Livestock Market | Livestock Market Prices |
Livestock Market | Livestock Market Prices |  Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Market : जनावरांच्या बाजार बंदचा दूध उत्पादकांना फटका

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर ः लम्पी स्कीनची बाधा (Lumpy Skin) सुरु झाल्यानंतर त्याचा वाढता वेग पाहून प्रशासनाने जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बंद (Livestock Market) केले. तीन महिन्यांपासून बाजार बंद असल्याचा मोठा फटका दूध उत्पादकांना (Milk Producer) बसला आहे. नगर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बंद असल्याने तीन महिन्यांत सुमारे ३५० कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल थांबली, शिवाय स्थानिकांचा रोजगारही (Employment) बुडाला आहे. बाजार व वाहतूक बंद असल्याने जनावरांच्या दरातही सुमारे ३० टक्क्यांनी घट झाली आहे.

नगर जिल्ह्यात लोणी (ता. राहाता), काष्टी (ता. श्रीगोंदा) हे बाजार गाईंसाठी प्रसिद्ध आहेत. घोडेगाव (ता. नेवासा) येथे गाई-म्हशींची खरेदी-विक्री होत असली तरी हा बाजार म्हशींसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय वाळकी, राशीन, जामखेड, शेवगाव, कोपरगाव, संगमनेर, अकोले, पाथर्डी, श्रीरामपूर या ठिकाणच्या बाजारात काही प्रमाणात जनावरांचे व्यवहार होतात.

महाराष्ट्र व शेजारच्या राज्यातून या बाजाराच्या ठिकाणी व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यामुळे स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांच्या जनावरांना चांगला दर मिळतो. लोणी, काष्टी आणि घोडेगावच्या बाजारातच दर महिन्याला सुमारे पंधरा ते सतरा हजार जनावरांची खरेदी-विक्री होते. ही खरेदी-विक्री ठप्प आहे. जिल्ह्यात पंधरा लाख १० हजार जनावरांना लसीकरण केले. मात्र तरीही लम्पी स्कीनची बाधा होण्याचे प्रमाण थांबत नाही.

गाईंचे दर घटले

राज्यात गेल्या महिनाभरापासून दूध उत्पादकांना चांगले दिवस येत आहेत. दुधाच्या दरात वाढ होत असली तरी लम्पी स्कीनमुळे या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. आजार आणि त्यात बाजार बंदीमुळे खरेदी-विक्रीत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. आपसूकच गाईंचे दर पडले आहेत. ८० हजार ते एक लाख रुपये किमतीची दुभती गाय ५५ ते ६० हजाराला खरेदी करावी लागत आहे. म्हशीच्या दरातही २० टक्के घट झाली आहे.

बाजार बंदचे परिणाम

- प्रत्येक बाजारावर अवलंबून १०० ते २०० स्थानिक कुटुंबांचा रोजगार बुडाला

- वाहतूक बंदीने सुमारे १० हजार वाहन चालकांचे नुकसान

- बाजार समित्यांना करातून मिळणाऱ्या दीड ते दोन कोटींचे नुकसान

- एक हजार चारा विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान

- गाईंची खरेदी न करता आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

लोणीच्या गाईंच्या बाजारात दरवेळी १००० ते १२०० गाईंची खरेदी- विक्री होते. तीन महिन्यांपासून बाजार बंद आहेत. शेतकऱ्यांना यामुळे अडचणी येत असून बाजार सुरु करावेत.
उद्धव देवकर, सचिव, बाजार समिती, राहाता.
घोडेगावचा बाजार म्हशीसाठी प्रसिद्ध आहे. येथे गाई व म्हशी मिळून सुमारे एक हजाराच्या आसपास जनावरांची खरेदी-विक्री होते. बाजार बंद असल्याने आर्थिक नुकसान झाले.
देवदत्त पालवे, सचिव, बाजार समिती, घोडेगाव, ता. नेवासा.
लम्पी स्कीन आणि जनावरांच्या बाजार बंदचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ३० ते ३५ टक्क्यांनी गाईंचे दर पडले आहेत.
संतोष धसाळ, दूध उत्पादक शेतकरी, तांदूळवाडी (ता. राहुरी).
अटी आणि शर्तीवर म्हशीचे बाजार सुरु करण्याला परवानगी दिली जात आहे. बाजार बंदमुळे निश्‍चितच परिणाम झाला आहे.
डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त, नगर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT