शेळ्यांना हिरव्या चाऱ्यासोबत कोरडा चाराही द्यावा.
शेळ्यांना हिरव्या चाऱ्यासोबत कोरडा चाराही द्यावा. 
कृषी पूरक

स्वच्छता, लसीकरणातून कमी करा शेळ्यांतील रोगांचा प्रादुर्भाव

डॉ. जिशांत नंदेश्‍वर, डॉ. सारीपुत लांडगे

शेळ्यांची सर्वात जास्त काळजी पावसाळ्यामध्ये घ्यावी लागते. पावसाळ्यात वातावरणातील दमटपणा मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे शेळ्यांना विविध प्रकारच्या विषाणूजन्य व जिवाणूजन्य रोगांची लागण होण्याची शक्‍यता असल्याने पावसाळ्यात शेळ्यांची विशेष काळजी घ्यावी.

  •  पावसाळ्यात होणाऱ्या रोगांचे प्रतिबंधात्मक लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करून घेतलेले असावे. त्यामुळे गोठ्यातील मरतुकीचे प्रमाण कमी होते. शेळ्यांना पीपीआर, फऱ्या, आंत्रविषार, घटसर्प, संसर्गजन्य फुफ्फुसदाह या रोगांवर प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले असावे.
  • पावसाळ्यात जंतामुळेसुद्धा विविध आजार होतात व शेळ्यांची वाढ होत नाही. शेळ्या अशक्त राहतात. त्यामुळे शेळ्यांना पावसाळ्यापूर्वी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची मात्रा द्यावी.
  • पावसाळ्यात दमटपणामुळे शेळ्यांच्या अंगावर उवा व गोचीड यासारख्या परोपजिवी कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गोचीड, उवा शेळ्यांच्या शरीरातील रक्त शोषून घेतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात. वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर शेळ्या खंगत जातात. गोचीड, उवांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी शेळ्यांच्या अंगावर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोचीड प्रतिबंधात्मक औषध लावावे.
  • पावसाळ्यात शेळ्यांना बाहेर चरावयास सोडू नये, कारण बाहेरील वातावरण थंड झाल्यामुळे साप, विंचू जमिनीबाहेर निघतात. त्यांच्या चाव्याने शेळ्या मृत्युमुखी पडतात.
  • शेळ्यांना उन्हाळ्यात हिरवा चारा कमी प्रमाणात मिळतो. पावसाळ्यात हिरवा चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे शेळ्या चारा अधाशीपणे खातात. त्यामुळे शेळ्यांना विविध पोटाचे आजार होण्याची शक्‍यता असते. कोवळा चारा खाल्ल्यामुळे शेळ्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला शेळ्यांना बाहेर चरण्यासाठी सोडू नये.
  • पावसाळ्यात उगवलेल्या हिरव्या गवतावर जंतांची अडी असतात. गवतामार्फत जंतांची अंडी शेळ्यांच्या शरीरात प्रवेश करतात. अशा प्रकारे शेळ्यांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव होतो.
  • पावसात भिजल्यामुळे शेळ्यांना फुफ्फुसाचे रोग किंवा न्यूमोनिया होऊ शकतो त्यामुळे पाऊस सुरू असताना शेळ्यांना गोठ्यातच ठेवावे.
  • गोठा रोज व्यवस्थित स्वच्छ करावा व गोठ्यात कुठे पाणी साचू देऊ नये. गोठा कोरडा राहील याकडे लक्ष द्यावे.
  • गोठ्याचे छत गळणारे असेल तर दुरुस्त करून घ्यावे.
  • शेळ्यांना दमट वातावरण सहन होत नाही. त्यामुळे गोठ्यात रात्रभर १०० वॉटचा बल्ब लावावा जेणेकरून गोठ्यातला दमटपणा कमी होण्यास मदत होईल.
  • गोठ्यातील जमीन व्यवस्थित कोरडी करून घ्यावी. जमीन ओलसर असल्यामुळे शेळ्यांना खुरांचे अाजार (फुटरॉट) होण्याची शक्यता असते. ओल्या जमिनीमुळे शेळ्या घसरून पडण्याची भीती असते.
  • गोठ्याच्या भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. गोठ्यातील सर्व फटी बुजवून टाकाव्यात.
  • शेळ्यांचे खाद्य वेगळ्या खोलीत ठेवावे व त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. जेणेकरून खाद्याला बुरशी लागणार नाही.
  • शेळ्यांना स्वच्छ व मुबलक आहार द्यावा. दूषित आहारामुळे आजार होण्याची शक्‍यता असते.
  • घरच्या शेतीमध्ये शेळ्यांसाठी अावश्‍यक चारा पिकाची लागवड करावी. शेतीच्या बांधावार सुबाभूळ, शेवरी यासारखी शेळीला अावडणारी झाडे लावावीत.
  • गाभण शेळीची प्रसूती इतर शेळ्यांपासून दूर, स्वच्छ, कोरड्या ठिकाणी होईल याची काळजी घ्यावी. विलेल्या शेळीला हिरव्या, कोरड्या चाऱ्यासोबत खुराक मिश्रणही द्यावे. करडाला स्वच्छ करुन उबदार ठिकाणी ठेवावे. करडाला जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या अात शेळीचा पहिला चीक पाजावा.
  • शेळ्यांना धनुर्वाताचे इंजेक्‍शन देऊन ठेवावे. धनुर्वात होण्याचे प्रमाण पावसाळ्यातच सर्वात जास्त असते.
  • शेळीमध्ये काही फरक जाणवल्यास किंवा शेळी अाजारी वाटत असल्यास शेळीची पशुवैद्यकाकडून तपासणी करुन घ्यावी. दुर्लक्ष केल्यास सर्व शेळ्यांमध्ये अाजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
  • - पावसाळ्यात पाण्याद्वारे बरेच अाजार होतात त्यामुळे शेळ्यांना स्वच्छ पाणी मिळेल याची काळजी घ्यावी.
  • संपर्क ः डाॅ. सारीपुत लांडगे, ७३५०६८६३८० (लेखक पशुविज्ञान व पशुसंवर्धन विस्तार शिक्षण विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे कार्यरत अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

    Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

    Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

    Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

    Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

    SCROLL FOR NEXT