डॉ. सागर जाधव, डॉ. संतोष चांगण
लम्पी त्वचा आजार हा विषाणूजन्य असल्याने यावर रामबाण औषधोपचार नाही. त्यामुळे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी लक्षणानुसार औषधोपचार करावेत. तसेच पुरेसा आहार देण्याची आवश्यकता आहे. सुदृढ जनावराच्या आरोग्यासाठी सकस आहार आवश्यक असतो.जनावराचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक क्रियेसाठी आवश्यक अन्नघटकांना योग्य प्रमाणात एकत्र मिसळणे आवश्यक आहे. जनावरांच्या आहार प्रमाण आणि घटकात एकदम बदल करू नये.
हिरवा चारा फुलोऱ्यात असताना द्यावा. आहार शुष्क तत्त्वाच्या आधारावर द्यावा. देशी गाईंना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या २ ते २.५ टक्के शुष्क पदार्थांची आवश्यकता असते. म्हशी, संकरित गाईंना त्यांच्या वजनाच्या २.५ ते ३ टक्के शुष्क पदार्थांची गरज असते.
पशुआहारात २/३ भाग वैरण असावी, तर १/३ भाग पशुखाद्य असावे. एकदल वर्गातील हिरवा चारा (मका, कडवळ, ओट, बाजरी, नेपिअर) यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते.
द्विदल वर्गातील चारा (लुसर्न, बरसीम, सुबाभूळ, चवळी, शेवरी) यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
वाळलेल्या वैरणीमध्ये (कडबा, सरमाड, पेंढा, वाळलेले गवत, बगॅस, गव्हाचे काड, ऊस वाढे) एकूण पचनीय पदार्थ यांचे प्रमाण अतिशय कमी असते.
जनावरांच्या शरीराची खनिजांची गरज भागविण्यासाठी चिलेटेड खनिज मिश्रण (दररोज ५० ग्रॅम) देणे गरजेचे आहे.
हिरवा चारा मुबलक प्रमाणात असल्यास पशुखाद्यावर ३० टक्के खर्च कमी करता येतो.
जनावरांना आहारासह स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यास द्यावे. आहाराबरोबरच जनावरांना खासकरून उत्पादनासाठी मुबलक पाणी प्यावयास देणे जरुरीचे आहे. जनावरांना पिण्यासाठी द्यावयाचे पाणी वासरहित, रंगहीन असावे. तसेच त्यात कोणत्याही प्रकारचे अपायकारक क्षार नसावेत. गाई, म्हशींना द्यावयाचे पिण्याचे पाणी शक्यतो ताजे व स्वच्छ असावे. आपल्या देशातील उष्ण हवामानामुळे जनावरांना पाणी अधिक प्रमाणात लागते. जनावरांना पिण्यासाठी दररोज ८० ते १०० लिटर पाणी द्यावे.
प्रत्येक जनावराला रोज वाळलेला चारा, हिरवा चारा (एकदल आणि द्विदल), पशुखाद्य व खनिज मिश्रण द्यावे. वाळलेला चारा, हिरवा चारा कुट्टी करूनच द्यावा.
जनावरांच्या आहारात चिलेटेड खनिज मिश्रणे, जीवनसत्वे (अ,ड,इ), लिव्हर टॉनिक व पाचक टॉनिक यांचा वापर करावा.
जनावरांना संतुलित आहारासोबत खाद्यपुरके
जनावरांच्या आहारात बायपास प्रथिने, बायपास फॅट यांचा उपयोग करावा.आहारातील प्रथिनांचा काही भाग पोटात पचन न होता तो लहान आतड्याच्या खालच्या भागात पचन होतो, शरीराला पूर्णतः उपलब्ध होतो, यालाच बायपास प्रथिने म्हणतात.
जनावरांना चारा टंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने मिळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते हे टाळण्यासाठी खाद्यातून प्रथिने मिळविण्यासाठी बायपास प्रथिनांचा समावेश करावा.
बायपास फॅटचे पचन जनावरांच्या कोठीपोटात न होता, सरळ आतड्यामध्ये होते. परिणामी त्यापासून मिळणारी ऊर्जा ही दूध उत्पादनासाठी वापरली जाऊन, दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येते तसेच जनावरांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.
प्रोबायोटिक्स हे शरीराला उपयुक्त असणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून बनलेले असते. प्रोबायोटिक्स हे कोटीपोटामध्ये पचनक्रियेसाठी लागणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते, शरीराचे कार्य वाढवते.
प्रोबायोटिक्समधील सूक्ष्मजीव जनावरांच्या पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.
जनावरांना संतुलित आहारासोबत प्रोबायोटिक्स द्यावेत. यामुळे कोठीपोटातील पचनक्रिया वाढून दूध उत्पादनात वाढ होते.
लम्पी आजारामुळे जनावर चारा खाणे, रवंथ करणे बंद करते. त्यामुळे जनावरांच्या आहारात रुमेन बफर किंवा यीस्ट कल्चरचा समावेश करावा, कारण त्यामुळे जनावरांची चयापचय क्रिया सुधारते.
आजारी जनावरांना मऊ,चवदार आणि पचनास हलका आहार द्यावा. जनावरांना पाण्यात भिजवलेले चारा, मूरघास,मका आहारात द्यावा. रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी खनिजे, जीवनसत्त्वे द्यावीत.
जनावरांमध्ये लसीकरण आणि बाह्यपरजीवींचे नियंत्रण करावे. योग्य उपचार केल्याने आजार बरा होतो.
- डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४
(पशुधन विकास अधिकारी मांडकी, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.