Goat Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : शेतकरी नियोजन - शेळीपालन

शेती उत्पन्नाला जोड म्हणून २०१४ मध्ये गावरान आणि उस्मानाबादी अशा १० शेळ्या खरेदी करून शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली.

टीम ॲग्रोवन

शेतकरी ः विनायक उत्तमराव ढोले

गाव ः वडाळी, ता. जिंतूर, जि. परभणी

एकूण शेळ्या ः १५०, बोकड ५

शेळ्यांच्या जाती ः उस्मानाबादी, शिरोरी, गावरान

आमची वडाळी येथे १५ एकर शेती आहे. त्यामध्ये खरीप हंगामात सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton), हळद (Turmeric) ही पिके, तर रब्बीत गहू, ज्वारी, हरभरा ही पिके असतात. उन्हाळी हंगामात भुईमूग पीक घेत असतो. शेती उत्पन्नाला जोड म्हणून २०१४ मध्ये गावरान आणि उस्मानाबादी अशा १० शेळ्या खरेदी करून शेळीपालन (Goat Rearing) व्यवसायाला सुरुवात केली. त्या वेळी ५८ हजार रुपये गुंतवले होते. शेतातील आखाड्यावर शेळ्यांसाठी निवारा उभारला. चाऱ्यावरील खर्चात बचत करण्यासाठी सुरुवातीपासूनच अर्ध-बंदिस्त पद्धतीचा अवलंब केला आहे.

पहिल्या वर्षी १८ बोकडांच्या विक्रीतून ६० हजार रुपये मिळाले. म्हणजेच शेळीपालनासाठी गुंतवलेले भांडवल मोकळे झाले. त्यामुळे उत्साह दुणावला. २०१५ मध्ये आणखी ३५ शेळ्या खरेदी केल्या. हळूहळू जमनापारी, सिरोही, काश्मिरी, तोतापरी अशा विविध जातीच्या शेळ्या खरेदी करत संख्या वाढवली. या वाढलेल्या शेळ्यांसाठी नवीन मोठ्या आकाराचा निवारा तयार केला. त्यातच जागेवर चारा, पाण्याची सुविधा तयार केली.

सुविधायुक्त निवारा...

- शेतातील आखाड्यावरील ९० बाय १२० फूट आकाराच्या जागेला तारेचे कुंपण केले. त्यामध्ये ४० बाय १२० फूट आकाराचा पत्र्यांचा निवारा उभारला. त्यामध्ये शेळ्या व कोकरांसाठी वेगवेगळे कप्पे तयार केले. बोकडांसाठी स्वतंत्र निवारा तयार केला आहे.

चारा पाण्याची व्यवस्था ः

-शेळ्यांच्या चाऱ्यासाठी एक एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे. त्यात विविध प्रकारच्या गवताची लागवड केली आहे. तसेच कडवळ असतो. शेतातून सोयाबीनचा भुस्सा, भुईमुगाचे कुटार इ. बाबीही उपलब्ध होतात.

-चारा साठविण्यासाठी दीड हजार चौरस फूट आणि २२ फूट उंचीचे गोदाम पत्र्यांच्या साह्याने उभारले आहे. त्यामध्ये सोयाबीन व अन्य पिकांचा भुस्सा आणि कडबा इ. साठवले जाते.

- कडबा कुट्टी आणि भरडा निर्मिती यंत्र घेतले आहे.

-शेळ्यांच्या निवाऱ्यामध्ये चारासाठी कप्प्यासमोरच टीनपत्र्याचे ट्रे लावले आहेत. शेजारीच प्लॅस्टिकच्या टोपल्या असून, त्यात नळाची तोटी सोडलेली आहे.

-निवाऱ्या शेजारी पाण्यासाठी सिमेंटचा हौद बांधला आहे.

-विविध पिकांच्या भुस्सा, कडबा कुट्टी आणि त्यासोबत सोयाबीन, गहू, मका आदी धान्ये मशिनद्वारे भरडून शेळ्यांना खाद्य म्हणून दिला जातो.

-सर्व शेळ्यांना इयर टॅगिंग केलेले आहे. त्यानुसार प्रत्येक शेळीच्या माहितीची नोंद ठेवली जाते.

-लाळ्या खुरकत आणि अन्य रोग प्रतिबंधक लसीकरण केले जाते.

-दर दीड महिन्याने जंतनाशक औषध दिले जाते.

शेताशेजारी माळरान असल्यामुळे शेळ्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा आहे. सकाळी ८ ते १० आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत शेळ्या शेताजवळील माळावर चरायला मोकळ्या सोडल्या जातात.

शेतातूनच होते विक्री...

-शेळी -बोकडाची वजनावर विक्री केली जाते. व्यापारी शेतमधूनच शेळ्या -बोकड खरेदी करतात. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटा बसवला आहे.

- आवश्यकतेनुसार परभणी, बोरी, येलदरी (जि. परभणी), मंठा (जि. जालना) येथे भरणाऱ्या बाजारामध्ये शेळ्या विक्रीसाठी नेल्या जातात.

- बकरी ईदनिमित्त बोकडाची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. त्या वेळी शेळीच्या जातीनुसार वेगवेगळे दर मिळतात. यंदा बकरी ईदला ३० बोकडांची विक्री झाली. प्रतिकिलो ४०० रुपये दर मिळाला.

- मनुष्यबळ नियोजन ः मुलगा अजय हा व्यवसायात मदत करतो. तसेच एक सालगडी आणि एक महिला मजूर असते.

लेंडी खत मिळते. उन्हाळ्यामध्ये मोकळ्या शेतामध्ये शेळ्या बसविल्या जातात. यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहे.

रासायनिक खतांचा वापर देखील निम्म्यावर आला आहे.उत्पादनात वाढ झाली आहे.

गेल्या महिनाभरातील कामे...

-पावसाळ्यापूर्वी ईटीव्ही लसीकरण (लाळ्या खुरकूत प्रतिबंधक) लस दिली.

-सुका चारा साठवून ठेवला.

- बकरी ईदसाठी विक्रीचे नियोजन होते. त्या प्रमाणे चांगली विक्री झाली.

पुढील नियोजन...

- ५० नर मादी पिले विक्रीसाठी तयार आहेत.

-महिनाभरात बोकडांची विक्री होईल. विक्रीपूर्वी १५ दिवस बोकडांना वेगळे ठेवले जाते. या काळात त्यांना गहू, मक्याचा भरडा खुराक म्हणून दिला जातो. त्यामुळे त्यांच्या वजनात चांगली वाढ होते. त्वचेवर चकाकी येते. यामुळे चांगले दर मिळण्यास मदत होते.

विनायक ढोले ः ९५२७८३६६८६

(शब्दांकन ः माणिक रासवे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

Maharashtra Election Result : ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महायुतीला!

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

SCROLL FOR NEXT