डॉ. प्रणाली सुपेकर, डॉ. प्रेरणा घोरपडे
Goat PPR Disease : पीपीआर हा एक विषाणूजन्य आजार आहे. हा आजार शेळी आणि मेंढ्यांमध्ये दिसतो. हा विषाणू कळपामध्ये ९० टक्यांपर्यंत संक्रमित होऊ शकतो. पीपीआर आजारामुळे अचानक उदासीनता, ताप, डोळे आणि नाकातून स्राव, तोंडात फोड येणे, श्वासोच्छ्वासास अडथळा आणि खोकला, दुर्गंधीयुक्त अतिसार आणि मृत्यू ही लक्षणे दिसतात. यावर उपचारासाठी प्रभावी लाइव्ह अॅटेन्युएटेड पीपीआर व्हायरस लस प्रमाणावर उपलब्ध आहेत. पीपीआर विषाणू मनुष्यामध्ये संक्रमित होत नाही.
‘पीपीआर’चा प्रसार ः
१) संसर्गाचा मुख्य मार्ग म्हणजे श्वसन. पीपीआर हा हवेतील थेंबांद्वारे पसरतो. संक्रमित प्राण्यांचे सर्व स्राव आणि उत्सर्जन आजाराच्या संपूर्ण कालावधीत सांसर्गिक असतात.
२) पीपीआरमुळे गरोदर माद्यांमध्ये गर्भपात होतो. पीपीआरने बाधित मादी शेळ्यांमध्ये व्हल्व्हो-योनाइटिस होतो. स्थानिक भागात संसर्ग दिसून येतो.
३) विषाणूच्या नैसर्गिक संसर्गानंतर (उष्मायन कालावधी) सरासरी दोन ते सहा दिवसांनी क्लिनिकल चिन्हे दिसतात. शेळ्या, मेंढ्यांना अचानक ताप येतो. नाक आणि डोळ्यांमधून स्राव येतो.
४) संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात डोळ्यातील श्लेष्मल त्वचा (कंजेक्टिव्हा) लाल होते. डोळ्यातील पुवाळलेला स्राव लक्षात घ्यावा.
५) हिरड्यांवरील मृत पेशी फिकट गुलाबी, राखाडी भाग दिसतात.
६) ओठ सुजलेले असतात. तोंडाभोवती नोड्यूल आढळतात.
नियंत्रणाचे उपाय ः
१) नियंत्रणासाठी एकसंध टिश्यू कल्चर लसींचा वापर करावा. भारतात उपलब्ध लाइव्ह अॅटेन्युएटेड लस ३ ते ४ महिने वयाच्या शेळ्या, मेंढ्यांना दर तीन वर्षांनी द्यावी.
२) प्रादुर्भाव झाल्यास, संक्रमित कळपाच्या आजूबाजूच्या कळपांच्या रिंग लसीकरणाने पीपीआरचा प्रसार मर्यादित होतो.
३) आजारी शेळ्या, मेंढ्यांची योग्य काळजी घ्यावी.
४) पीपीआर विरुद्ध लहान रुमिनंट्सचे संरक्षण करण्यासाठी रिंडरपेस्ट लसीचा वापर करू नये. कारण त्यांची प्रतिपिंडे तयार होतात.
संपर्क ः डॉ. प्रणाली सुपेकर, ७०३९१७९४४०
(पशुधन उत्पादन व व्यवस्थापन विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.