जनावरांच्या आहारात क्षार मिश्रणाचा योग्य प्रमाणात वापर करावा. 
कृषी पूरक

जनावरांतील किटोसिस टाळण्यासाठी आहार व्यवस्थापन

किटोसिस किंवा कितनबाधा हा आजार विशेषत: जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींमध्ये आढळून येतो. गाय-म्हशी व्यायल्यानंतर पहिल्या २ ते ३ महिन्यांत हा आजार उद्‌भवतो. यामध्ये जनावर सहसा मृत्यूमुखी पडत नाही. परंतु दूध उत्पादनात जवळपास २५ ते ३० टक्के घट येते.

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील,  डॉ. मत्स्यगंधा पाटील 

किटोसिस किंवा कितनबाधा हा आजार विशेषत: जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींमध्ये आढळून येतो. गाय-म्हशी व्यायल्यानंतर पहिल्या २ ते ३ महिन्यांत हा आजार उद्‌भवतो. यामध्ये जनावर सहसा मृत्यूमुखी पडत नाही. परंतु दूध उत्पादनात जवळपास २५ ते ३० टक्के घट येते. परिणामी, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. योग्यवेळी आहार व्यवस्थापनात बदल केल्यास किटोसिस आजार टाळता येतो. किटोसिस उद्‍भवण्याची कारणे  जनावर विल्यानंतर त्याच्या शरीरावर अधिक दुग्धोत्पादनाचा ताण असतो. या काळात असमतोल आहार मिळाल्यास किटोसिस उद्‍भवण्याची शक्यता असते. प्राथमिक स्वरूपाची कारणे 

  • आहारात पिष्टमय पदार्थांची कमतरता असणे.
  • वाढत्या दूध उत्पादनामुळे आहारातून पुरवठा केल्या जाणाऱ्या कर्बोदकांच्या तुलनेत गरज वाढणे.
  • आहारात जास्त प्रथिनायुक्त घटकांचा वापर उदा. शेंगदाणा / सरकी पेंड 
  • आहारात मुरघासाचे अधिक प्रमाण
  • जनावर वितेवेळी अति लठ्ठ असणे.
  • आहारात स्फुरद व कोबाल्ट इत्यादी क्षारांची किंवा जीवनसत्त्व ‘ब’ची कमतरता 
  • जनावरांना व्यायाम न मिळणे आणि अतिथंड वातावरणात बांधून ठेवणे.
  • दुय्यम स्वरूपाची कारणे 

  • दुय्यम स्वरूपाची कितनबाधा आजार ही मुख्यत्वे कमी आहारामुळे दिसून येते. त्याच प्रमाणे वार अडकणे, गर्भाशयदाह, फुफ्फुसदाह, थायलेरीओसिस, पोटात खिळा किंवा तार असणे, अपचन, यकृताचे आजार, कासदाह यांसारख्या आजारातही दुय्यम स्वरूपाची कितनबाधा आढळून येते.
  • गाभण काळात गाईला योग्य आहार न दिल्यास, तसेच गाय विल्यानंतर कर्बोदकांच्या कमतरतेमुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते. गरजेपुरती ऊर्जा तयार होत नाही. त्यामुळे चरबीपासून ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न शरीराकडून होतो. यामध्ये चरबी फॅटी ॲसिडच्या स्वरूपात यकृतात आणली जाऊन त्यापासून ॲसिटेट तयार होते. आवश्यक ती  ऊर्जा तयार केली जाते. परंतु प्रोपिओनेटची खूपच कमतरता झाल्यास ॲसिटेटपासून किटोन बॉडीज तयार होतात, त्यांचे रक्तातील प्रमाण वाढते. त्यामुळे आम्लता वाढून किटोसिस आजाराची लक्षणे दिसतात.
  • निदान  जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे व प्रयोगशाळेत मूत्र, रक्तातील शर्करा तपासून करता येते. प्राथमिक लक्षणे 

  •  दूध देणाऱ्या जनावरांचे खाणे पिणे हळूहळू कमी होत जाते. त्याचबरोबर दुग्धोत्पादनात मोठी घट होते. सुरुवातीला जनावर चारा खाते. परंतु खुराक किंवा पेंढा अजिबात खात नाहीत. लवकर उपचार न झाल्यास पुढे चारा खाणेही कमी होते. 
  •  कितनबाधा झालेले जनावर हळूहळू क्षीण दिसू लागते. त्वचेवरील चकाकी कमी होऊन हाडांचा सांगाडा दिसू लागतो. जनावर मलूल होते. 
  • जनावराच्या लघवीला गोड वास येतो. लाळ गळते. शेण घट्ट, वाळल्यासारखे होते. 
  • अतितीव्र लक्षणे 

  • अति तीव्र स्वरूपाच्या किटोसिसमुळे जनावरे दगावण्याची शक्यता असते. परंतु हा प्रकार जास्त प्रमाणात दिसून येत नाही. 
  • जनावर गोल चकरा मारतात. चालतात पायांत पाय अडकतात, थरथर कापतात, तोंडाला फेस येऊन झटके येतात. स्वतःची त्वचा किंवा निर्जीव वस्तूंना चाटतात. दूध कमी होते. रवंथ करणे बंद होते. 
  • कमी तीव्रतेच्या लक्षणांत दूध उत्पादन कमी होते. इतर बाबी सर्वसाधारण आढळून येतात. 
  • किटोसिस टाळण्यासाठी उपाययोजना 

  • दूध देण्याच्या सुरुवातीच्या काळात जनावरांच्या आहारात खुराकाचा वापर हळूहळू वाढवावा. अचानक जास्त प्रमाणात खुराक देऊ नये. जनावर विण्याच्या अगोदरपासून खुराकाचा वापर सुरू करावा. जेणेकरून कोठीपोटातील उपयुक्त जिवाणूंना त्यांची सवय होईल. 
  • जनावरांच्या आहारात बदल करावयाचे असल्यास ते हळूहळू करावेत. अचानक बदल करू नये.
  • जनावर गाभण अवस्थेकडून दुधाळ अवस्थेकडे जात असताना त्याच्या आहारात चवयुक्त व पोषणतत्त्वे, पाचक चाऱ्याचा समावेश करावा. यासोबतच जनावरांचे शेड व्यवस्थित असावे, जेणेकरून अतिथंड वातावरणापासून बचाव होईल. 
  • दूध देणाऱ्या सुरुवातीच्या काळात जास्त आम्लयुक्त चारा जनावरांना देऊ नये. याकरिता वर्षातून अनेक वेळा चाऱ्याची प्रत तपासून घ्यावी. 
  • मातीमध्ये कमी प्रमाणात कोबाल्ट क्षार असलेल्या ठिकाणच्या जनावरांच्या आहारात पुरेशा कोबाल्टचा समावेश करावा. 
  • गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात आणि दूध देण्याच्या सुरुवातीच्या काळात जनावरांच्या रक्ताचे नमुने घेऊन मेटाबोलिक प्रोफाइल चाचणी केल्यास भविष्यातील चयापचयाचे आजार टाळता येतात. या चाचणीतील निष्कर्षानुसार आहारात योग्य बदल करता येतात. कितनबाधा ओळखण्यासाठी दुधाची चाचणीही करता येते.
  • जनावर वितेवेळी अति लठ्ठ असणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • दूध देण्याच्या काळात जनावराचा नियमितपणे ‘बॉडी कंडिशन स्कोअर’ घेत राहावा. जनावराच्या शरीरात येणारा अशक्तपणा किंवा अचानक होणारा बदल नोंद करावा. 
  • गोठ्यामध्ये जनावरांना खाण्यासाठी योग्य प्रमाणात जागा आणि चारा मिळण्याची व्यवस्था करावी. विशेषतः दूध देण्याच्या सुरुवातीच्या काळात या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे.
  • दूध उत्पादनात वाढ होत जाईल तसे खुराकाचे प्रमाण वाढवावे. 
  • बुरशीयुक्त गवत किंवा खाद्य आहारात वापरू नये.
  • जनावरांच्या आहारात क्षार मिश्रणाचा योग्य प्रमाणात वापर करावा (५० ते १०० ग्रॅम)
  • जनावरांच्या आहारात निकृष्ट दर्जाचा मुरघास टाळावा. जास्त प्रमाणात मुरघास देणे टाळावे.
  • एखाद्या जनावराला प्रत्येक विताला कितनबाधा होत असल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ११० ग्रॅम सोडिअम प्रोपिओनेट याप्रमाणे रोज प्रसूतीकाळापासून ६ आठवडे द्यावे.
  • जनावरातील कुपोषण टाळण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी खुराक पोषकतत्त्वांनी संतुलित असावा. 
  • - डॉ. प्रफुल्लकुमार पाटील,  ८३२९७३५३१४ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)​

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

    Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

    Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

    Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

    UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

    SCROLL FOR NEXT