Animal Care
Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : जनावरांतील संसर्गजन्य आजारावर उपचार

टीम ॲग्रोवन

डॉ. गजानन ढगे, डॉ. साईनाथ पवार

घटसर्प ः

- गाय, म्हैस, शेळी, मेंढी, लहान वासरे इत्यादी सर्व वयोगटातील जनावरांत हा आजार दिसतो.

- म्हशींमध्ये आजाराचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे.

- आजार पसरविणारे जंतू जमिनीत, जनावरांच्या श्‍वसनसंस्था (नाकपुड्या, श्‍वसन नलिका व फुफुसात असतात) आढळतात. आजारी जनावराचे नाक, तोंडातून येणाऱ्या स्त्रावातून किंवा स्त्रावाने संपर्कात आलेला चारा, पाणी व दूषित पाण्याने सुद्धा आजार पसरतो.

लक्षणे ः

- सडकून ताप येतो (१०६ ते १०७ डिग्री फॅरानाईट). जनावर थरथर कापते.

- घशाखाली आणि गळ्यावर सूज येते. त्याअगोदर बाधित जनावरे श्‍वसन करताना घरघर आवाज येतो.

- डोळे लाल होतात, श्‍वासोच्छासाचा वेग वाढतो. जनावर जमिनीवर पडून रहाते.

- श्‍वास घेण्यास त्रास होतो, जनावरे जीभ बाहेर काढतात. नाक, तोंडातून पाण्यासारखा स्त्राव येतो.

उपचार ः

- आजारी जनावराला तीव्र स्वरूपाचा किंवा काही वेळेस अतितीव्र स्वरूपात हा आजार होत असल्याने औषधोपचार करूनही जनावर (१० ते ७२ तासात) दगावू शकते. यामुळे लसीकरण करावे.

- मे, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्व जनावरांना प्रतिबंधक लस टोचावी.

फऱ्या

- हा संसर्गजन्य आजार गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढीमध्ये दिसतो. ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील शरीराने धष्टपुष्ट असलेल्या जनावरांत सर्वाधिक आढळतो.

- जिवाणूने बाधित चारा, पाणी आणि मातीमार्फत जनावरांना होणाऱ्या लहान जखमा, तोंडातील व जिभेवरील व्रण यातून जिवाणू जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. शरीरातील मांसल भागात (उदा.मांडी) काही काळ सुप्तावस्थेत राहून अनुकूल वातावरण मिळताच जिवाणूंची संख्या वाढते. जनावरे रोगाची लक्षणे दाखवू लागतात.

लक्षणे ः

- भयंकर ताप येतो (१०६ ते १०८ डिग्री फॅरानाईट). जनावर सुस्त पडते, काळवंडते.

- श्‍वासोच्छवासाचा वेग वाढतो, श्‍वास घेण्यास त्रास होतो.

- जनावरांच्या मांसल भाग उदा. मांडी (फरा), मान इत्यादीवर अचानक जास्त प्रमाणात सूज येते. या सुजेवर दाबले असता करकर असा आवाज येतो.

- सूज आलेल्या पायाने जनावर लंगडते. सूज आलेला भाग सुरवातीच्या अवस्थेत अतिशय गरम व वेदनादायी असतो. त्यानंतर तो भाग थंड व वेदनारहित होतो.

- जनावर जमिनीवर पडून राहाते,१२ ते ४८ तासांत दगावते.

उपचार ः

- आजारी जनावरांना पेनिसिलीन गटातील प्रतिजैविक पशुवैद्यकाच्या मदतीने घ्यावे.

- पावसाळ्यापूर्वी मे, जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रतिबंधक लसीकरण घ्यावे.

तिवा ः

- गाय,म्हशींमध्ये आजार दिसतो. तीन दिवस सडकून ताप येतो.

- हा विषाणूजन्य आजार चावणाऱ्या माशा पसरवतात.

- जनावर काळवंडते, थरथरते, सुस्त होते. एका पायाने लंगडते, ताठरते.

- मान, छाती, पाठ व पायाचे स्नायू आकुंचित पावतात.

उपचार ः

- आजारावर कुठलीही लस उपलब्ध नाही. आजार चावणाऱ्या माशा, डासांमुळे पसरत असल्यामुळे त्यांचे निर्मुलन करावे. गोठा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा.

- आजारामुळे जनावरांचा मृत्यू जरी होत नसला तरी तीन दिवसांच्या आजारपणामुळे जनावर खंगते. यामुळे जनावरांवर त्वरित उपचार करून घ्यावेत.

फुफुसदाह (निमोनिया)

- जिवाणू, विषाणू, बुरशी व अस्वच्छता इत्यादी विविध कारणांमुळे होणारा आजार आहे.

- आजार प्राणीवर्ग गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, वराह इत्यादींना होतो.

- जनावरांना थंडी वाजून ताप येतो. श्‍वाच्छोश्‍वासाचा वेग वाढतो. श्‍वास घेताना घरघर आवाज येतो. जनावरांना खोकला येतो.

- सुरवातीच्या अवस्थेत नाकपुड्यातून पाण्यासारखा स्त्राव येतो. त्यानंतरच्या अवस्थेत पांढरा, पिवळा किंवा हिरव्या रंगाचा स्त्राव येतो. डोळ्यातून पाणी वाहते. डोळे निस्तेज व मलूल बनतात.

उपचार ः

- प्रतिजैविकांचा वापर तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने सतत ५ ते ७ दिवस केल्यास जनावरे बरी होतात.

- जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा ठेवावा. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे बांधावे.

- जनावरांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यावर झूल पांघरावी.

सर्रा

- पावसाळ्यात गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा व उंट यामध्ये आजार आढळतो.

- टॅबानस नावाच्या चावणाऱ्या माशा हा आजार पसरवतात.

- अचानक ताप येतो.जनावर गोल गोल फिरते.

- अडखळत चालते. झाडावर, भिंतीवर डोके आदळते. झटके देत मृत्युमुखी पडते.

उपचार

- आजाराची लक्षणे इतर जीवघेण्या आजाराशी मिळतीजुळती असल्याने तज्ञ पशुवैद्यकाकडून या आजाराची खात्री करून ताबडतोब उपचार करावेत.

- चावणाऱ्या माशा हा आजार पसरवण्यामागे मुख्य कारण असल्याने त्यांचे निर्मुलन करावे.

- गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.

जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रे ः

- गोठा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा. हवा खेळती ठेवण्यासाठी उपाययोजना करावी.

- जनावरांना पिण्यासाठी नेहमी स्वच्छ, ताजे पाणी उपलब्ध करावे.

- आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे बांधावे. दूषित चारा, पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी.

- साथ पसरलेल्या भागातील जनावरांचा लांबवरचा प्रवास टाळावा. आजाराचा एखाद्या भागात प्रादुर्भाव झाल्यास त्या भागात जनावरे चरावयास नेऊ नये.

- डास, माशांचे निर्मुलन करण्यासाठी गोठा परिसरात नियमित फवारणी करावी.

- जंताचा प्रादुर्भाव असलेल्या जनावरांत लसीकरणाने योग्य ती प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही, यासाठी जनावरांच्या लसीकरणापूर्वी जंतनाशन करावे.

- संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास त्या गावाच्या सभोवतालच्या गावात सर्वप्रथम लसीकरण करावे. त्यानंतर त्या गावाच्या परिसरातील जवळील गावात लसीकरण करून घ्यावे. शेवटी आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गावात लसीकरणाची अंमलबजावणी करावी. अशा रीतीने संसर्गजन्य आजार १ ते ३ आठवड्यात नियंत्रणात येतो.

- वेळेवर लसीकरण करावे. वापरली जाणारी लस नामांकित कंपनीची असावी.

- लस विकत आणताना ती बर्फावर ठेवून आणावी. लस कालबाह्य झाली नसल्याची खात्री करावी.

- निरोगी आणि सशक्त जनावरांचे लसीकरण सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करावे.

- गावातील सर्व जनावरांचे शक्यतो एकाच दिवशी लसीकरण करावे.

- अशक्त व रोगी जनावरांत लसीकरणानंतरही म्हणावी तशी प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. याकरिता त्यावर योग्य ते उपचार करून त्यांना सशक्त करूनच लसीकरण करावे.

- लसीकरणानंतर जनावरांवर कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही याची खबरदारी घ्यावी.

- लसीकरणानंतर सौम्य ताप येऊ शकतो पण तो फारच कमी कालावधीचा असतो. एक-दोन दिवस ताप येऊन दूध कमी होऊ शकते. पण ते तात्कालिक स्वरूपाचे असते.

- लसीकरण केल्यामुळे मानेवर गाठ येते म्हणून लसीकरण करणे टाळू नये. लस दिल्यानंतर गाठ येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी लस दिल्यानंतर त्या जागेवर लगेच चोळावे. तरीही गाठ आल्यास गाठ आलेल्या जागेवर कोमट पाण्याने शेक द्यावा. गाठ जिरते.

- लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी २० ते २५ दिवस लागतात. यासाठी आजाराची साथ येण्यापूर्वी लसीकरण करून घ्यावे.

------------------------------------------------------------------

संपर्क ः डॉ. गजानन ढगे, ९४२३१३९९२३

(डॉ. ढगे हे पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी येथे पशुशल्य चिकित्सा व 'क्ष' किरण शास्त्र विभागात कार्यरत आहेत.डॉ. पवार नांदेड येथे पशूधन विकास अधिकारी आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT