Goat Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : शेड स्वच्छ अन् कोरडे राखण्यावर भर

Goat Rearing : हातकणंगले (जि. कोल्हापूर) तालुक्यातील नेज गावामध्ये सौ. उज्ज्वला चव्हाण शेळीपालन व्यवसाय करतात. भाडेतत्त्वावरील जागेत त्यांनी शेळीपालनासाठी पत्रावजा शेड उभारले आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Goat Farming Management :

शेतकरी नियोजन

शेळीपालन

शेतकरी : सौ. उज्ज्वला शशिकांत चव्हाण

गाव : नेज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

एकूण शेती : १३ गुंठे

एकूण शेळ्या : ४०

हातकणंगले (जि. कोल्हापूर) तालुक्यातील नेज गावामध्ये सौ. उज्ज्वला चव्हाण शेळीपालन व्यवसाय करतात. भाडेतत्त्वावरील जागेत त्यांनी शेळीपालनासाठी पत्रावजा शेड उभारले आहे. उज्ज्वला यांचे पती शशिकांत हे मिलमध्ये वायरिंगचे काम करत होते. मिल बंद झाल्यानंतर कुटुंबाच्या चरितार्थाचा प्रश्‍न उभा राहिला. घरची केवळ १३ गुंठे शेती. त्यामुळे शेती उत्पन्नातून कुटुंबाचा आर्थिक खर्च कसा भागवायचा, हा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी विविध शेतीपूरक उद्योगांचा अभ्यास केला. सर्व पूरक व्यवसायांची चाचपणी केल्यानंतर शेळीपालनाचा पर्याय त्यांना योग्य वाटला. सुरुवातीची काही वर्षे स्थानिक जातींच्या शेळ्यांचे संगोपन केले. परंतु यात फारसा नफा राहत नसल्याने व्यवसायवृद्धीसाठी बीटल जातीच्या शेळ्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. बारा वर्षांपूर्वी एका शेळीपासून सुरू झालेला शेळीपालन व्यवसाय आज ४० शेळ्यांपर्यंत पोचला आहे. सध्या शेडमध्ये बीटल जातीच्या १५ शेळ्या, तीन बोकड आणि २२ करडे आहेत.

शेडमध्ये स्वतंत्र कप्पे

शेळ्यांसाठी अत्यंत कमी खर्चात ३० बाय ६० फुटांचे पत्र्याचे शेड उभारले आहे. सध्या शेळ्यांचा गोठा भाड्याच्या जागेत आहे. त्याला वर्षाला २० हजार रुपये प्रमाणे भाडे दिले जाते.

शेडमध्ये कप्पे तयार करण्यात आले आहे. त्यात वजनानुसार शेळ्यांचे वर्गीकरण केले आहे. मोठ्या शेळ्यांची स्वतंत्र व्यवस्था, छोट्या करडांसाठी फिरते कप्पे तसेच गाभण शेळ्या व बोकडांसाठी स्वतंत्र कप्पे केले आहेत.

शेडच्या मध्यभागी गव्हाण असून पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली आहे.

आहार व्यवस्थापन

शेळ्यांना दिवसातून प्रत्येकी दोन वेळा चारा आणि खुराक दिला जातो.

तूर भुस्सा, हरभरा भुस्सा, मका, गहू, शेंगदाणा यांचा खुराक दिला जातो.

ओल्या चाऱ्यांमध्ये हत्ती गवत, मका आदींचा समावेश असतो.

प्रत्येक शेळीला एक किलो खुराक, तीन किलो कोरडा चारा आणि तीन किलो ओला चारा देण्याचे नियोजन असते.

दररोज सकाळी आठ वाजता खुराक, अकरा वाजता हिरवा चारा, बारा वाजता पाणी आणि तीन वाजता पुन्हा चारा असे नियोजन असते.

शेळ्यांना चारा उपलब्ध होण्यासाठी स्वतः च्या शेतामध्ये तुती, शेवरी लागवड करण्यात आली आहे.

कामांची विभागणी

शेळीपालनामध्ये उज्ज्वलाताईंना घरातील प्रत्येक सदस्य मदत करतात. उज्ज्वलाताईंकडे गोठा स्वच्छता, करडांच्या दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी असते. पती शशिकांत चाऱ्याची व्यवस्था करतात. गौरव आणि अभिजित ही दोन्ही मुले शेळी, बोकड विक्रीचे नियोजन सांभाळतात. मुलगी मोनिका ही देखील दैनंदिन कामांमध्ये मदत करते. घरातील सर्व सदस्य शेडमधील कामांत आवडीने सहभाग घेत असल्याने शेडमधील प्रत्येक शेळीवर विशेष लक्ष ठेवले जाते. त्यामुळे आजारी शेळ्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन त्वरित करणे शक्य होते, असे उज्ज्वलाताई सांगतात.

पावसाळी व्यवस्थापन

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेडमधील प्रत्येक शेळीला प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतले आहे. पावसाळ्यात मुख्यतः गोचिड व पिसूचा त्रास होतो. त्यावरही उपाययोजना केल्या आहेत. शेड कायम स्वच्छ आणि कोरडे राखण्यावर भर देत आहे.

सोशल मीडियावरून विक्री

सुरुवातीच्या काळात स्थानिक बाजारामध्ये शेळी, बोकडांची विक्री केली जात असे. हळूहळू बाजारात संपर्क झालेले काही ग्राहक थेट शेडवर येऊन शेळ्यांची खरेदी करू लागले. मागील पाच वर्षांपासून मुलगा अभिजित, गौरव यांच्या मदतीने उज्ज्वलाताईंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेळ्या, बोकडांची विक्री करण्यास प्राधान्य दिले आहे. नवीन पिले तयार झाल्यानंतर लगेच त्यांचे फोटो, व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. त्यातून आजूबाजूच्या गावातील ग्राहकांना शेडमधील शेळ्या आणि बोकडांची माहिती मिळत जाते. त्या माध्यमातून ग्राहक स्वतः फोन करून खरेदी करण्यासाठी शेडवर येतात. कोल्हापूर, मिरज रेल्वे स्थानकावरून शेळ्या, बोकड विविध ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून जातात. विक्रीवेळी ग्राहकाकडून सुरुवातीला पाच हजार रुपयांची रक्कम टोकण म्हणून घेतली जाते. ग्राहकाला शेळी किंवा बोकड पाठवत असल्याचे छायाचित्र पाठवले जाते. तिकिटाचे फोटोही पाठवले जातात. त्यानंतर ग्राहक पैसे पाठवतो. पैसे मिळाल्यानंतर शेळ्या किंवा बोकड हे रेल्वेतून पाठवले जातात. सोशल मीडिया हा त्यांच्या शेळ्यांच्या विक्रीचा आता मुख्य मार्ग बनला आहे. ‘समर्थ गोट फार्म’ या नावाने यू-ट्यूब चॅनेल, फेसबुकद्वारे ते शेळ्यांची विक्री करत आहेत. विशेष म्हणजे शेळी, बोकडांची विक्री मटणासाठी न करता पैदाशीसाठी जास्त प्रमाणात होते, असे उज्ज्वलाताई सांगतात.

सौ. उज्ज्वला चव्हाण, ९३२५९३९९९७, ८०८०७२९३८३, (शब्दांकन : राजकुमार चौगुले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT