शेतकरी ः शांताराम कुंडलिक सुडके
गाव ः निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे
एकूण शेती ः २ एकर
-------------
Goat Farming Update : आंबेगाव तालुक्यतील निरगुडसर येथे शांताराम सुडके यांची दोन एकर शेती आहे. त्यांनी शेतीला पूरक म्हणून २००५ मध्ये शेळीपालन करण्याचे ठरविले. सुरुवातीला पाच शेळ्या आणि एक नर खरेदी केला होता. त्यासाठी शेड उभारून बंदिस्त शेळीपालन सुरू केले. परंतु शेळीपालनाचा अनुभव नसल्याने काही अडचणी आल्या. हळूहळू आलेल्या अनुभवातून आणि खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यावर मात केली. त्यातून हळहळू शेळ्यांच्या संख्येत वाढ करीत नेली. सध्या त्यांच्याकडे २० शेळ्या आणि २० मेंढ्या तर १० बोकड आहेत. त्यात प्रामुख्याने जमुनापुरी ७, सोजत २, बीटल २, सानेन ३ आणि कोटा २ अशा विविध जाती आहेत. शिवाय १० ते १२ करडे आहेत.
चारा पिकांची लागवड ः
शेळ्यांना वर्षभर चारा उपलब्ध होण्यासाठी चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी शेतात हत्ती गवत ४ गुंठे, मका २ ते ४ गुंठे यासह इतर चारा पिकांची लागवड केली जाते. आवश्यकतेनुसार चारा पिकांची कापणी करून शेळ्यांना दिला जातो. त्यामुळे शेळ्यांना दर्जेदार आणि हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
बकरी ईदसाठी बोकडाची विक्री ः
बकरी ईद या सणाच्या कालावधीत बोकडांना अधिक मागणी असते. हीच बाब ध्यानात घेऊन दरवर्षी बकरी ईदच्या वेळी अपेक्षित वजनाचे बोकड विक्रीस उपलब्ध होण्यासाठी त्यानुसार व्यवस्थापन केले जाते. या वर्षी ईद सणाच्या वेळी १० ते १५ बोकडांची विक्री केली आहे. त्यास प्रति किलो ४५० रुपये दर मिळाला. संपूर्ण विक्री थेट जागेवरूनच केली जाते. त्यामुळे बोकड बाजारात घेऊन जाण्यासाठी होणाऱ्या वाहतुक खर्चात बचत होण्यास मदत मिळते, असे शांताराम सुडके सांगतात.
खाद्य व्यवस्थापन ः
शेळ्यांना नियमितपणे मका, लसूणघास, मेथीघास दिला जातो. याशिवाय खुराकामध्ये गहू भुस्सा, सरकी पेंड, गवत, नेपिअर गवत यांचा वापर केला जातो. शेळ्यांना मुबलक आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता होण्यासाठी एक टाकी उभारण्यात आली आहेत. त्याद्वारे शेळ्यांना पाण्याची उपलब्धता केली जाते. नियमितपणे टाकीची स्वच्छता केली जाते.
मिळणारे दर ः (प्रति किलो)
जमुनापुरी मादी ः ७५० रुपये
सोजत मादी ः ५५० रुपये
बीटल मादी ः ५०० रुपये
कोटा मादी ः ४५० रुपये
सानेन मादी ः १००० रुपये
उत्पन्न ः
व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात फार चांगले उत्पन्न हाती लागले नाही. मात्र शेळ्यांची संख्या वाढवित नेल्यानंतर हळूहळू दरवर्षी उत्पन्नात वाढ मिळत गेली. सध्या दरवर्षी साधारण ६० ते ७० हजार शेळ्यांची विक्री केली जाते. यंदा ईदच्या काळात १० ते १५ बोकड आणि २ ते ४ शेळ्यांची विक्री केली आहे. शेळीपालन व्यवसायातून दरवर्षी एकूण ४ ते ५ लाख रुपयांपर्यत उत्पन्न मिळते. मजूर, चारा, खुराक यावर साधारणपणे एक ते दीड लाखापर्यंत खर्च होतो.
लेडी खताची विक्री ः
शेळीपालनातून दरवर्षी सुमारे ३० ते ३५ ट्रॉली लेंडीखत उपलब्ध होते. त्याची ५ हजार रूपये प्रति ट्रॉली या प्रमाणे विक्री केली जाते.
शेतकऱ्यांना दिले जाते माहिती ः
शेळीपालन व्यवसायात नव्याने येऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना वेळोवेळी तांत्रिक माहिती दिली जाते. यामध्ये शेळ्यांचे संगोपन, चारा पिकांचे नियोजन, लसीकरणाचे नियोजन, खाद्य, पाणी व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन आदी बाबींविषयी योग्या माहिती दिला जाते. त्यासाठी कोणतेही शुल्क ते आकारत नाहीत. विनाशुल्क शेतकऱ्यांना माहिती पुरविण्याचे काम ते करतात. आतापर्यंत त्यांनी साधारण २०० ते ३०० शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
------------------------
- शांताराम सुडके, ९५०३३८१७६९
(शब्दांकन ः संदीप नवले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.