काळजी पशुधनाची

Khillar Cow Market : जातिवंत खिल्लार गाय, बैलांसाठी सांगोल्याच्या बाजाराला पसंती

Sangola Cattle Market : जातिवंत खिल्लार बैल, खिल्लार गाय, संकरित गाय आणि म्हशींसाठी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचा आठवडे बाजार पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा जनावर बाजार म्हणून ओळखला जातो. आहे.

सुदर्शन सुतार

Khillar Bull Breed : मध्यम-हलक्या जमिनी, सततचा दुष्काळ आणि उत्पादनाची शाश्वती नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीला दोन हात करत सांगोल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीमध्ये आर्थिक क्रांती केली आहे. गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादनाच्या बळावर देशासह परदेशातील बाजारावर इथल्या डाळिंबाने कायमच हुकमत गाजवली आहे.

त्याप्रमाणे सांगोल्याचा आठवडी बाजार हा खिल्लार गाई-बैलांसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळेच मोठी आर्थिक उलाढाल या बाजारातून होते. या बाजारात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर यासह कर्नाटकातील विजापूर, बेळगाव, गुलबर्गा, आंध्रप्रदेशमधील हैदराबादसह अनेक भागातून शेतकरी आणि व्यापारीही या बाजारात आवर्जून येतात.

४२ एकरवर बाजार

बाजार समितीची स्थापना १९६० मध्ये झाली, तेव्हापासून हा बाजार भरतो. जनावरांचा आठवडे बाजार सुमारे ४२ एकर अशा विस्तीर्ण क्षेत्रावर भरतो. बाजारामध्ये खिल्लार गाई,बैल, संकरित गाई, म्हशी आणि शेळ्या-मेंढ्या असे स्वतंत्र विभाग केले आहेत.

संपूर्ण क्षेत्राला कुंपण आहे. त्यामुळे खरेदीदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांना सहजगत्या या बाजारात फिरणे, खरेदी-विक्री व्यवहार करणे आणि सुरक्षेच्यादृष्टीनेही चांगली सुविधा आहे. पत्र्याचे चार मोठे शेड लिलावासाठी आहेत. त्याशिवाय जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय, विजेची पुरेशी सोय याठिकाणी आहे.

रविवारी भरतो बाजार

राज्याच्या अनेक भागांतून आणि राज्‍याबाहेरूनही बाजारात खरेदीदार, विक्रीदार आणि दलाल येथे येतात. रविवार बाजाराचा दिवस असला, तरी शनिवार दुपारपासून बाजार गजबजण्‍यास सुरुवात होते. विविध ठिकाणचे जनावरांचे मालक स्‍वतः किंवा एखाद्या विश्‍वासू माणसाकरवी मैदानावर जनावरे आणून ठेवतात. दुसऱ्या दिवशी, अर्थात पहाटेपासूनच सौद्यांना सुरुवात होते, रविवारी दुपारपर्यंत तेथे तळ असतो. बैल, गाईंशिवाय शेळ्या आणि मेंढ्याही विक्रीसाठी येतात.

जनावरांची तपासणी

खरेदीदार ग्राहक आणि दलाल जनावरांची परीक्षा करतात. त्यामध्ये गाय कशी चालते, तिचे वशिंड कसे आहे, तिची कास, कासेजवळील शिरा, तिचे कान या गोष्‍टींची तपासणी केली जाते. त्याशिवाय बैलांच्या खरेदीत दातांची पाहणी केली जाते. किती दाती बैल, यावरुन बैलाचे वय समजते, गाय, बैल किंवा म्हशीच्या संपूर्ण शरीरावर नजर टाकून काही ठोकताळे व्यापारी तसेच शेतकरी बांधतात, त्यावरच बैल, गाय आणि म्हशींचे सौदे पार पडतात.

दरमहा सरासरी ४ ते ५ हजार जनावरांची आवक

गेल्या तीन महिन्यातील बाजाराचा आढावा घेता, या बाजारात डिसेंबरमध्ये ७,२२६ जनावरांची आवक झाली. त्यापैकी ५,०३४ जनावरांची विक्री झाली, जानेवारीमध्ये ५,७३५ जनावरांची आवक झाली, त्यांपैकी ४,१३५ जनावरांची विक्री झाली आणि १६ फेब्रुवारीपर्यंतच्या दोन बाजारात ५,८६५ जनावरांची आवक झाली, त्यांपैकी ४,१७९ जनावरांची विक्री झाली. या तीन महिन्यात सर्वाधिक ३,६९५ खिल्लार बैलांची विक्री झाली, ५,७२० संकरित गाई, २०१ खिल्लार बैल आणि २,७३२ म्हशींचा समावेश आहे.

दराचा विचार करता, सध्या पाणी टंचाई आणि एकूण चाऱ्याची टंचाई अधिक जाणवत असल्याने दर काहीसे कमीच आहेत. खिल्लार गाईंना २० ते ४० हजार रुपये, संकरित गाईला ४० ते ६० हजार रुपये, बैल ५० ते ७० हजार रुपये, म्हशीला ८० ते १ लाख ५० हजार रुपये असे दर आहेत.

चपळ, दणकट `खिल्लार`

महाराष्ट्राच्या विविध भागात बैलांच्या विविध जाती आहेत. पण त्यात खिल्लार ही काहीशी वेगळी, शेतीकामात अधिक उपयोगी ठरणारी जात आहे. विशेषतः खिल्लार बैलाचा विचार करता, हा बैल पांढराशुभ्र, दिसायला देखणा, कामाला काटक, दणकट आणि तितकाच चपळ तसेच वेगाने धावणारा बैल म्हणून ओळखला जातो. सांगोल्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात या बैलांचे सर्वाधिक संगोपन होते. शेतीकामात तो सर्वाधिक उपयोगी ठरतोच, पण बैलगाडा शर्यतीत त्याला सर्वाधिक पसंती मिळते

बैलगाडा शर्यतीमुळे दिलासा

खिल्लार बैल आणि खोंडांना या बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः बैलगाडा शर्यतीच्या खोंडाची या बाजारात मोठी आवक-जावक होते. मागच्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी काही अटींसह उठवल्याने मोठा दिलासा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे अर्थातच, पुन्हा एकदा या बाजाराला चांगले दिवस आले आहेत. आज महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही खास शेतकरी-व्यापारी या खोंडांच्या खरेदीसाठी इथे येतात.

-उत्तम खोकले ९६७३६६६२८४

(प्रभारी सचिव, बाजार समिती, सांगोला)

बाजार समितीकडून शेतकऱ्यांना सोई-सुविधा पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी आणि खरेदीदार यांचे व्यवहार सुरळीत होतील, याकडे लक्ष असते.
- समाधान पाटील, सभापती, सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगोला
उघड लिलाव, रोख व्यवहार आणि जातिवंत जनावरे, यामुळे आमच्या बाजाराला शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही पसंती असते. बाजारदिवशी सर्व परिस्थितीवर आमचे नियंत्रण असते.
- उत्तम खोकले, प्रभारी सचिव, सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगोला
यंदा पाणी आणि चारा टंचाईमुळे दर काहीसे कमी मिळत आहेत. मागच्यावर्षीपेक्षाही २० ते ३० टक्क्यांनी दर कमी आहेत.
- राजू पाटील, व्यापारी, उंबरे (ता.माळशिरस)
पैशाची अडचण आल्याने माझ्याकडील दोन खिल्लार बैल विक्रीस आणले. एक बैल २० हजाराला विक्री झाला आहे, दुसरा ३५ हजाराला मागत आहेत. ५० टक्क्यांनी दर उतरले आहेत.
- विठोबा राऊत, शेतकरी, तिऱ्हे (ता.उत्तर सोलापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT