निकषामध्ये फुलांचा आकर्षक रंग, फुलदांड्यावरील एकूण फुलांची संख्या, कमीत कमी १४ असावी. त्या जातीची कीड व रोगप्रतिकारक आणि उत्पादन क्षमता चांगली असावी आणि महत्त्वाचे म्हणजे ती जात आपण ज्या हवामानात लावणार आहोत, त्या ठिकाणी चांगली येणारी असावी. कारण परदेशात आणि भारतात विविध ठिकाणी संकरीत जातींची निर्मिती केली जाते.  
  • परंतू सर्वच जाती सर्व ठिकाणी चांगल्या येऊ शकतील असे नाही. याकरिता कोणत्याही जातीची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याअगोदर त्याबद्दलची तांत्रिक माहिती घेणे आणि शक्‍यतो थोड्या क्षेत्रावर लागवड करून खात्री करून घेणे हितावह ठरते.  
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय समन्वित पुष्पसुधार प्रकल्प, गणेशखिंड, पुणे येथे परदेशातील व भारतातील ग्लॅडिओलसच्या विविध जातींचा तुलनात्मक अभ्यास करून व काही संकरित जातींची निर्मिती करून निवड करण्यात आली आहे. त्यांची थोडक्‍यात माहिती खालील तक्‍त्यात दिली आहे.
  • लागवडीसाठी बेणे

  • किफायतशीर उत्पादनासाठी योग्य जातींची निरोगी आणि विश्रांती पूर्ण झालेल्या कंदांची निवड करून कॅप्टन बुरशीनाश ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळलेल्या द्रावणात लागवडीसाठी शक्‍यतो ४ सेमी अथवा त्याहून अधिक व्यास असलेले कंद निवडावेत.  
  • सरी, वरंबा, सपाट वाफे किंवा गादी वाफे पद्धतीने करता येते. सपाट अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड करायवाची असल्यास दोन ओळीत अंतर ३० सेमी व दोन कंदातील अंतर १५ ते २० सेमी ठेवून करावी.  
  • पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने लागवडीनंतर पिकांमध्ये कामाच्या सुलभतेच्या दृष्टीने फुलदांडे सरळ येण्यासाठी आणि फुले येऊन गेल्यावर कंदांचे योग्य पोषण होण्यासाठी सरी वरंबे पद्धतीने लागवड करणे फायदेशीर ठरते. अशा पद्धतीने लागवड करताना दोन सरीतील अंतर ४०-४५ सेमी व दोन कंदातील १० ते १५ सेमी ठेवून लागवड केली असता हेक्‍टरी सव्वा ते दीड लाख कंद पुरेसे होतात.
  • ग्लॅडिओलसच्या विविध जाती.

     जातीचे नाव फुले येण्यास  लागणारे दिवस फुलदांड्यावरील  फुलांची संख्या फुलांचा रंग
    संसरे  ७७ १७-१८ पांढरा
    यलोस्टोन ८० १५-१६ पिवळा
    ट्रॉपिक सी ७७    १३-१४  निळा
    फुले गणेश ६५  १६-१७ फिकट पिवळा
    फुले प्रेरणा ८०  १४-१५  फिकट गुलाबी
    सुचित्रा ७६  १६-१७ फिकट गुलाबी
    नजराणा ८१ १३-१४ गर्द गुलाबी
    पुसा सुहागन ८४ १३-१४ लाल
     हंटिंग साँग  ८० १४-१५ केशरी
    सपना ५९ १३-१४ पिवळसर सफेद
    व्हाईट प्रॉस्पॅरिटी  ८१  १५-१६ पांढरा

    संपर्कः डॉ. मोहन शेटे, ०२०-२५६९३७५० सहयोगी संशोधन संचालक (मैदानी प्रदेश) गणेशखिंड, पुणे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT