Nagpur News : काळाची गरज ओळखत डिजिटायझेशनकडे वळलेल्या महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) आता शेतकऱ्यांपर्यंत पशुपालन व दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी ॲपचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाने यासाठी पुढाकार घेतला असून शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन या विषयावरील ही ॲप आहेत.
‘एआय’च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) माध्यमातून शेतीक्षेत्रात सुसूत्रता आणत जोखीम कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याबरोबरच मोबाइलच्या माध्यमातून शेतीशी निगडित सर्वच प्रकारचे तंत्रज्ञान व त्याबाबतची माहिती आता एका टचवर उपलब्ध झाली आहे. पशुपालनाशी संबंधित तीन मोबाइल ॲपचा पर्याय उपलबध करून दिला आहे.
पशुआहाराची निवड, पशू आहार तयार करण्याची शास्त्रोक्त पद्धती, शास्त्रोक्त व्यवस्थापन, त्यांचे आरोग्य कसे राखावे, रोग व्यवस्थापन, विपणन, कर्ज व इतर बाबींसाठी प्रकल्प आराखडा कसा तयार करावा यासह कुक्कुटपालनाशी संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुग्ध व्यवसाय ॲपद्वारे देशी-विदेशी गोवंश, दुग्ध आणि शेतीकामी वापरात येणारा गोवंश, दुधाळ म्हशींच्या विविध जाती, गोठा व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, प्रजनन व्यवस्थापन याची माहिती दिली आहे. तर शेळीच्या विविध जाती, त्यांचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, शेळ्यांकरिता आरोग्यदायी शेड, हाताळणी कौशल्य, विपणन व्यवस्थापन, प्रकल्प आराखडा अशी माहिती शेळीपालन ॲपद्वारे दिली आहे.
कुलगुरू डॉ. नितीन पाटील, संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. पी. सोमकुवर यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. वैशाली बांठिया, प्रा. डॉ. सारीपूत लांडगे यांनी ही ॲप विकसित केली आहेत.
पशुपालन, दुग्धव्यवसाय तसेच कुक्कुटपालनाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. त्यांच्यापर्यंत या क्षेत्रातील सुधारित तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या उद्देशाने या क्षेत्राशी संबंधित तीन ॲप विकसित करण्यात आले आहेत. प्ले-स्टोअरवर हे ॲप उपलब्ध असून पशुपालकांनी त्याचा लाभ घ्यावा.- डॉ. सारीपूत लांडगे, प्रा. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, मो. ७३५०६८६३८०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.