पेरू हे बहुवार्षिक फळपीक असून, त्याला वर्षभर फुले येत असतात. मात्र, फळांच्या योग्य आकार व गुणवत्ता मिळण्यासाठी बहर धरणे आवश्यक असते. बहर धरल्यामुळे पोषणाचे व्यवस्थापन करता येते. फळे एकाच वेळी काढणीला आल्याने त्याचे नियोजन सोपे होते. बियांपासून केलेल्या रोपांची लागवड केल्यास उत्तम दर्जाची पेरू फळे मिळण्यासाठी साधारणतः ४-५ वर्षे लागतात. मात्र, शाखीय पद्धतीने, कलमांपासून तयार केलेल्या रोपांची लागवड केल्यास २ ते ३ वर्षांतच फळधारणा होते. पेरूमध्ये पाणी व खताचे व्यवस्थापन योग्य रीतीने करून बहर धरावा. पेरू लागवड करताना खड्ड्यामध्ये कुजलेले शेणखत १५-२० किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट १.५ किलो द्यावे. १ वर्षाच्या झाडाला १०० ग्रॅम नत्र (युरिया २१७ ग्रॅम), स्फुरद ४० ग्रॅम (एस.एस.पी. २५० ग्रॅम), आणि पालाश १०० ग्रॅम (एम.ओ.पी. १६६ ग्रॅम.) द्यावे. पावसाळ्याच्या सुरुवातीला नत्र आणि पालाश यांची अर्धी मात्रा द्यावी. त्यानंतर सप्टेंबर मध्ये अर्धी मात्रा द्यावी. स्फुरदाची संपूर्ण मात्रा पायाभूत स्वरूपात द्यावी. पहिले तीन वर्ष पेरू बागेत कडधान्ये पिकांचे आंतरपीक घेता येते. बागेचे वय वाढत जाताना ५ वर्षापर्यंत प्रत्येक वर्षाला नत्र, स्फुरद आणि पालाश १००:४०:१०० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणे वाढवून द्यावे. नत्र आणि पालाशची मात्रा पावसाळ्याच्या सुरुवातीला व सप्टेंबरमध्ये दोन वेळी विभागून द्यावी. स्फुरदाची संपूर्ण मात्रा पायाभूत स्वरूपात द्यावी. मातीच्या परिक्षणानुसार खतांच्या मात्रांमध्ये योग्य ते बदल करावेत. पावसाळ्यामध्ये हिरवळीचे खत ताग, मुंग, चवळी घेऊन, ते गाडल्यास त्यातून सेंद्रिय कर्ब आणि नत्राची उपलब्धता होते. पूर्ण वाढ झालेल्या पेरूच्या प्रतिझाडासाठी ताण सोडताना बहाराच्या वेळी ४०-५० किलो शेणखत, ४५० ग्रॅम नत्र (९७८ ग्रॅम युरिया), ३०० ग्रॅम स्फुरद (१८७५ ग्रॅम एस.एस.पी.) आणि ३०० ग्रॅम पालाश (५०० ग्रॅम. एम.ओ.पी.) द्यावे. उर्वरित ४५० ग्रॅम नत्र मात्रा (९७८ ग्रॅम युरिया) प्रतिझाडास फळधारणेनंतर द्यावी. पालाश मात्रा दोन हप्त्यात विभागून देखील देऊ शकतो, अर्धी मात्रा पावसाळ्याच्या सुरुवातीला (बहराच्या वेळी) व अर्धी मात्रा सप्टेंबर मध्ये (फळधारणेनंतर) द्यावी. खतांची मात्रा देताना मुख्य खोडाभोवती ३० सें.मी. त्रिज्येच्या अंतरावर १५-२० सें.मी. खोलीवर बांगडी पद्धतीने हलका चर खोदावा. त्यात खतांची मात्रा देऊन खत २-३ सें.मी. मातीच्या साह्याने मातीआड करावे. खताची मात्रा दिल्यानंतर त्वरित हलक्या स्वरूपात पाणी द्यावे. मातीमध्ये विविध अन्नद्रव्यांच्या कमतरता असल्यास त्याची लक्षणे पानांवर दिसून येतात. या लक्षणाप्रमाणे अधिक पेरू उत्पादनासाठी खतांच्या शिफारशीत मात्रेबरोबर पाण्यात विरघळणारे खतांची फवारणीही करता येते.
पेरूसाठी १ ते २ टक्के (१० ते २० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) युरियाची वर्षातून २ वेळा फवारणी केल्यास किफायतशीर ठरते. पहिली फवारणी मार्च महिन्यात तर दुसरी फवारणी फळ विकास काळात (ऑक्टोबर) करू शकतो.
पेरू झाडामध्ये वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे दिसतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेच्या लक्षणानुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचे नियोजन करावे. पेरूचे उत्पादन फळधारणा, फूल आणि फळांची गळ, फळाची लांबी, रुंदी, आकार, वजन इ. घटकांवर अवलंबून असते. फुलधारणा क्षमता, फळ राखून ठेवण्याची क्षमता (फळगळ नियंत्रण) हे अन्नद्रव्यांची उपलब्धता विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. बोरॉन घटकांची आवश्यकता ः फळधारणा व फळगळ या प्रामुख्याने बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याशी संबंधित असते. बोरॉन हा घटक कर्बोदके आणि ऑक्सिन संप्रेरकाचे वहनासाठी उपयुक्त मानला जातो. फुल आणि फळधारणा होण्यासाठी राखीव कर्बोदकांचा संग्रह उपयुक्त असतो. जिथे अन्ननिर्मितीची प्रक्रिया होते, त्यास इंग्रजीमध्ये ‘सिंक’ असे म्हणतात. अन्ननिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांच्या वहनाचे कार्य बोरॉन हा घटक करतो. बोरॉनमुळे परागकणांची फलनक्षमता वाढते परिमाणी फुलधारणा वाढून फळगळीचे प्रमाण कमी होते. बोरॉनमुळे पेशींच्या भित्तिकांची भेद्यता वाढते (इंग्रजीमध्ये याला परमियाबिलिटी असे म्हणतात) व पाणी या घटकाची वाढ होऊन परिणामी फळाच्या आकार आणि वजनात वाढ होते. याशिवाय बोरॉन फळांच्या आकार वाढीसाठी आवश्यक असलेल्या पेशी विभाजन आणि पेशी वृद्धीसाठी अप्रत्यक्षरित्या संबंधित असल्याचे मानले जाते. या काळात बोरॅक्स (०.५ टक्के) किंवा बोरिक ॲसिड (०.२ टक्के) फवारण्या उपयुक्त ठरतात. पहिली फवारणी फुलधारणेच्या अगोदर (ऑगस्टचा पहिला आठवडा) आणि व नंतरच्या फवारण्या फळ विकास काळात गरजेनुसार १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात. झाडाला फळे येण्यास सुरुवात झालेल्या बागेसाठी फळांच्या विकास काळाच्या दरम्यान झिंक सल्फेट ४ ग्रॅम, बोरिक ॲसिड २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे पाण्यातून फवारणी करू शकतो. युरिया (२ टक्के) फवारणीही उपयुक्त ठरते. अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे दिसताच पुढील प्रकारे उपाययोजना कराव्यात. नत्र - १५ दिवसाच्या अंतराने युरिया १-२ टक्के (१० ते २० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी. स्फुरद - १५ दिवसाच्या अंतराने डी.ए.पी. २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी. पालाश - १५ दिवसाच्या अंतराने पोटॅशिअम सल्फेट २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी. मॅग्नेशिअम - १५ दिवसाच्या अंतराने मॅग्नेशिअम सल्फेट २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी. सल्फर - जिप्सम १०० किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. बोरॉन - १५ दिवसाच्या अंतराने बोरॅक्स ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी. पाण्यात विरघळणाऱ्या खतांचे पानांद्वारे चांगले शोषण होण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारसीत मात्रेनुसार स्प्रेडरचा वापर करावा. डॉ. पी. ए. साबळे , ८४०८०३५७७२ (सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, के. व्ही. के, सरदारकृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, साबरकांठा, गुजरात.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.