Buffalo Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Mineral Admixture : गाई, म्हशींच्या आहारामध्ये खनिज मिश्रण

Team Agrowon

डॉ. सोमेश गायकवाड, डॉ. महेश जावळे

Animal Care Management : काही पशुपालक दुभत्या गाई,म्हशींना प्रसूतिपूर्व काळात अतिरिक्त कॅल्शियमचा पुरवठा करतात, यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे असंतुलन होऊन, याचे वेळीच नियंत्रण केले नाही तर त्याचा दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण गाई,म्हशींची शारीरिक अवस्था, दूध उत्पादन, एकूण आवश्यकता यावर अवलंबून असते.

ॲनायोनिक मिश्रण खादयपूरक तंत्रज्ञान राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेतील पशू पोषण आहार विभागाने विकसित केले आहे. हे खादयपूरक तीन आठवडे प्रसूतिपूर्व काळामध्ये दिल्यास दूध उत्पादन आणि आजार प्रतिकारक क्षमता वाढून निरोगी ठेवण्यात मदत करते.

जास्त दूध देणाऱ्या गाई,म्हशींमध्ये शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्यामुळे दुग्ध ज्वर प्रसूती अडथळे, जार उशिरा पडणे, कासदाह, मायांग बाहेर येणे, गर्भाशयाचा प्रादुर्भाव होतो.

कॅल्शिअम कमतरतेमुळे दूध काढण्यापूर्वी आणि नंतर टीट स्फिंक्टर उघडणे आणि बंद होण्याची क्रिया बाधित होते, त्यामुळे सड ग्रंथीमध्ये जिवाणूंचा प्रवेश होऊन कासदाह होतो.

गाय वेतात नसताना (भाकड काळात), कॅल्शिअमची आवश्यकता सुमारे १०-१२ ग्रॅम प्रति दिन असते. कॅल्शिअमची गरज अधिक नसल्यामुळे यावेळी हाडांमधील कॅल्शिअम रक्तामध्ये शोषून घेण्याची नैसर्गिक वहन यंत्रणा तुलनेने निष्क्रिय असते.

यावेळी शरीरातील पॅराथायरॉईड ग्रंथीची क्रिया मंदावलेली असते. परंतु प्रसूतीनंतर, कॅल्शिअमची आवश्यकता रक्तप्रवाहातील पुरवठ्यापेक्षा १० पट जास्त असते, जी फक्त आहारातील कॅल्शिअमची पातळी वाढवून पूर्ण करता येत नाही.

गाभण गाई, म्हशींना प्रसूतीच्या किमान ३ आठवडे आधी थोडेसे ऋण भार असलेले खाद्य घटक आहारात दिल्यास चयापचय आम्लदाह सौम्य प्रमाणात निर्माण होतो आणि हाडांमधून कॅल्शिअम आणि फॉस्फरस शोषून रक्तात वहन करण्याची यंत्रणा कार्यान्वित होते, ज्यामुळे कॅल्शिअमची वाढलेली मागणी पूर्ण होते. रक्तातील कॅल्शिअमचे संतुलन राखले जाते. त्यामुळे व्यायल्यानंतर चिकावाटे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाले तरी हाडातील कॅल्शिअम रक्तात निरंतर येत राहिल्याने दुग्धज्वर आजारास होतो.

खनिज मिश्रण

जनावरांच्या आहारातील कॅटायन (धन भार) ॲनायन (ऋण भार) संतुलन (डी कॅड) राहण्याकरिता प्रसूतिपूर्व जनावरांच्या आहारामध्ये अॅनायोनिक क्षार (क्लोराईड, सल्फर किंवा फॉस्फरस क्षार) पुरवठा केल्याने ही परिस्थिती टाळता येते.

सामान्यतः दुभत्या गाईच्या आहारामध्ये डी कॅडचे प्रमाण +१०० ते +२०० एम ईक्यू प्रती किलो शुष्क भाग असते. आहारात ॲनायोनिक क्षार खनिज पुरविल्याने डी कॅड प्रमाण घटते आणि सुप्त दुग्धज्वर आजाराचे प्रमाण कमी होते.

तीन आठवडे प्रसूतिपूर्व काळामध्ये गाईंच्या आहारामध्ये ॲनायोनिक क्षार ५० ग्रॅम दिवसातून दोनदा किंवा १०० ग्रॅम दिवसातून एकदा या प्रमाणात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पुरवावे.

मिश्रण देण्यासाठी संपूर्ण एकत्रित आहाराचा (टोटल मिक्स राशन) अवलंब करावा किंवा हे क्षार खुराकासोबत मिसळून दिल्यास स्वादिष्टता वाढते. खुराकामध्ये हे क्षार वेळेवर मिसळण्याऐवजी आधी मिसळल्यास त्याची जैवउपलब्धता अधिक आढळून येते.

ॲनायोनिक क्षार पशू खाद्यात मिसळून दिल्यास सौम्य आम्लदाह होऊन रक्ताची आम्लता कमी होते. पॅराथायरॉईड ग्रंथींची संवेदनशीलता तीव्र होऊन हाडातील पेशींची क्रिया वाढते. हाडातील कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे रक्तात वहन वाढते. रक्तातील हे प्रमाण वाढल्यामुळे किडनी कार्यशील होऊन जीवनसत्त्व डी-३ निर्मितीस चालना मिळते. तसेच जीवनसत्त्व डी -३ आतड्यातून कॅल्शिअम शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढवते. त्यामुळे रक्तातील कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढून दूध उत्पादन वाढीस चालना मिळते.

फायदे

दुग्धज्वर हा आजार मुख्यत्वे जास्त दूध उत्पादन असणाऱ्या संकरित गाई व म्हशींमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आढळतो. व्यायल्यानंतर ४८ तासांच्या आत अचानक कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. व्यायल्यानंतर १ ते ३ दिवसांत लक्षणे दिसण्यास सुरवात होते. ॲनायोनिक मिश्रण ३ आठवडे प्रसूतिपूर्व देऊन दुग्धज्वराचे प्रमाण ६५ टक्यांनी कमी करता येऊ शकते. ॲनायोनिक क्षार दिल्यास फॉस्फरसचे प्रमाण वाढून प्रसूती प्रक्रिया सुरळीत होते. खाद्य

सेवन आणि दूध उत्पादनात वाढ होते.

कॅल्शिअम आणि फॉस्फरसचे रक्तातील संतुलन योग्य प्रमाणात असल्यामुळे ऑक्सिटोसिन संप्रेरक कार्यान्वित होऊन प्रसूतीत होणारे अडथळे आणि गाभ उलटणे या समस्या कमी होतात.

- डॉ. महेश जावळे, ९२७३७३००१५, (सहाय्यक प्राध्यापक, पशुपोषण शास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय,नागपूर)

- डॉ. सोमेश गायकवाड, ८८३०६६९६५६, (राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था,कर्नाल, हरियाना)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT