Animal  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Husbandry: लिंग निर्धारित रेतमात्रेचा वापर

Sex Sorted Semen: भारतातील पशुपालन क्षेत्र हे मुख्यतः दुधाळ गाई आणि म्हशींवर आधारित आहे. शेतकऱ्यांना दुग्धोत्पादनातून नियमित आणि स्थिर उत्पन्न मिळते. मात्र गाय वासरांची संख्या वाढवण्यासाठी पारंपरिक पद्धतीवर अवलंबून राहिल्यास स्त्री वासराचे प्रमाण अनिश्‍चित राहते. मात्र लिंग निर्धारित रेतमात्रेद्वारे (सेक्स सॉर्टेड सीमेन) कालवडींचे प्रमाण वाढविणे शक्य आहे.

Team Agrowon

डॉ. सूर्यकांत कदम, डॉ. देवाशिस बावस्कर

Animal Care: शास्त्रीय तंत्रज्ञानाच्या साह्याने वळूच्या वीर्यामधून नर संतती (Y शुक्राणू) आणि मादी संतती (X शुक्राणू) निर्माण करणारे शुक्राणू वेगवेगळे करून फक्त इच्छित लिंगाचे शुक्राणू वापरून तयार केलेली रेतमात्रा म्हणजे लिंग निर्धारित रेतमात्रा. साधारणपणे गोवंशीय प्राण्यांमध्ये मादी जनावरात XX गुणसूत्रे आणि नर जनावरात XY गुणसूत्रे असतात. स्त्रीबीजाचे जर X शुक्राणूद्वारे फलन झाले तर मादी संतती (कालवड) तयार होते. आणि Y शुक्राणूपासून फलन झाले तर नर संतती तयार होते. प्रयोगशाळेत विशेष आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने फ्लो सायटोमेट्री प्रक्रियेद्वारे X आणि Y गुणसूत्रे असलेले शुक्राणू वेगळे केले जातात.

त्यापासून X किंवा Y शुक्राणू असलेल्या गोठीत कृत्रिम रेतमात्रा तयार केल्या जातात. पारंपरिक कृत्रिम रेतनांद्वारे नर व मादी वासरू मिळण्याचे प्रमाण हे ५० टक्के इतके असते. लिंग निर्धारित कृत्रिम रेतन प्रक्रियेद्वारे फक्त मादी वासरे मिळण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या दूध उत्पादनाच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे सोपे जाते. महाराष्ट्रामध्ये सध्या म्हशीमध्ये मुऱ्हा, मेहसाणा, आणि गाईमध्ये होल्स्टिन फ्रिजियन, जर्सी, गीर, साहिवाल, रेड सिंधी, खिल्लार, राठी आणि थारपारकर जातीचे लिंग निर्धारित कृत्रिम रेतमात्रा उपलब्ध आहेत.

लिंग निर्धारित रेतमात्रांचा वापर

ज्या कालवडी वयात आलेल्या आहेत किंवा

गाई-म्हशी प्रथमच गाभण राहणार आहेत, अशा जनावरांमध्ये लिंग निर्धारित रेतमात्रांचा वापर करावा. विशेषतः प्रथम गाभण राहणाऱ्या गाईचे शरीर मजबूत व सक्षम असावे. वजन किमान ३०० किलो असणे आवश्यक आहे.

कालवडीची दोन नैसर्गिक माजानंतर जेव्हा तिची प्रजननाची जैविक तयारी पूर्ण होते. अशा वेळी लिंग निर्धारित रेतमात्रा वापरल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते.

गाई, म्हशीच्या तिसऱ्या वेतापर्यंत, व्यायल्यानंतरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या प्रतीच्या चांगल्या माजामध्ये लिंग निर्धारित रेतमात्रांचा वापर करावा.

गोठ्यातील आरोग्यदृष्ट्या सशक्त, नियमित माज दर्शवणाऱ्या आणि उत्तम प्रजननक्षम गाई-म्हशींमध्ये लिंग निर्धारित कृत्रिम रेतमात्रांचा वापर करावा.

माजाचे एकत्रीकरण केलेल्या चांगल्या प्रतीच्या माजामध्ये लिंग निर्धारित रेतमात्रांचा वापर करावा.

गाय, म्हशीला लिंग निर्धारित रेतमात्रांचा वापर करण्यापूर्वी किमान दोन महिने अगोदर जंतनाशक, चांगल्या दर्जाचे खनिज मिश्रण आणि उच्च दर्जाचे पशुखाद्य योग्य प्रमाणात द्यावे.

जनावराची शरीर स्थिती ‘तीन शरीर मानक’ म्हणजे मध्यम व चांगल्या अवस्थेतील असावे. त्याचबरोबर जनावरामध्ये सकारात्मक ऊर्जा संतुलन असणे गरजेचे आहे. म्हणजेच ते जेवढी ऊर्जा खर्च करते, त्यापेक्षा अधिक ऊर्जा अन्नातून मिळत असेल तर अशा जनावरांमध्ये लिंग निर्धारित रेतमात्रा वापरणे अधिक फायदेशीर ठरते.

लिंग निर्धारित रेतमात्रेच्या मर्यादा

खासगी कंपन्यांची लिंग निर्धारित रेतमात्रेची किंमत सरासरी १०००-१२०० रुपये इतकी आहे.त्यामुळे सर्वच पशुपालकांना सतत वापरणे परवडणारे नाही. परंतु नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नोंदणी केली तर महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना लिंग निर्धारित रेतमात्रा ८१ रुपयांना मिळू शकते.

सामान्य कृत्रिम रेतनाच्या तुलनेत लिंग निर्धारित रेतमात्रेमध्ये प्रती रेतमात्रेमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्याने, गर्भधारणेचे यशाचे प्रमाण १० ते २० टक्यांनी कमी असते.

लिंग निर्धारित रेतमात्रा अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे यासाठी विशिष्ट तापमान, नायट्रोजनची शुद्धता आणि योग्य हाताळणी आवश्यक असते. जर हे पाळले नाही तर रेतमात्रा वीर्य निष्क्रिय होते.

लिंग निर्धारित रेतमात्रेचा मोठ्या प्रमाणावर वापर

केल्यास नर वासरांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होते, ज्याचा दीर्घकालीन परिणाम वळू उत्पादनावर होऊ शकतो.

लिंग निर्धारित रेतमात्रा वापरण्यासाठी कुशल, प्रशिक्षित कृत्रिम रेतकाची आवश्यकता असते.

लिंग निर्धारित रेतमात्रा वापराचे फायदे

लिंग निवड करून कृत्रिम रेतन केल्यामुळे मादी वासरे मिळण्याची शक्यता सुमारे ९० ते ९५ टक्के इतकी जास्त असते. जे पारंपरिक पद्धतीपेक्षा खूपच फायदेशीर ठरते.

नर वासरांचा आर्थिक उपयोग मर्यादित असतो. त्यांचा संगोपनाचा खर्च, अन्न, औषधे आणि जागेचा वापर यामुळे पशुपालकांचे नुकसान होते. परंतु लिंग निर्धारित रेतमात्रा वापरल्यास मादी वासरेच अधिक प्रमाणात मिळाल्याने हा अनावश्यक खर्च टाळता येतो.

नर वासरू जन्मास आले तर त्याची विक्री उच्च दर्जाच्या वळू संगोपन केंद्रांना किंवा गोठीत रेत प्रयोगशाळांना करता येते, ज्यातून पशुपालकाला अधिकचा मोबदला मिळू शकतो.

नर वासरांची शारीरिक रचना तुलनेने मोठी असल्याने मादी जनावरांना प्रसूतीवेळी अडचणी येतात. काही वेळा शस्त्रक्रियेचीही गरज भासते. परंतु मादी वासरांचा आकार लहान असल्यामुळे अशा प्रसंगांचा धोका कमी होतो. त्यामुळे जनावराच्या आरोग्याचे जतन होते. पुढील गर्भधारणेसाठी वेळेवर त्याची तयारी होते.

शुद्ध व चांगल्या गुणधर्मांच्या वळूंच्या वीर्यामधून उच्च वंशावळीचे मादी वासरे मिळाल्यामुळे भविष्यात उत्तम उत्पादनक्षम जनावर तयार होते. यामुळे दूध उत्पादनात वाढ होते.

चांगल्या वंशावळीतून आलेल्या गाभण गाई, म्हशींना बाजारात अधिकची किंमत मिळते.

गोठ्यातच मादी वासरे निर्माण होण्याने पशुपालकाला बाहेरून जनावरे खरेदी करावी लागत नाहीत. यामुळे बाहेरील आजार, संसर्गजन्य रोग किंवा कमी उत्पादनक्षमता असलेल्या जनावरांचा धोका टाळता येतो.मादी जनावरांची संख्या वाढवून दूध उत्पादन व पशुधन व्यवसायाचा विस्तार सहज करता येतो.

- डॉ. सूर्यकांत कदम, ९६२३८४०४७०

(लेखक पशुप्रजनन व प्रसूतिशास्त्र विषयातील तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT