Animal Care
Animal Care Agrowon
ॲनिमल केअर

Animal Care : गाई,म्हशींतील अनुवंशिक सुधारणा का महत्त्वाची?

टीम ॲग्रोवन

गाय आणि वळू यांच्यामध्ये चांगले उत्पादनक्षम गुणधर्म असतील तर वासरू / कालवड सुद्धा उत्पादनक्षम असते. मात्र पहिल्या पिढीतील जनावरांचे चांगले व्यवस्थापन (Animal Management), आहार, आरोग्य व्यवस्थापन (Animal Health Management) तरी पुढील पिढीतील वासरांना पुन्हा उत्तम व्यवस्थापन, आहार, आरोग्य देणे गरजेचे असते. म्हणजेच व्यवस्थापन, आहार (Animal Diet), आरोग्य वगैरे बाबींमधील सुधारणा या महत्त्वाच्या असल्या तरी केवळ त्या जनावरांच्या तेवढ्या आयुष्यापुरत्याच मर्यादित राहतात. पुढील पिढीत उत्पादन हेतू अपेक्षित सुधार होण्यासाठी जनुकीय पातळीवरील सुधारणा केल्याशिवाय पर्याय नाही.

अधिकाधिक दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी पशुपालनात विविध पातळ्यांवर सुधारणा करावी लागते. यामध्ये प्रामुख्याने व्यवस्थापन, आनुवंशिकता, पोषण, आरोग्य, उत्पादन निर्मिती प्रक्रिया या प्रमुख बाबींचा समावेश होतो. यातील आनुवंशिक पातळीवरील सुधारणा ही सुजाण पशुपालकांसाठी महत्त्वाची ठरते. कारण आनुवंशिक सुधारणा ही पशुधनाच्या जनुकीय पातळीवर होत असून कायमस्वरूपी राहते. एका पिढीत झालेली सुधारणा आनुवंशिकतेने पुढल्या पिढीत हस्तांतरित होत असते. वासराचे जन्मदाते असलेल्या गायी, वळू यांचेच गुणधर्म त्या वासरात उतरतात.

जनुकीय पातळी महत्त्वाची

उत्पादन किंवा प्रजनन गुणधर्म विविध पशुधनात जातीनिहाय, क्षेत्रनिहाय, ऋतुनिहाय आणि वयोगटाप्रमाणे बदलताना दिसतात. एकच गाय तिच्या आयुष्यात विविध वेतात सारखे दूध उत्पादन देत नाही. पशुधनाच्या विविध गुणधर्मांचा संबंध त्यांच्यामध्ये असणाऱ्या जनुकीय पातळीशी निगडित असतो.

 जनुक हा आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात परवलीचा शब्द झालेला आहे. आपल्या पशुधनाचे विशिष्ट गुणधर्म आहेत. जसे की, दूध उत्पादन, मांस उत्पादन, कार्यशक्ती इत्यादी. ते नियंत्रित करण्याचे काम शरीरातील अतिसूक्ष्म जनुके करीत असतात. उदाहरणार्थ, दूध हे जरी एक उत्पादन वाटत असले तरी दूध म्हणजे पाणी, प्रथिने, स्निग्धपदार्थ, शर्करा, जीवनसत्वे, खनिजद्रव्ये अशा अनेक घटकांचा संयुक्त पदार्थ असतो.

 प्रत्येक जनावराची दूध उत्पादन क्षमता वेगवेगळी असते. त्याचबरोबर दुधातील जे घटक पदार्थ असतात त्यांची पातळी सुद्धा वेगवेगळी असते. दुधातील प्रत्येक घटक पदार्थास नियंत्रित करणारे स्वतंत्र जनुक असते. प्रत्येक जनुकाचे काम त्याच्यातील रासायनिक घटक आम्लांमुळे वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त होत असते. काही जनुके एकमेकांसोबत मित्रत्वाने राहतात किंवा व्यक्त होतात.

काही जनुके परस्परविरोधी भूमिका पार पडतात. उदा. दुधाचे उत्पादन ज्या जातीच्या जनावरांत जास्त असते त्यांच्या दुधातील स्निग्धाचे प्रमाण कमी असते. आपल्याला जर दुधातील स्निग्धाचे प्रमाण वाढवायचे असेल तर स्निग्धाला नियंत्रित करणारा जो विशिष्ट जनुक आहे, त्यात जनुकीय पातळीवर बदल करून पुढील पिढीत सुधारित जनुक गेला तर अपोआप होणाऱ्या कालवडीपासून भविष्यातील दूधउत्पादनात स्निग्धाचे प्रमाण अधिक राहील.

आपण ज्या विविध पातळीवर सुधारणा करतो त्या सुधारणा पुढच्या पिढीत जात नाहीत. उदा. दूध उत्पादनासाठी तुम्ही गाईला हिरवा चारा दिला आणि व्यवस्थित काळजी घेतली, या माध्यमातून उत्पादन पातळीत जो फरक दिसून आला तो त्या गायीपासून मिळणाऱ्या कालवडीमध्ये दिसणार नाही. त्या कालवडींना त्यांच्या दुग्धोत्पादन कालावधीत हिरवा चारा, व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे लागेल. मात्र आनुवंशिक सुधारणा पुढल्या पिढीत जाते म्हणून ती महत्त्वाची ठरते.

लिंग वर्गीकृत रेतमात्रा

(सेक्स सोर्टेड सीमेन)

 श्वेत क्रांतीनंतर पशुपालकांना कृत्रिम रेतन या प्रगत तंत्रज्ञानाचा परिचय झाला. त्याद्वारे प्रभावी पद्धतीने आनुवंशिक सुधारणा कशी साधता येते हे अवगत झाले. आजच्या काळात, लिंग वर्गीकृत रेतमात्रा म्हणजेच सेक्स सोर्टेड सीमेन हे नवीन तंत्रज्ञान पैदासकरांना खुणावू लागले आहे.

सूक्ष्मरित्या X किंवा Y रंगसूत्रात फरक करणे अवघड आहे. तथापि, X रंगसूत्रात Y रंगसुत्रपेक्षा DNA चे प्रमाण अधिक (४ टक्के) असते. तेव्हा, फ्लो सायटोमेट्री या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून X व Y ही रंगसुत्रे धारक शुक्राणू ओळखून वेगळे करता येतात. या तंत्रात, शुक्राणू एका विशिष्ट रंगाने (Dye) डागले जातात, जे थेट डीएनएला जोडतात. फ्लो सायटोमेट्री तंत्रात शुक्राणूवर लेसर प्रकाशशलाका वापरून अधिक डीएनए असलेले X रंगसूत्र तुलेनेने Y रंगसुत्रपेक्षा अधिक चमकतात.

संगणकाच्या मदतीने धनप्रभारीत X गुणसूत्रांना ऋणप्रभारीत Y गुणसूत्रापेक्षा टॅग करत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमधून पार केले जातात. हे तंत्रज्ञान दोन दशकांपूर्वी अमेरिकेत विकसित झाले. जगातील प्रगत डेअरी फार्मवर याचा वापर केला जातो. भारतात पश्चिम बंगाल येथे या तंत्राच्या साहाय्याने निर्मित ‘श्रेयश’ नावाचे वासरू २०११ मध्ये जन्माला आले.

 सद्यःस्थितीत जागतिक पातळीवर तसेच आपल्या देशात सेक्स सोर्टेड सीमेन उपलब्ध झाले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केवळ कालवडी म्हणजे माद्या निर्मितीसाठीच होऊन नैसर्गिक नर, मादी गुणोत्तर बिघडले जाईल अशी शंका बाळगण्याची गरज नाही. उत्तम पैदासक्षमता व गुणवत्ता असलेले वळू उत्पादनासाठी सुद्धा या तंत्राचा वापर करता येईल याची शाश्वत पडताळणी करावी लागेल.आगामी काळात देशी पशुधनात आनुवंशिक सुधारणा आणि संवर्धन यांचा समतोल साधत शास्त्रज्ञ आणि पशूपैदासकारांना विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे.

विदेशी वंशाचे रक्तप्रमाण

 आपल्याकडील एकूण पशुधनाच्या सुमारे ८० टक्के गावरान / अवर्गीकृत जनावरे आहेत. कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ / सुधारणा करण्यासाठी आपण विदेशी वंशाच्या जातीच्या वळूचे वीर्य वापरतो. या वीर्याचे प्रमाण म्हणजे रक्ताची शुद्धता किती पातळीत आहे असा एक ढोबळ अंदाज आपण बांधतो.

 गाय, वळूकडून वासरामध्ये प्रत्येकी ५० टक्के - ५० टक्के गुणधर्म येतात. अशा वासराची / कालवडीची आंतर-पैदास केली म्हणजे पुन्हा पित्याशी संकर केल्यास, पित्याकडून पूर्वीचे प्राप्त २५ टक्के गुणधर्म व आता नवीन पिढी वेळेसचे ५० टक्के गुणधर्म असे मिळून एकूण ७५ टक्के गुणधर्म दुसऱ्या पिढीत येतात. वळूच्या वीर्याचे जेवढे प्रमाण असेल त्याच्या निम्मे पुढच्या पिढीत जाते. म्हणून पैदास प्रणालीचे धोरण ठरवताना विदेशी जातीच्या वळूचे प्रमाण काही वेळा ५० टक्के तर काही वेळा १०० टक्के ठेवून होणाऱ्या पिढीमध्ये ६२.५० टक्यांच्यावर जाता कामा नये ही काळजी घ्यावी लागते.

- डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९, ( डॉ. प्रवीण बनकर हे स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथे पशुआनुवांशिकी व पैदास शास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. डॉ.स्नेहल पाटील या बार्शीटाकळी येथे पशुधन विकास अधिकारी आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT