भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन 
फळभाज्या

भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

भेंडीवर प्रामुख्याने ठिपक्‍यांची बोंड अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, घाटे अळी, मावा, तुडतुडे, व पांढरी माशी या किडींचा अधिक प्रादुर्भाव होतो. त्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता असते.

वैभव गिरी, संजय बडे

वर्षभर मागणी असलेले भेंडी हे महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भेंडीवर प्रामुख्याने ठिपक्‍यांची बोंड अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, घाटे अळी, मावा, तुडतुडे, व पांढरी माशी या किडींचा अधिक प्रादुर्भाव होतो. त्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता असते. केवळ रासायनिक कीडनाशकांचा वापर करत राहिल्यास कीडनाशकांचे अंश पिकामध्ये शिल्लक राहण्याची शक्यता असते. त्याच प्रमाणे कीडीमध्ये कीटकनाशकांविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होऊन पुढे नियंत्रण अवघड होत जाते. १) ठिपक्‍यांची बोंड अळी ः ही कीड कोवळा शेंडा, फळांचे नुकसान करते. अळी सुरुवातीला झाडाचा शेंडा पोखरते, त्यामुळे शेंडा वाळून जातो. नंतर अळी कळ्या व फळामध्ये शिरून तेथे नुकसान करते. कळ्या व फुले परिपक्व न होताच गळून पडतात. प्रादुर्भावग्रस्त झाडावरील फळे वाकडी होतात. त्यावर अळीने केलेले छिद्र आणि विष्ठा दिसते. अशी फळे खाण्यायोग्य नसतात.

  •  किडीची अळी तपकिरी रंगाची असून शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात.
  •  किडीची कोषावस्था वाकड्या फळांवर, पानांखाली पूर्ण होते. पतंगाचे पंख हिरव्या रंगाचे आणि त्यावर पांढरे चट्टे असतात.
  •  किडीची मादी निळसर रंगाची असून कोवळा शेंडा, कळ्या आणि फळांवर अंडी घालते.
  • २) घाटे अळी ः

  •  ही कीड भेंडीशिवाय कापूस, हरभरा, तूर, टोमॅटो, ज्वारी इत्यादी अनेक पिकांवर उपजीविका करते.
  •  अळी सुरुवातीला पाने खाऊन नंतर फळे पोखरते. मादी कोवळा शेंडा, कळ्या, फळांवर पिवळसर पांढरी अंडी घालते. नंतर अळी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते.
  •  अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या कोवळ्या भेंडीमध्ये शिरून आतील भाग खाते. फळे वेड्यावाकड्या आकाराची होतात.
  • ३) तंबाखूवरील पाने खाणारी अळी ः

  • ही बहुभक्षी वर्गातील कीड असल्यामुळे वर्षभर या किडीचा प्रादुर्भाव शेतात दिसून येतो. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.- अळी सुरुवातीला पाने व नंतर फळे खाते. अळ्या अतिशय खादाड असून फळे कुरतडून खाते.
  •  किडीची मादी पानाच्या पाठीमागे पुंजक्‍यात अंडी घालते. किडीची कोषावस्था जमिनीत पूर्ण होते.
  • ४) मावा ः

  •  माव्याचा रंग काळा पिवळसर किंवा गोलाकार असून पाठीवर मागील बाजूस सूक्ष्म अशा दोन नलिका असतात.
  •  पानाच्या खालील बाजूस व कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात.
  •  मावा शरिरातून गोड चिकट द्रव टाकते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत अडथळा येतो.
  • ५) तुडतुडे ः

  •  ही भेंडीवरील सर्वांत महत्त्वाची रस शोषण करणारी कीड आहे. तुडतुडे कायम तिरके चालतात, हे या किडीचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे.
  •  तुडतुडे पाचरीच्या आकाराचे व हिरवट पिवळ्या रंगाचे असून पंखांवर काळे ठिपके असतात.
  •  किडीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस राहून त्यातील रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पाने आकसतात व कडा तपकिरी होतात. झाडाची वाढ खुंटते.
  • ६) पांढरी माशी ः

  •  ही रस शोषक कीड असून ती विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते.
  •  प्रौढ माशी आकाराने लहान असून पंख पांढुरके असतात. शरीरावर पिवळसर झाक, डोक्यावर मध्यभागी दोन तांबडे ठिपके असतात.
  •  पिलांचा रंग फिक्कट पिवळा किंवा पिवळा असतो. ते एका ठिकाणी स्थिर राहतात.
  •  माशीचे प्रौढ व पिले पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात. पिले शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे पाने चिकट होऊन त्यावर बुरशीची वाढ होते. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत अडथळा येतो. परिणामी झाडांची वाढ खुंटते.
  • एकात्मिक व्यवस्थापन ः

  •  उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील सुप्तावस्थेत असलेल्या किडी पृष्ठभागावर येऊन उन्हामुळे किंवा पक्ष्यांनी खाऊन नष्ट होतील.
  •  शेतात पिकाची फेरपालट करावी.
  •  भेंडी पिकामध्ये सापळा पीक म्हणून मका पिकाची लागवड करावी. मका पिकावर बसणारे पक्षी अळ्या वेचून खातात. त्यामुळे नैसर्गिकरीत्या किडींचे नियंत्रण होते.
  •  पांढऱ्या माशीचे स्थलांतर रोखण्यासाठी ज्वारी, बाजरी, मका यांसारख्या उंच वाढणाऱ्या पिकांची भेंडीच्या शेताभोवती लागवड करावी.
  •  सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी झेंडूचे आंतरपीक घ्यावे.
  •  खतांच्या शिफारशीत मात्रा द्याव्यात. नत्र खतांचा अतिरिक्त वापर करू नये.
  •  फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे व मावा किडींसाठी पिवळे आणि निळ्या रंगाचे सापळे हेक्टरी २५ ते ३० प्रमाणे लावावेत. पिकाच्या उंचीपेक्षा १ फूट उंचीवर सापळे लावावेत. तसेच हेक्टरी २५ ते ३० पक्षिथांबे उभारावेत. त्यावर पक्षी बसून अळ्या टिपून खातील.
  •  किडींच्या सर्वेक्षण आणि नियंत्रणासाठी प्रकाश सापळे हेक्टरी १ याप्रमाणे वापरावेत.
  •  ठिपक्याची अळी व घाटे अळी यांच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे १० आणि नियंत्रणासाठी २५ हेक्टरी याप्रमाणे वापरावेत. कामगंध सापळ्यांचा वापर केल्याने किडीची आर्थिक नुकसानीची पातळी समजते. त्यामुळे प्रतिबंधात्मक फवारणी घेण्याचे नियोजन करणे शक्य होते.
  •  सुरुवातीच्या अवस्थेत रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळावा. त्यामुळे ढालकिडा, क्रायसोपा, सिरफिड माशी, भक्षक ढेकूण या मित्र कीटकांचे संरक्षण होते. हानिकारक किडीचे नैसर्गिकरीत्या व्यवस्थापनास मदत होते.
  •  घाटे अळी किंवा ठिपक्यांच्या अळीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामाची अंडी एकरी ५० हजार प्रमाणे सोडावीत.
  •  घाटे अळीच्या नियंत्रणासाठी, एचएएनपीव्ही (५०० एलई) २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे सायंकाळी फवारणी करावी.
  •  प्रादुर्भावग्रस्त झाडांचे शेंडे, कीडग्रस्त फळे, अळ्या, भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत.
  •  फळ पोखरणारी अळी, हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा, पाने खाणारी अळी, स्पोडोप्टेरा लिट्युरा यांच्या नियंत्रणासाठी बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • रासायनिक नियंत्रण ः (फवारणी ः प्रतिलिटर पाणी) १) घाटे अळी किंवा ठिपक्याची अळी ः इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.३ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ०.३ मिलि किंवा क्लोरपायरिफॉस (२० टक्के ईसी) १ मिलि किंवा प्रोफेनोफॉस (५० टक्के ई.सी.) १.५ मिलि किंवा स्पिनोसॅड (४५ टक्के एस.सी.) ०.२ ग्रॅम २) पांढरी माशी, मावा व तुडतुडे ः ॲसिटामीप्रीड (२० टक्के एस.पी.) ०.४ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के एस.एल.) ०.५ मिलि किंवा डायमिथोएट (३० टक्के ई.सी.) १.५ मिलि (टीप ः रासायनिक कीटकनाशकाची फवारणी किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर करावी. वारंवार एकाच कीटकनाशकाची फवारणी करू नये. कीडनाशकांची फवारणी आलटून पालटून करावी.) (वरील कीटकनाशकांना ॲग्रेस्को शिफारस आहे.) - वैभव गिरी, ९१४६४१२२१० (वैभव गिरी हे रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय, पिंपरी, जि. वर्धा येथे कीटकशास्त्र विभागत, तर संजय बडे हे दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे कार्यरत आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Santosh Kakde: चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे विभागात अव्वल 

    Agriculture Scheme: जुनी विहीर दुरुस्तीसाठी १ लाखांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

    Farmer loan Waiver: कर्जमाफीसाठी मुंबई एकदिवस बंद करा; बच्चू कडू यांची राज ठाकरेंकडे मागणी 

    Forest Encroachment: वनजमिनीवर अतिक्रमणकर्त्यांवर फौजदारी

    Ambajogai KVK: अंबाजोगाई केव्हीकेमध्ये ‘किसान गोष्टी’

    SCROLL FOR NEXT