डॉ. मीरा साखरे, डॉ. ऊर्मिला वाकडे
पशुधनाच्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रणाली कार्यरत असतात जसे की पचनसंस्था, श्वसनसंस्था, लसिका प्रणाली, चेतासंस्था इत्यादी. लसिका प्रणाली ही शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेचा एक भाग आहे, जी शरीरात विविध मार्गांनी कार्य करते उदा. रोगप्रतिकारक शक्ती तयार करणे, द्रव संतुलन, पोषक द्रव्ये वाहून नेणे, फाटलेल्या पेशींची दुरुस्ती, टॉक्सीन आणि निकामी पदार्थांचे व्यवस्थापन करणे.
लसिका प्रणालीत बिघाड/ संसर्ग झाल्यास क्षयरोग, लसिका ग्रंथीचा कर्करोग, केसियस लिम्फैडेनाइटिस, संसर्गजन्य आजारात लसिका ग्रंथींना सूज येणे हे होऊ शकतात. केसियस लिम्फॅडेनाइटिस हा करोनिबॅक्टेरियम सुडोट्यूबर्क्यूलोसिस या जिवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. या आजारामुळे लिम्फॅटिक प्रणालीवर विपरीत परिणाम होतो.
या आजाराला ग्रामीण भाषेत गळू असेही म्हणतात.हा आजार जनावरातील क्षयरोगाशी मिळताजुळता आहे. याचे जिवाणू शरीराच्या आतल्या पेशीत वास्तव्य करतात आणि तेथे त्यांची वाढ होते. या आजारात मरतुक खूप कमी प्रमाणात आहे, लक्षणेसुद्धा ठळक स्वरूपात नसतात. पण आजारामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आजाराची माहिती आवश्यक आहे.
१) आजार मुख्यतः शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये आढळतो.
२) शरीरावरील एक किंवा अधिक लसिका ग्रंथीला सूज येते आणि त्यामध्ये पूयुक्त पदार्थ तयार होतो. अंतर्गत महत्त्वाच्या अवयवात गळू होतात.
३) आजाराचे मुख्यतः दोन स्वरूपामध्ये विभाजन केले जाते. पहिले बाह्य स्वरूप व दुसरे अंतर्गत स्वरूप. या आजाराचे दोन्ही प्रकार शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये आढळून येतात. पण बाह्य स्वरूप हे शेळ्यांमध्ये तर अंतर्गत स्वरूप हे मेंढ्यांमध्ये दिसते.
आर्थिक नुकसान ः
१) शरीराच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो, लहान पिलांची वाढ खुंटते.
२) मेंढ्यामध्ये लोकर, शेळ्यांमध्ये मांस उत्पादनात घट होते.
३) जनावराची पुनरुत्पादन कार्यक्षमता घटते.
४) बाधित जनावरांद्वारे कळपात संसर्ग झपाट्याने पसरतो. त्यामुळे बाधित जनावर कळपातून काढावे लागते.
५) बाधित जनावरांत उपचाराअभावी मृत्यू होतो.
आजाराचा प्रसार ः
१) बाधित जनावरांच्या शरीरावर तयार झालेले गळू जेव्हा पिकून फुटतात तेव्हा त्याच्यातील पूयुक्त स्राव हा गोठ्याचे वातावरण दूषित करतात.
२) बाधित जनावरांमुळे आजूबाजूचा चारा, पाणी, माती, कुरण दूषित होते.
३) हे जिवाणू चारा, गव्हाण, पाण्यामध्ये जवळपास दोन महिने टिकून तग धरून राहतात. मातीमध्ये आठ महिने एवढा जास्त काळ टिकून राहतात.
४) शेळ्या-मेंढ्यांमध्ये शरीराला झालेली कोणतीही जखम जसे की, जनावरांच्या ओळखीसाठी बिल्ले लावले जातात. त्यामध्ये जो चिमटा वापरतो जातो तो निर्जंतुकीकरण केलेला नसेल तर त्या मार्फत हे जिवाणू शरीरात प्रवेश करू करतात.
५) बाह्यपरजीवींचे नियंत्रण करण्यासाठी लोकर कापली जाते,
त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणामुळे प्राण्यांच्या शरीरावर जखम होऊ शकते, त्या जखमेद्वारे सुद्धा प्रसार होतो.
६) खच्चीकरणाचे ऑपरेशन केले जाते. त्यासाठी लागणारे साहित्य निर्जंतुकीकरण केलेले नसेल तर हे जिवाणू त्या शस्त्रक्रियेदरम्यान शरीरात प्रवेश करतात.
८) बाधित जनावरांच्या खोकल्यातून किंवा जखमेवरील माशीद्वारे या आजाराचा कळपातील इतर निरोगी जनावरांमध्ये प्रसार होऊ शकतो.
जिवाणूंचे शरीरात संक्रमण ः
- १ ते ३ महिने एवढा दीर्घ असा जिवाणूंचा संक्रमण काळ असतो.
- जिवाणूंचा प्रसार प्राण्याच्या शरीरात झाल्यानंतर सर्वप्रथम हे जिवाणू लसिका प्रणालीवर प्रादुर्भाव करतात. त्यानंतर जिवाणूची वाढ लसिका ग्रंथीमध्ये होते.
- मानेजवळ, कानामागे, कासेजवळ, पायाजवळ अशा वेगवेगळ्या शरीराच्या भागावर लसिका ग्रंथी असतात.
- रोगाचा संसर्ग हा रक्त किंवा लसिका प्रणालीद्वारे संपूर्ण शरीरातील इतर लसिका ग्रंथी किंवा अंतर्गत अवयवांमध्ये (फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड इत्यादी) गळू तयार करतात.
- गळूची हळूहळू वाढ होते. गळूमध्ये पांढरट चिकट पू असतो, ज्याला कोणताही वास नसतो.
आजाराची लक्षणे ः
१) शरीराच्या लसिका ग्रंथीवर सूज दिसून येते.
२) शेळ्या आणि मेंढ्याच्या मानेवर, बाजूंवर आणि कासेवर मोठ्या भरलेल्या गळूच्या स्वरूपात गाठी प्रकट होतात.
३) मुख्यतः मेंढ्यांमध्ये अंतर्गत अवयवांवर गळू विकसित होतात.
मेंढ्यांमधील लक्षणे ः
बाह्य स्वरूप ः
- एक किंवा अधिक बाह्य लसिकेच्या गाठींची आकाराने वाढ होते.
- गाठींमध्ये साधारणतः हिरवट पांढरट चिकट पू असतो. गाठ फुटल्यानंतर त्याला कोणताही वास नसतो, तो कांद्याच्या आवरणासारखा दिसतो.
- सुरुवातीला गाठ घट्ट असते नंतर मऊ होऊन सुकून जाते.
अंतर्गत स्वरूप ः
- प्रकारामध्ये शरीराच्या विविध संस्था बाधित होतात.
- अंतर्गत अवयवांमध्ये गळूची निर्मिती होते.
शेळ्यांमधील लक्षणे ः
- बाह्य लसिकेच्या गाठी दिसून येतात.
- बरे झालेल्या गाठींमुळे कानाखाली उतकांची खपली असू शकते.
उपचार पद्धती ः
- आजाराचे जिवाणू पेशींच्या आतमध्ये तग धरून राहतात, म्हणून उपचारास फारसा प्रतिसाद मिळत नाही.
- सुरुवातीला गाठी घट्ट असतात. औषध लावून गाठी पिकल्यानंतर त्या आपोआप फुटतात. पूयुक्त स्राव बाहेर येतो.
- पशुवैद्यकाच्या साह्याने त्यावर उपचार करून घ्यावेत. त्या गाठींमधील सर्व घाण बाहेर काढून घ्यावी.
- त्यानंतर गाठ जंतुनाशक द्रावणांनी स्वच्छ करावी. १ टक्का पोटॅशिअम परमॅग्नेट या जंतुनाशक द्रावणाने गाठ आणि त्वचेचे निर्जंतुकीकरण करावे.
- वेदनाक्षमक औषधे, प्रतिजैविकांचा वापर आजारात उपयुक्त ठरतो.
व्यवस्थापन आणि नियंत्रण ः
१) निरोगी कळपाला वाचविण्यासाठी बाधित जनावरांचे विलगीकरण आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.
२) वारंवार गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे. बाधित गोठ्यात जवळपास दहा महिने तरी नवीन कळपाचा प्रवेश करणे टाळावे.
३) शस्त्रक्रियेदरम्यान होणारा संसर्ग टाळण्यासाठी निर्जंतुकीकरण केलेली उपकरणे व साहित्य वापरावे.
४) आजारी जनावर कळपातून कमी करावे.
५) आजारी जनावर दुसऱ्या पशुपालकास विकू नये.
संपर्क ः डॉ. मीरा साखरे, ९४२३७५९४९०
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.