Team Agrowon
नवीन शेतकऱ्याने कमीत कमी दहा शेळीपालनाच्या गोठ्यांना भेटी देऊन माहिती घ्यावी. त्यामुळे पुढील चुका टाळणे शक्य होईल.
शासकीय किंवा शासकीय नोंदणीकृत शेळीपालन प्रशिक्षण केंद्राकडून प्रशिक्षण घ्यावे. यामुळे शेळी पालनातील अडचणी अगोदरच समजतील. आपल्याला ज्या गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे अशा गोष्टी आपल्याला कळतील.
आपली आर्थिक स्थिती, शेड आणि चारा पिकांसाठी जमीन, शेळ्यांच्या जाती, बाजारपेठेची माहिती आणि व्यवस्थापनासाठी मजूर किंवा कुटुंबातील व्यक्तींचा सहभाग याचा आराखडा करून मगच शेळीपालनास सुरवात करावी.
गोठ्याची रचना आवश्यकतेनुसार आणि आपल्याकडे असणाऱ्या वातावरणानुसार करावी. गोठा बांधताना अनावश्यक खर्च टाळावा. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होईल असा गोठा बांधावा.
शेळ्यांमध्ये दर दिवशी जातीच्या क्षमतेनुसार आवश्यक असणारी वजन वाढ होत असेल आणि गोठ्यातील वातावरणामुळे मरतूक होत नसेल तर तो गोठा चांगला समजावा. गोठ्यातील हवा खेळती असावी.
गोठ्यामध्ये चांगला सूर्यप्रकाश येणे आवश्यक आहे. यामुळे गोठ्यातील जमीन कडक उन्हात वाळते. गोठ्यात दमटपणा नसल्याने कोंदट वातावरण रहात नाही.
लेंडी आणि मूत्रामधून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन गोठ्याची स्वच्छता ठेवावी.