Animal Care
Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Reproduction : पशू पुनरुत्पादनामध्ये खनिजांची भूमिका महत्त्वाची...

Team Agrowon

डॉ.एस.एस.रामटेके, डॉ.एस.बी.नाटकर

पशुआहारातून (Animal Feed) जनावरांना मूलभूत प्रमाणात खनिजांचा पुरवठा आवश्यक आहे. शरीराची देखभाल, वाढ तसेच पुनरुत्पादनासाठी खनिजे आवश्यक असतात.

या घटकांचा पुनरुत्पादन विकासामध्ये शारीरिक स्थिती आणि वेळेनुसार माजाचा काळ, गर्भधारणेचा काळ, प्रसूती आणि दुग्धउत्पादनाच्या काळानुसार खनिजांची मागणी बदलू शकते.

फॉस्फरस

मादी जनावरांमध्ये सर्वसाधारण शरीर गरजेपैकी केवळ ६ ते ८ टक्के फॉस्फरस मिळत असेल आणि रक्तामध्ये फॉस्फरसची पातळी कमी असेल तर प्रजनन क्षमता कमकुवत होते. शरीरामध्ये कॅल्शिअम:फॉस्फरस दर हा २:१ प्रमाणात असावा.

फॉस्फरस हाडामध्ये कॅल्शिअम सोबत आढळून येतो.शरीरामध्ये आढळणाऱ्या संप्रेरकांचा घटक आहे. फॉस्फरस शरीरातील ऊर्जा, कर्बोदके, प्रथिने आणि चरबीच्या (मेद) चयापचय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

कमतरतेची लक्षणे

प्रजनन दर कमी होणे, स्त्रीबीजाची क्रिया कमी होणे, अनियमित ऋतुचक्र, कमी गर्भधारणेचे प्रमाण आणि प्रजनन संस्था परिपक्व होण्यास उशीर होतो.

कालवडीच्या रक्तामध्ये फॉस्फरसच्या कमी पातळीमुळे प्रजननक्षमता कमकुवत होते.

मुडदूस, ऑस्टियोमलेशिया होतो. हाडे कमकुवत, नाजूक आणि ठिसूळ होतात.

जनावरांमध्ये ''पायका'' आजार होतो. यामुळे भूक मंदावते. जनावरे लाकूड, हाडे, माती चघळतात.

उपाय

जनावरांच्या आहारात तृणधान्याचा समावेश करावा.

मॅग्नेशिअम

मॅग्नेशियमचा कॅल्शिअम आणि फॉस्फरसशी जवळून संबंधित आहे. हाडे आणि दातांमधील महत्त्वपूर्ण संप्रेरक आहे. मॅग्नेशिअम कर्बोदके, मेद आणि प्रथिन चयापचयामध्ये आवश्यक आहे.

कमतरतेची लक्षणे

रक्ताची कमतरता होते. यामुळे अस्वस्थता, धक्कादायक चाल आणि आकडी अशी लक्षणे दिसतात.

उपाय

आहारात गव्हाचा कोंडा, वाळलेले यीस्ट, सरकी आणि जवस पेंड यांचा वापर करावा.

पोटॅशिअम

शरीरातील आम्लाचा समतोल, ऊतीमधील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते.संप्रेरकांच्या कार्यासाठी आवश्यक आहे. स्नायूंतील प्रसारणासाठी आवश्यक आहे. पेशीमधील मुख्य धनभारित कण आहे. शरीरातील द्रव आणि ऊतिकामध्ये मोठ्या प्रमाणात साठवले जाते.

कमतरतेची लक्षणे

शरीराची वाढ मंदावते. अशक्तपणा व धनुर्वात होतो.

उपाय

खनिज मिश्रण व आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा.

क्लोरिन

जठरातील स्रावामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. हे हायड्रोक्लोरिक आम्लाच्या रूपात दिसून येतो. शरीरातील आम्ल-अल्कली समतोल नियंत्रित करते.परासरणीय दाब राखतो.ऊतिकामधील पाण्याचे चयापचय नियंत्रित करतो.

संप्रेरकांच्या कार्यकारिणीकरिता आवश्यक आहे.मज्जातंतू व स्नायूमधील वहन आणि प्रसरणाला मदत करतो. क्लोरिन क्षार शरीरद्रव आणि ऊतींमध्ये मोठ्या प्रमाणात साठवला जातो.

कमतरता लक्षणे

शरीरातील असामान्यपणे वाढलेल्या अल्कली प्रमाणाला कारणीभूत आहे.

आहारातील मिठाच्या अति प्रमाणामुळे जास्त तहान लागणे, स्नायूमधील कमकुवतपणा दिसतो.

उपाय

दैनंदिन खाद्य, हिरवा चारा पाणी, खनिज मिश्रण व आयोडीनयुक्त मिठामधून पुरवठा करावा.

आयोडीन

थायरॉईड ग्रंथीमध्ये तयार होणाऱ्या ट्राय आयोडोथायरोनीन आणि टेट्रा आयडो थायरोनीन संप्रेरकाच्या संश्लेषणामध्ये आयोडीन महत्त्वाचे आहे. थायरॉईड संप्रेरके शरीरातील अवयव व ऊतीमधील प्रक्रियांना गती देतो, चयापचय वाढते, त्यामुळे ऑक्सिजनचा वापर वाढतो.

कमतरतेची लक्षणे

थायरॉईड ग्रंथीची वाढ होते. थायरॉईड ग्रंथी मानेमध्ये स्थित असल्याने कमतरता असताना मानेवर सूज येते. गर्भधारणा दर आणि गर्भाशयाची क्रिया कमी होते.

प्रजननक्षम मादींमध्ये दडपलेला माज गर्भपात, मृत वासराचा जन्म , वार आडकण्याचे प्रमाण वाढते. गर्भधारणेच्या कालावधीत वाढ होते. थायरॉइड कमी झाल्यामुळे प्रजननक्षमतेतील बिघाड, नवजात वासरे कमकुवत, केसहीन व मृत जन्मास येतात.

उपाय

आहारामध्ये समुद्र वनस्पती, आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा.

लोह

शरीरातील ९० टक्क्यांहून अधिक लोह-प्रथिनांच्या संयोगाने आढळते. विशेषतः हिमोग्लोबीन आणि मायोग्लोबीन.

कमतरतेची लक्षणे

अॅनिमिया, भूक मंदावणे आणि शरीराची कमी वाढ ही लक्षणे दिसतात. प्रजननक्षमतेवर परिणाम होतो.जनावर वारंवार उलटते, गाभण रहात नाही. प्रत्येक गर्भधारणेसाठी कृत्रिम रेतन/नैसर्गिक रेतानाची संख्या वाढते, गर्भपात होतो.

वेगाने वाढणाऱ्या दूधपित्या जनावरांमध्ये अशक्तपणा आढळतो. कारण दुधामध्ये लोहाचे प्रमाण अत्यंत कमी असते.

उपाय

आहारात शेंगा, डाळी आणि पेंड, तृणधान्याच्या पेंडीचा वापर करावा. फेरस सल्फेट संयुग, आयर्न डेक्स्टन आणि लोहयुक्त गोळ्या उपलब्ध आहे.

कॉपर

शरीरातील उत्प्रेरक कार्यासाठी तांबे महत्त्वाचे आहे.

कमतरतेची लक्षणे

कमी पशुउत्पादन कार्यक्षमता आणि कमी गर्भधारणेचे प्रमाण होते. लोह शोषण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे अशक्तपणा येतो. पूर्ण लकवेपणा, अडखळती चाल ज्यात विशेषतः मागील पाय प्रभावित होतात. अपुरी वाढ, हाडांचे विकार, जठर व आतड्यातील आजार व नपुंसकत्व येते. गर्भमृत्यू, गर्भाचे पुनरुत्थान, वार अडकून गर्भाशयात सडणे इ. परिस्थिती उद्भवतात.

अतिमात्रा : कावीळ,भूक न लागणे,यकृताच्या कोमामुळे मृत्यू.

उपाय

तांब्याच्या सेंद्रिय संयुगाचा आहारात वापर करावा. तांबेयुक्त क्षार चाटण विटा वापराव्यात.

कॅल्शिअम

शरीरातील ९९ टक्के कॅल्शिअम हाडे आणि दातांमध्ये असते.मज्जातंतू आणि स्नायूंच्या उत्तेजना नियंत्रण करते. स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसारणामध्ये महत्त्वपूर्ण आहे. रक्त सामान्यपणे गोठण्यासाठी आवश्यक आहे. दुधामधील प्रमुख घटक आहे.

कमतरतेची लक्षणे

मुडदूस होतो. चुकीची वाढलेली हाडे, सांधे वाढणे, लंगडेपणा, दुबळेपणा व अचलपणा वाढतो. प्रौढ जनावरांच्यामध्ये ऑस्टियोमलेशिया आजार होतो. हाडे कमकुवत आणि नाजूक होतात. दुभत्या जनावरांच्यामध्ये दुग्धज्वर होतो.

गर्भाशयातील स्नायूंवर प्रतिकूल परिणाम होतो. प्रसूतीचा कालावधी दीर्घकाळ होतो. वार अडकून राहण्याचे प्रमाण वाढते. गर्भाशयाचा दाह होतो. माज न येणे, गाभण न राहणे, इत्यादी समस्या दिसतात.

उपाय

हिरवा चारा विशेषत: शेंगायुक्त वनस्पती कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत.

डॉ. एस. एस. रामटेके, ९७६३९६३२७०, (पशुवैदक आणि पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि.लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT