Poultry Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry Management : ब्रॉयलर कोंबड्यांचे आहार, आरोग्य व्यवस्थापन

Chicken Poultry Management : उन्हाळ्यात कोंबड्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. या काळात त्यांच्या खाद्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण उन्हाळ्यात कोंबड्यांना संसर्गजन्य आजार होण्याचा धोका जास्त असतो. उन्हाळ्यात योग्य काळजी न घेतल्यास तसेच संतुलित खाद्य न मिळाल्याने अनेक कोंबड्यांचा अचानक मृत्यू होतो.

Team Agrowon

डॉ. एस. आर. शेख, डॉ. सिद्दीकी एम.एफ.एम.एफ.

Chicken Poultry Care : कोंबड्यांना आपल्यासारखे शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत कोंबड्यांच्या शरीराचे सामान्य तापमान (१०७ डिग्री फॅरनहाइट) हे अधिक असते. कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. कोंबड्या २८ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करू शकतात. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात फारसा फरक पडत नाही.

परंतु ३० अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यास त्यांच्या उत्पादनात आणि प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतो. बाह्य तापमान ३५ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास प्रति अंश तापमान वाढीने कोंबड्यांचे उत्पादनात पाच टक्के घट येते. त्यामुळे उन्हाळ्यात विशेषतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या कालावधीत कोंबड्यांच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात कोंबड्यांची काळजी घेणे आणि त्यांच्या आहार व्यवस्थापनात बदल करणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये त्यांना योग्य प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्वे न मिळाल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये बदल झाल्यामुळे त्यांना आजार होतात. त्यांच्यामध्ये आवश्यक प्रतिकार शक्ती तयार होत नाही.

एप्रिल महिना जवळ येतो तसे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते. त्यामुळे त्यांच्या शरीराचे देखील तापमान वाढते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. परिणामी, त्यांच्या शरीरातील ऊर्जा आणि पाणी हे लवकर वापरले जाते, यामुळे कोंबड्या उष्माघाताला बळी पडतात.

जेव्हा वातावरणातील तापमान हे ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत असते तेव्हा कोंबड्यांना उष्णतेचा त्रास जास्त प्रमाणात जाणवू लागतो. १८ ते २३ अंश सेल्सिअस तापमान कोंबड्यांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात मानले जाते. यापेक्षा कमी किंवा जास्त तापमान त्यांच्यासाठी हानिकारक असते.

उन्हाळ्यात तापमानाशी जुळवून घेण्यासाठी कोंबड्या आपल्या हालचाली कमी करतात, तसेच कोंबड्या खुराड्यात पंख पसरून बसतात, कडक उन्हाळ्यामध्ये

चोच उघडी ठेवून जास्तीत जास्त उष्णता बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. कोंबड्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसल्यामुळे त्या सतत पाणी पीत असतात, त्यामुळे उन्हाळ्यात त्यांना २४ तास पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे असते.

ज्या वेळी परिसरातील तापमान १ अंश सेल्सिअसने वाढत जाते तेव्हा कोंबड्याचे खाद्य खाण्याचे प्रमाण १.५ टक्का कमी होते. जेव्हा तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते तेव्हा खाण्याचे प्रमाण ४ ते ५ टक्क्यांनी कमी होते.

उन्हाळ्यामध्ये खाद्य खाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे कोंबड्याच्या शरीरात आवश्यक असलेली प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे त्यांना मिळत नाहीत किंवा शरीरात त्यांची कमतरता भासते. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो. त्यांचे शरीर रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यास असक्षम ठरते.

योग्य व्यवस्थापन न केल्यास कोंबड्यांचे वजन ४२ दिवस वय होऊन ही वाढत नाही. मोठ्या कोंबड्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण अधिक होते. हे संभावित नुकसान टाळण्यासाठी कोंबड्यांची शरीर तापमान नियंत्रण प्रणाली विचारात घेता विशेष लक्ष देऊन काळजी घेणे गरजेचे असते.

उष्माघाताची लक्षणे

कोंबड्या उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी तोंडावाटे शरीरातील उष्णता बाहेर टाकतात यालाच धापणे (पॅंटिंग) म्हणतात. याचा विपरीत परिणाम त्यांच्या वाढीवर, रोगप्रतिकार क्षमतेवर आणि उत्पादनावर होतो. उष्माघातात कोंबडीची चोच फुगते, अशक्तपणा दिसून येतो, चेंगराचेंगरीचे प्रमाण वाढते आणि अर्धांगवायू होऊन त्यांचा मृत्यू होतो.

कोंबड्या श्‍वास तोंडावाटे घेतात, पाणी जास्त पितात. भूक मंदावते.

तोंडाची उघडझाप करून धापा टाकतात, पोट जमिनीला घासतात. डोळे बंद करतात.

हालचाल मंदावून, सुस्त राहतात. त्वचा रखरखीत होते, रंगामध्ये बदल दिसून येतो.

शारीरिक वजनात लक्षणीय घट होते. प्रजोत्पादन क्षमतेवर उष्णतेचा विपरीत परिणाम होतो.

रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्यामुळे त्या आजारास बळी पडतात. खाद्याचे रूपांतर मांसात होण्याची क्षमता कमी होते.

कोंबड्या भिंतीच्या आडोशाला पडून राहतात. पाण्याच्या भांड्याजवळ थंड जागेत मान वाकवून बसतात.

शरीराचे तापमान कमी करण्यासाठी व शरीरात थंडपणा आणण्यासाठी पंख शरीरापासून दूर पसरवितात.

दीड किलोपेक्षा अधिक वजनाच्या कोंबड्यांना दुपार ते संध्याकाळच्या वेळी ताप येतो. त्या लालसर होऊन मरण पावतात.

शेडमधील नियोजन

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर तापमान मोठ्या प्रमाणावर वाढते आणि यामुळे कोंबड्यांच्या वाढीवर परिणाम होऊन त्यांच्या मरतुकीचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेडचे तापमान किमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवावे.

पोल्ट्री शेड आणि छताला पांढरा रंग द्यावा, जेणेकरून उन्हाची तीव्रता कमी होईल.

शेडमधील कामे सकाळीच उरकून घ्यावीत, दुपारच्या वेळेत कोणतीही कामे करू नयेत, जेणे करून त्याचा ताण कोंबडीवर पडणार नाही.

पोल्ट्री शेडचे बांधकाम पूर्व-पश्‍चिम असावे, जेणेकरून सूर्यकिरणे आत शिरणार नाहीत.

वायुविजन व्यवस्था सक्षम असावी. शेडच्या छतावर पाला टाकावा. त्यावर सतत पाणी टाकावे जेणेकरून उष्णतेचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

शेडमध्ये खिडक्यांना पडदे लावावे, हे पडदे हलक्या रंगाचे असावे. त्यावर सतत पाणी शिंपडावे.

छतावर एस्बेस्टॉस शीट टाकाव्यात. यामुळे छत गरम होत नाही.

छतावर स्प्रिंकलर्स आणि शेडमध्ये फॉगर्स बसवावेत. स्प्रिंकलर्स आणि फॉगर्स यांचा वापर हा सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच्या दरम्यान दर १ ते २ तासांनी करावा.

शेडच्या छतावर वेलवर्गीय वनस्पती जसे की दोडके, कारले वेलीचे आच्छादन फायद्याचे ठरू शकते.

फॉगर्सची सुविधा उपलब्ध असल्यास शेडचे तापमान कमी होऊ शकते.

गादी पद्धतीत वापरात येणाऱ्या तुसाची जाडी कमी (१ ते १.५ इंच) करावी. उन्हाळ्यात लिटरसाठी लाकूड भुश्‍शाऐवजी तांदळाचा तूस किंवा भुईमूग टरफलांचा वापर करावा.

उन्हाळ्यामध्ये कोंबडी आपले पंख पसरून बसतात. त्यामुळे एका कोंबडीला एक चौरस फूट जागा मिळेल असे नियोजन करावे. शेडमधील कोंबड्यांची संख्या किमान १० टक्क्यांनी कमी करावी. शेडमधील तापमानाचा अंदाज घेण्यासाठी थर्मामीटर बसवण्याचे नियोजन करावे.

शेडमध्ये कूलर किंवा पंखा याचा वापर करावा. मात्र कूलरमुळे निर्माण होणारी अधिकच्या आर्द्रतेचे वायुविजन योग्यरीतीने होईल हे निश्‍चित करावे.

शेडच्या सभोवताली उंच व सरळ जाणारी झाडे (उदा. अशोक) लावावीत. बाजूच्या भिंतीच्या जाळीवर बारदान लावावेत. त्यावर स्प्रिंकलर्सचे पाणी पडण्याची सोय करावी. खिडक्यांपासून ३ ते ५ फूट अंतरावर गोणपाटाचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडून शेड थंड करावी.

डॉ. एस. आर. शेख, ८९८३१९५३०५, (पीएच.डी. स्कॉलर, पशू औषधवैद्यक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT