Dairy Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Dairy Farming: गोपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनावर भर

Livestock Management: धाराशिव जिल्ह्यातील वाघोली शिवारात आनंद सतीश खडके या उच्चशिक्षित तरुणाने शेतीला गोपालनाची जोड दिली आहे. श्री. खडके यांचे एकत्रित कुटुंब असून चुलत भाऊ सुशिल यांच्या साथीने आनंद हे ३५ जनावरांचा गोठा सांभाळतात.

विकास गाढवे

Dairy Farming Management:

शेतकरी नियोजन । गोपालन

शेतकरी : आनंद सतीश खडके

गाव : वाघोली, ता. जि. धाराशिव

एकूण शेती : ३० एकर

एकूण जनावरे : ३५ (गाई १२, कालवडी २३)

धाराशिव जिल्ह्यातील वाघोली शिवारात आनंद सतीश खडके या उच्चशिक्षित तरुणाने शेतीला गोपालनाची जोड दिली आहे. श्री. खडके यांचे एकत्रित कुटुंब असून चुलत भाऊ सुशिल यांच्या साथीने आनंद हे ३५ जनावरांचा गोठा सांभाळतात. गोपालन व्यवसायात खाद्य, पाणी, गोठा, व्यवस्थापनावर भर देऊन गाईंचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी प्रयत्न केले जातात. सध्या उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात गायींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यानुसार व्यवस्थापन पद्धतीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले आहेत, असे आनंद खडके सांगतात.

श्री. खडके कुटुंबाची वाघोली शिवारात तीस एकर शेती आहे. त्यात आधी फळबाग व भाजीपाला लागवड होती. जोडधंदा म्हणून शेळीपालन केले जात असे. मात्र, आनंद यांनी विविध ठिकाणच्या गोपालनाच्या गोठ्यांना भेटी देऊन माहिती घेण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये हरियानातून सहा एचएफ गाई आणत व्यवसायाची सुरुवात केली. योग्य व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करत गोठ्यातील गायींची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवीत नेली. व्यवसायात सुरुवातीपासूनच अभ्यासपूर्ण व्यवस्थापनावर भर देत आरोग्य आणि खाद्यावर भर देत दुग्धव्यवसाय यशस्वी केला आहे.

गाईंसाठी मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली. मुक्त संचार गोठ्यात लहान कालवडी, मोठ्या कालवडी, गाभण गाई व दुभत्या गाई असे विविध केले आहेत. त्यात स्वतंत्र संगोपन करत खाद्य व आरोग्य व्यवस्थापनावर भर दिला जातो. सध्या गोठ्यातील ९ गाई दुभत्या आहेत. दररोज साधारणपणे १८० लिटर दूध उत्पादन मिळते. दुग्ध व्यवसायात केवळ दुधाच्या उत्पादनावर भर न देता गोठ्यातच गुणवत्तापूर्ण गाईंच्या पैदास करण्यावर लक्षकेंद्रित केले आहे. गोठ्यामध्येच पैदास कार्यक्रम राबवून या गाईंपासून पैदास करत गेले. सोशल मिडियाच्या माध्यमातून गाईंची विक्री केली जाते. व्यवसायात कुटुंबातील सर्व सदस्यांची मदत होते, असे आनंद खडके सांगतात.

व्यवस्थापनातील बाबी

गाईंचे संगोपनासाठी १०० बाय १५० फुटाच्या शेडच्या मध्यभागी मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली आहे.

गोठ्यामध्ये विविध विभाग करण्यात आले आहेत. त्यात लहान कालवडी, मोठ्या कालवडी, गाभण गाई व दुभत्या गाईसाठी स्वतंत्र विभाग आहेत.

मुक्त गोठ्यात गाईंना चारा खाण्यासाठी सिमेंटची गव्हाण तयार केली आहे. जेणेकरून गाईंना दिलेला चारा वाया जाणार नाही. आणि प्रत्येक गाईला पुरेसा चारा, खाद्य उपलब्ध होईल. चारा खाऊन गाई गोठ्यात मुक्तपणे फिरून सावलीत जाऊन बसतात. त्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे गाईंना एकाच ठिकाणी चारा, पाण्याची सोय करण्यात आली आहे.

दररोज सकाळी साडेचार वाजल्यापासून गोठ्यातील कामांना सुरुवात होते. सुरुवातीला शेण काढून जनावरांना खुराक दिला जातो. त्यानंतर मिल्किंग मशिनच्या मदतीने दूध काढले जाते. उत्पादित दूध गावातील खासगी डेअरीमध्ये पाठविले जाते. ही सर्व कामे सकाळी दहापर्यंत पूर्ण केली जातात.

गोठ्यातील दैनंदिन व्यवस्थापनात आरोग्य, स्वच्छता आणि खाद्यावर विशेष भर दिला जातो.

गाईंना दररोज कडबा कुट्टी उपलब्ध होण्यासाठी दिवसातून दोनवेळा नियमितपणे चाऱ्याची कुट्टी केली जाते.

लसीकरण, गाभणकाळ आदी बाबींची तपशीलवार नोंद ठेवली जाते. नोंदी ठेवल्यामुळे गायींच्या आरोग्याची माहिती आणि वेतनकाळ याबाबत योग्य माहिती मिळण्यास मदत होते.

गोठ्यातून दरवर्षी साधारणपणे ३१ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. उत्पादित खताची विक्री न करता घरच्या शेतीमध्ये त्याचा वापर केला जातो.

आरोग्यावर भर

गोठ्यातील प्रत्येक गाईचे नियमितपणे निरिक्षण केले जाते. गाईच्या हालचालींमध्ये, खाद्य, पाणी पिण्याच्या सवयीमध्ये काही बदल दिसून आल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास संपर्क केला जातो.

नियमितपणे प्रत्येक गाईंचे विविध आजारांचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. त्यामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.

पशुसंवर्धन अधिकारी व पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण व उपचार करण्यास प्राधान्य दिले जाते.

गोठ्यातील पैदास योग्य होण्यासाठी पशुवैद्यक अधिकऱ्यांकडून कृत्रिम रेतन भरण्यावर भर दिला जातो.

दूध उत्पादन, विक्री

सध्या गोठ्यातील ९ गाई दुभत्या आहेत. दररोज साधारणपणे १८० लिटर दूध उत्पादन मिळते. उत्पादित सर्व दुधाची विक्री केली जाते. एका गाईपासून एका वेळेला किमान दहा ते कमाल १९ लिटरपर्यंत दूध उत्पादन होते.

मागील वर्षी पावसाळ्यात ५० टन मुरघास पावसात भिजल्यामुळे खराब झाला. त्यामुळे चाऱ्याची गुणवत्ता ढासळली. परिणामी दूध उत्पादनात घट आली. हा अनुभव गाठीशी असल्याने गाईंच्या खाद्याचे योग्य नियोजनावर करण्यावर भर दिला जातो. चारा भिजणार नाही यासाठी काळजी घेतली जाते. येत्या काळात पैदाशीवर भर देत गाईंची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे आनंद खडके यांनी सांगितले.

चारा, पाणी व्यवस्थापनावर भर

गाईसाठी चारा आणि पाण्याचे नियमितपणे पूर्वनियोजन केले जाते. प्रत्येक जनावराला त्याचा आकारानुसार आणि वयानुसार निरीक्षण करून आवश्यक तितकाच चारा व पाणी दिले जाते.

दर्जेदार चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी शेतामध्ये संकरित नेपिअर आणि अन्य चारा पिकांची लागवड केली आहे. याशिवाय सोयाबीन, हरभरा व गव्हाचा भुसा दिला जातो.

वर्षातून दोनवेळा दोन एकर क्षेत्र राखीव ठेवून त्यात मुरघासासाठी मका लागवड केली जाते. दरवर्षी सुमारे दीडशे टन मुरघास तयार केला जातो.

गायीला दररोज दिल्या जाणाऱ्या चाऱ्यातून सर्व पोषक घटकांचा पुरवठा होत नाही. त्यासाठी खुराकाच्या माध्यमातून पोषक घटकांची गरज भागविली जाते. गाईंना प्रतिदिन दोनवेळा प्रत्येकी पंधरा किलो खाद्य देण्याचे नियोजन असते. त्यात मुरघास, भुसकट, हिरवा चारा, खुराक दिला जातो.

पिण्यासाठी स्वच्छ उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. त्यासाठी हौद बांधले असून त्या ठिकाणी जाऊन गाई पाणी पितात.

गाभण गाई आणि नवजात वासरांची स्वतंत्र काळजी घेतली जाते. गाभण गाईंना पुरेसा आहार आणि पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नवजात वासरांचे सुरुवातीचे काही दिवस स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते.

- आनंद खडके ८३०८२८१५९२

(शब्दांकन : विकास गाढवे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jackfruit Farming : कोकणात प्रक्रियेतून फणसाला मिळतेय नवी झळाळी

AI In Sugar cane: ऊस लागवडीत ‘एआय’ तंत्र वापरणार

Local Self Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

SCROLL FOR NEXT