Dairy Business Agrowon
काळजी पशुधनाची

Dairy Business : पूरक नव्हे तर दुग्धव्यवसाय झाला मुख्य अन शाश्‍वत

लहानपणीच आई-वडिलांचा आधार तुटला. पण तरीही हिंम्मत व स्वबळावर सावळेश्वर (ता.मोहोळ, जि. सोलापूर) येथील अल्पभूधारक समाधान लांडगे या युवा शेतकऱ्याने दुग्धव्यवसाय सुरू केला. सुरवातीला अनेक संघर्षातून जावे लागले. मात्र चिकाटी व जिद्दीतून समाधान या व्यवसायात तगले. व्यवसाय विस्तार केला. उत्पन्नाचे स्रोत वाढवले. आज हा पूरक उद्योग राहिला नसून तो त्यांचा मुख्य व शाश्‍वत उद्योग तयार झाला आहे.

सुदर्शन सुतार

सोलापूर - पुणे महामार्गावर सोलापूरपासून सुमारे किलोमीटरवर सावळेश्वर गाव लागते. सोलापूर बाजारपेठ जवळच असल्याने कांदा (Onion), भाजीपाला (Vegetable) या तरकारी पिकांसह दूध व्यवसायात (Dairy Business) गावचे नाव अव्वल आहे. ऊसशेतीही (Sugarcane Farming) बऱ्यापैकी आहे.

गावात दक्षिणेला समाधान नारायण लांडगे यांची वडिलोपार्जित केवळ अडीच एकर शेती आहे. लहानपणापासून ते शिकायला मामांकडे होते. शाळेत असतानाच वडिलांचे आणि त्यानंतर आईचे निधन झाले. समाधान पोरके झाले. घरची सारी जबाबदारी खांद्यावर आली. सातवीतूनच शाळा सोडावी लागली.

सुरवातीचा संघर्ष

हळूहळू समाधान गावी घरच्या शेतीत रूळू लागले. शेती बघतच गवळ्याच्या हाताखाली दूध घालू लागले. सायकलवर गावभर फिरून ते दूध गोळा करायचे. अनुभव वाढत गेला. व्यवसायाची चांगली माहिती व बारकावे ज्ञात होत गेले. पुढे लग्न झाले. जबाबदारी आणखी वाढली.

केवळ दुग्धव्यवसायावर अवलंबून राहणे आर्थिक दृष्ट्या शक्य नव्हते. मग पिकअप वाहन घेऊन भाजीपाला वाहतूक सुरु केली. सात-आठ वर्षे हाच व्यवसाय केला. पुन्हा आर्थिक अडचणीमुळे तोही थांबवावा लागला. पण मग दुग्धव्यवसायातील आत्तापर्यंतचा अनुभव पाहात त्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करायचे ठरविले.

सन २०१७ मध्ये व्याजाने पैसे घेऊन जर्सी गाय घेतली. आणि हेच वर्ष आणि ही गाय हे दोन्ही घटक दुग्धव्यवसाय वृद्धीसाठी ‘टर्निंग पॅाईंट’ ठरले. पत्नी सौ. वैशाली यांची साथही मोलाची ठरली. एकेकाळी बांधावर जाऊन दूध गोळा करणारा मुलगा ते प्रगतशील दूध व्यावसायिक म्हणून समाधान यांनी ओळख तयार केली आहे.

मुक्त गोठा पध्दतीचा वापर.

शेती कमी असल्याने दुग्धव्यवसायावरच सारी मदार होती. मग एकाच्या दोन, दोनाच्या पाच आणि पुढे दहा गायीपर्यंत व्यवसाय वाढवला. आज तो सहा गाईवर स्थिरावला आहे. होलस्ट्नि फ्रिजीयन (एचएफ) जातीच्या गायी आहेत. प्रशस्त पत्राशेडचा गोठा उभारला आहे. त्यात धारा काढण्यापुरत्या गायी सकाळी आणि संध्याकाळी आणल्या जातात. याच दावणीत फॅनची व्यवस्था केली आहे.

मुक्तगोठा पद्धतीने संगोपन करण्यावर भर आहे. त्यासाठी परिसराला तारेचे मजबूत कुंपण केले आहे. धारा काढल्यानंतर गायी मुक्तगोठ्यात दिवसभर सोडल्या जातात. तिथे त्या चारा खातात. रवंथ करतात. पाणी पितात. धारा काढतेवेळी गव्हाणीत चारा दिला जातोच. शिवाय दिवसभर फिरत खाण्यासाठी गोठ्यात ठिकठिकाणी छोटे हौदही ठेवले आहेत.

दररोजचे संकलन

गोठ्यातील एक गाय एकावेळेला १२ ते १५ लिटरपर्यंत दूध देणारी आहे. उर्वरित गायी एका वेळेला १० ते १२ लिटरपर्यंत दूध देतात. सरासरी प्रतिदिन १०० ते १५० लिटरपर्यंतचे दूध संकलन होते. दुधाला प्रतिलिटर ३७ ते ३८ रुपये दर आहे. फॅटवर तो कमी जास्त होतो. समाधान यांनी तीन वर्षापूर्वी एका नामवंत खासगी दूध डेअरीचे संकलन केंद्र सुरु केले आहे. त्याद्वारे दररोज १००० ते १२०० लिटर दूध संकलन होते.

शेतीतील कामे पाहात सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी दोन तास वेळ ते या कामासाठी देतात. वर्षभरात १० ते १५ ट्रॅाली शेणखताचा साठा होतो. त्यापैकी दोन-चार ट्रॅाली शेणखताचा शेतीत वापर करून उर्वरित प्रति ट्रॅाली ३५०० रुपये दराने विक्री होते. या दोन्ही घटकांमुळे उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत तयार झाला आहे. महिन्याला खर्च वजा जाता चांगल्या प्रकारे नफा मिळतो. आज समाधान यांच्यासाठी हा पूरक नव्हे तर मुख्य उद्योग झाला आहे.

संपर्क- समाधान लांडगे- ७०२०६०६०५९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT