Promotion of Animal Husbandry Department
Promotion of Animal Husbandry Department Agrowon
कृषी पूरक

Wild Life Research : वन्यजीवांवर होणार नागपुरात संशोधन

टीम अॅग्रोवन.

नागपूर ः ‘वन हेल्थ कॉन्सोर्शियम’अंतर्गत केंद्र शासनाने (Central Govt) मानवी आणि पशू आजारांसाठी देशभरात तब्बल २८ केंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यातील १८ पशू संशोधन प्रशिक्षण केंद्र आणि ८ केंद्र ही मानवी आरोग्याशी (Human Health) संबंधित संशोधनासाठी आहेत. यातील वन्यजीवांशी (Wild Life) संबंधित एकमेव वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला मंजूर करण्यात आले आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या परिसरातून या केंद्राचे कामकाज चालेल. यामुळे ‘माफसू’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

पशुंपासून मानवाला तब्बल ३५ टक्‍के आजार होतात. त्या पार्श्‍वभूमीवर मानवी आणि पशूंच्या आजारावर संशोधनाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्याकरिता देशभरात नव्या संशोधनात्मक २८ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील १८ केंद्र ही पशुवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत.

एनआयबी हैदराबाद, भारतीय पशू संशोधन संस्था यासह देशभरातील नामांकित संशोधन संस्थांवर त्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पाळीव जनावरांच्या संबंधित नमुने घेणे, त्यांचे पृथ्थकरण करणे आणि त्यानुसार उपचार पद्धतीची शिफारस करणे असे या केंद्रातून अपेक्षित आहे.

पशूंप्रमाणेच मानवी आरोग्याकरिता देखील नव्याने आठ केंद्र मंजूर केली आहेत. दिल्लीतील एम्स, आयआयएम या सारख्या नामांकित संस्थांवर त्याची जबाबदारी आहे. या ठिकाणी देखील मानवी आरोग्याशी संबंधित आजार, नमुने व त्याचे पृथ्थकरण अशी प्रक्रिया होणार आहे. या सर्वांमध्ये वन्यजीव संशोधनाशी संबंधित एकमेव केंद्र प्रस्तावित करण्यात आले होते.

हे केंद्र आपल्याला मिळावे, याकरिता देशभरातील अनेक संस्थांनी प्रयत्न चालविले होते. परंतु यामध्ये नागपूरस्थित महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने बाजी मारली. या केंद्राकरिता आवश्‍यक वनविभागासह इतर विभागाच्या परवानग्या मुदतीत मिळविण्यात ‘माफसू’ यशस्वी ठरल्याने केंद्र सरकारने वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र ‘माफसू‘ला मंजूर केले. या केंद्रासाठी ६३ लाख ५० हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

गोरेवाडा प्राणी संग्रहालयातून या केंद्राचे कामकाज चालेल. या केंद्राकरिता मनुष्यबळ ‘माफसू’चे राहील. तर संसाधन हे महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून उभारून दिले जाईल. प्राणिसंग्रहालय किंवा जंगलातील वन्यजीव आजारी किंवा पडल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रक्‍त, लघवी व विष्ठेचे नमुने घेत त्याचे पृथ्थकरण करण्यात येईल. त्याआधारे जंगलातील इतर प्राण्यांमध्ये तशाप्रकारचे आजार बळावण्याची शक्‍यता पाहता त्याप्रमाणे उपाययोजनांवर भर दिला जाईल. जंगलालगतच्या पशूंची देखील अशाचप्रकारे काळजी घेतली जाईल.

‘उपचारांसाठी विशिष्ट कार्यप्रणाली’

वन्यजीवांवर उपचार करणे जोखमीचे असते. त्याकरिता विशिष्ट कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. वन्यजीव संशोधन व प्रशिक्षणाचे केंद्र ‘माफसू‘ला मिळाल्याने आंतरवासीता (इंटर्नशिप) करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट वन्यजीवांवर उपचार करणे शक्‍य होणार आहे.

देशभरातील २७ केंद्रे एकमेकांशी जोडण्यात येतील. या केंद्रांमार्फत एकाचवेळी प्राणी प्रसारित दहा महत्त्वाचे आजार आणि सहा सीमापार मानव, पाळीव प्राणी आणि वन्य प्राण्यांमधील आजारांच्या प्रादुर्भावाची तपासणी होईल. तसेच उपाययोजना सुचवल्या जातील. यासाठी निधी आणि दोन कनिष्ठ संशोधन फेलो नियुक्‍त केले आहेत.

- डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक,

वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT