Animal Care
Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : गाई, म्हशींच्या संक्रमण काळातील आहार व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. संजय भालेराव, डॉ. समाधान गरंडे, डॉ. सारण्या ए.

गाई, म्हशींच्या शेवटच्या तीन महिन्यांतील गाभण काळात (Animal pregnancy period) प्रथिनांबरोबरच ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी बायपास फॅट देण्याची गरज आहे. यामुळे गर्भाशयातील वासराची नीट वाढ होते.

शरीरात चरबीच्या रूपाने ताकद साठून राहते आणि तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) ३.५ ते ४ यादरम्यान राहण्यास मदत होते.

गाई-म्हशींमधील विण्याच्या तीन आठवडे अगोदर आणि तीन आठवडेनंतर असा एकूण सहा आठवड्यांच्या कालावधीला ‘संक्रमण काळ’ म्हणतात. संपूर्ण वेतामध्ये मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण हे संक्रमण काळातील व्यवस्थापनावर अवलंबून असते.

संक्रमण काळ हा दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील अतिशय नाजूक काळ असतो. गाई, म्हशींचा शेवटच्या तीन महिन्यांचा गाभण काळ दूध उत्पादकांकडून दुर्लक्षिला जातो, कारण त्याचवेळी दूध मिळत नाही.

गाभण काळातील शेवटच्या तीन महिन्यांत पशू आहाराची गरज झपाट्याने वाढलेली असते. कारण याच काळात वासराची ७० टक्के वाढ होत असते. या वेळी प्रथिनांची कमतरता पुनरुत्पादनात अडथळे निर्माण करू शकते.

गाई-म्हशींना सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या गाभण काळात नेहमीचे खाद्य आणि चारा आपण देऊ शकतो. विण्याच्या ९० दिवस अगोदर वासराच्या योग्य वाढीसाठी, वासरू सशक्त जन्माला येण्यासाठी आणि मुबलक दूध उत्पादनासाठी गाई, म्हशीला या काळात अतिरिक्त पौष्टिक आहार द्यावा लागतो.

परंतु शेवटच्या तीन महिन्यांमध्ये जनावरांच्या पोटाचा काही भाग वासराने व्यापल्यामुळे तिला पचनाला चांगले खाद्य देण्याची गरज असते. तसेच खाद्य चार वेळा विभागून दिल्यास पोटावर अतिरिक्त ताण येत नाही. प्रसूती जवळ आल्यावर पचनाला सोपे खाद्य दिल्यास प्रसूती सुलभ व्हायला मदत होते.

गाभण काळ आणि व्यायल्यानंतर ऊर्जेची गरज

गाभण काळातील शेवटच्या दोन महिन्यांत गाय, म्हैस पुढील वेताची तयारी करीत असते. त्यामुळे या काळातच जर योग्य आहार दिला गेला तरच प्रसूती व्यवस्थित होऊन दूध उत्पादनात सातत्य राहते.

शेवटच्या ३ महिन्यांतील गाभण काळात प्रथिनांबरोबरच ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी बायपास फॅट देण्याची गरज आहे. यामुळे गर्भाशयातील वासराची नीट वाढ होते. शरीरात चरबीच्या रूपाने ताकद साठून राहते आणि तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) ३.५ ते ४ यादरम्यान राहण्यास मदत होते.

व्यायल्यानंतर होणारे दुधाचा ताप, किटोसिस इत्यादी आजार होत नाहीत.

संक्रमण काळातील व्यायल्यानंतरचा आहार

व्यायल्यानंतर ३५ ते ४५ दिवसांपर्यंत गायी-म्हशींचे दूध वाढत जाते. या काळात जितके जास्त दूध आपल्याला मिळवता येईल तितके त्या वेतातील एकूण दूध उत्पादन वाढते.

या काळात जनावरांमध्ये ऊर्जेची कमतरता (निगेटिव्ह एनर्जी) दिसून येते. तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) खालावतो. कारण दुधावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. या वेळेस गाय उलटण्याचे प्रमाण वाढते, कारण नवीन वासरू जन्माला घालण्यासाठी लागणारी ऊर्जा शरीरात कमी पडते.

शरीरातील चरबी यकृतावर (लिव्हर) जमा होऊन ‘फॅटी लिव्हर’ नावाचा आजार होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे यकृत पूर्ण क्षमतेने शरीरासाठी लागणारे ग्लुकोज तयार करू शकत नाही. यामुळे गाय एकूणच तिच्या क्षमतेपेक्षा कमी दूध व फॅट उत्पादन करते.

बहुतांश दूध उत्पादकांकडील गायी म्हशींमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी निदर्शनास येतात. यामुळे जनावरांमधील ऊर्जेची कमतरता बायपास फॅटच्या स्वरूपात भरून काढल्यास पूर्ण क्षमतेने दूध व फॅट उत्पादन घेणे शक्य होऊन जनावर वेळेवर गाभण राहण्यासही मदत होते.

संक्रमण काळातील आहार

शेवटच्या तीन आठवड्यांत पचण्यास सोपा जास्त पाचक तत्त्वे असलेला आहार सुमारे ४ ते ५ किलो प्रतिदिन विभागून खाऊ घालावा. हिरवा तसेच कोरडा चारा गरजेनुसार द्यावा.

व्यायल्यानंतर सुरुवातीला दुभत्या गाई, म्हशींची भूक कमी असते. अशा वेळेस जास्त ऊर्जा व जास्त पचनीय प्रथिने असलेला आहार द्यावा. जेणेकरून जनावरांच्या शरीराला कमी खाद्यामध्ये जास्त पोषणतत्त्वे मिळू शकतील. चांगल्या प्रतीच्या आहारासाठी पशुआहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

प्रति लिटर दुधामागे ४०० ते ५०० ग्रॅम पशुखाद्य आणि शरीर स्वास्थासाठी १ ते २ किलो पशुखाद्य दररोज विभागून द्यावे. एकूण ६ ते ७ किलो पशुखाद्य सुमारे १५ ते २० लिटर दूध देणाऱ्या गाईसाठी आणि सुमारे ८ ते १० लिटर दूध देणाऱ्या म्हशीसाठी देणे आवश्यक आहे. हिरवा व कोरडा चारा शारीरिक गरजेनुसार द्यावा.

कोरडा चारा हा जनावरांच्या दुधात फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी देणे आवश्यक आहे. तसेच जास्त ऊर्जेसाठी बायपास फॅट व इतर खाद्यपूरके दिल्यास गाई, म्हशींचा संक्रमण काळ आरामदायी होण्यास मदत होते.

शेवटच्या गाभण काळात व विल्यानंतर सुरुवातीच्या काळात भूक कमी असल्याने लवकर पचणारा व भरपूर पोषणमूल्ये असणारा आहार दिल्यास पचनासाठी लागणाऱ्या ऊर्जेत बचत होते.

संक्रमण काळात कॅल्शिअमची गरज

गाय, म्हैस व्यायल्यानंतर ग्लुकोज बरोबरच कॅल्शिअमची गरज वाढते. पहिल्या दिवशी तर ही गरज तीन पटींनी जास्त असते. या वेळेस चीक किंवा दुधावाटे कॅल्शिअम शरीराबाहेर जात असते. त्यामुळे पहिल्या आठवड्यात कॅल्शिअमची कमतरता जास्त असते.

शरीरातील संप्रेरक हाडांमधील कॅल्शिअम काढून रक्तामधील त्याचे प्रमाण वाढवितात. जेणेकरून चीक व दूध निर्मितीला कॅल्शिअम कमी पडू नये, परंतु जेव्हा खाद्यामध्ये पोटॅशिअम व सोडिअमचे प्रमाण जास्त असते, तेव्हा या घटकांचे रक्तातील प्रमाण वाढून रक्ताचा सामू अल्कली स्वरूपाचा बनतो.

जास्त पोटॅशिअममुळे मॅग्नेशियमची उपलब्धता कमी होते, त्यामुळे शरीराची कॅल्शिअमची कमतरता ओळखण्याची क्षमता कमी होते. यामुळे संप्रेरकांचे रक्तातील प्रमाण कमी होते.

शरीरातील कॅल्शिअम दूध उत्पादन व इतर शारीरिक कामांसाठी उपलब्ध केला जात नाही किंवा खाद्यातील कॅल्शिअम कमी शोषला जातो. अशावेळी रक्तात शोषला जाणारा कॅल्शिअम या काळात तोंडावाटे देणे आवश्यक असते. गाई, म्हशींना अशावेळेस कमी पोटॅशियम व कमी सोडिअम असलेला आहार द्यावा. मॅग्नेशिअमचे प्रमाण मात्र वाढवावे.

पशू आहारामधील मीठ व सोडा यांचा वापर कमी करावा. यामुळे रक्ताचा सामू आम्ल स्वरूपाचा राहण्यास मदत होईल जेणेकरून संप्रेरके हाडांमधील व आतड्यामधील कॅल्शिअम दुधासाठी जास्त प्रमाणात उपलब्ध करू शकतील. तसेच काही खाद्य पूरके वापरून शरीरातील रक्ताचा सामू आम्ल स्वरूपाचा करून दुभत्या गाई म्हशींना होणाऱ्या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.

गाभण काळात कमी कॅल्शिअम व जास्त मॅग्नेशिअम अशा स्वरूपात खनिजांची उपलब्धता ठेवावी. गाभण काळात जास्त कॅल्शिअम दिला गेल्यास तो शरीरात शोषला जाण्याची क्रिया मंदावते, कारण दूध उत्पादन नसल्यामुळे कॅल्शिअम शरीरात शोषून घेणाऱ्या रिसेपटार्सचे कार्य मंदावते, याचा फटका गाय, म्हैस व्यायल्यावर बसतो.

कारण व्यायल्यावर तोंडावाटे दिलेला कॅल्शिअम शरीरात कमी शोषला जातो. जनावराला मिल्क फिव्हर किंवा दुधाचा ताप हा आजार होण्याची शक्यता बळावते.

संक्रमण काळातील एकूण सहा आठवड्यांत दुभत्या जनावरांची रोग प्रतिकार क्षमताही कमी झालेली असते. यामुळे कासेचा दाह व गर्भाशयाचा दाह इत्यादी रोगांना जनावर बळी पडू शकते.

डॉ. संजय भालेराव, ९०९६३२४०४५ (सहायक प्राध्यापक, पशुपोषणशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT