डॉ. गणेश निटुरे
Animal Husbandry: गाई, म्हशीतील माजचक्र हे २१ दिवसांचे असून, प्रजननाची संपूर्ण क्रिया शरीरातील निरनिराळ्या संप्रेरकावर अवलंबून असते. यापैकी कोणत्याही संप्रेरकाचे असंतुलन झाल्यास गाई, म्हशीच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. याची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना कराव्यात.
धाळ गाई, म्हशी भाकड राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यामधील वंध्यत्व आहे. वंध्यत्व म्हणजे पुनरुत्पादनासाठी तात्पुरती असमर्थता निर्माण होणे.
आनुवंशिक कारणामुळे निर्माण होणारे जन्मजात जननेंद्रियातील रचनेतील दोष यास कारणीभूत आहेत.
कारणे
स्त्रीबीजांड नसणे, स्त्रीबीजांडाची अपूर्ण वाढ, स्त्रीबीज वाहक नलिका नसणे, गर्भाशयाची अपूर्ण वाढ, गर्भाशयाला एक शिंग किंवा दोन्ही शिंग नसणे, दोन कमल मूख असणे.
ज्यावेळी गाईला दोन जुळी वासरे जन्माला येतात, त्यांपैकी एक गोरा व एक कालवड असल्यास अशा कालवडींपैकी ९० टक्के कालवडी प्रजननक्षम नसतात.
उपाय
कायमच्या वंध्यत्वावर उपचार नाही.
उपचाराने तात्पुरते वंध्यत्व दुरुस्त होऊ शकते. यासाठी विविध दोष कारणीभूत आहेत.
स्त्रीबीजांडाचे दोष
स्त्रीबीजांडाचे दाह, स्त्रीबीजांडावर कर्करोगाच्या गाठी येणे
गर्भाशयाचे दोष
गर्भाशयावरील कर्करोगाच्या गाठी, गर्भाशयातील उतकांचे थर, गर्भाशयाच्या आतील एंडोमेट्रियम थराचा दाह.
कमळमुखाचे दाह
उपाय
तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून याबाबत निदान तसेच प्रतिजैवक संवेदनशील चाचणीनंतर योग्य प्रतिजैवक निवड करून उपचार करता येतो.
गाई-म्हशीतील माजचक्र हे २१ दिवसांचे असून, प्रजननाची संपूर्ण क्रिया शरीरातील निरनिराळ्या संप्रेरकावर अवलंबून असते. यांपैकी कोणत्याही संप्रेरकाचे असंतुलन झाल्यास गाई-म्हशीच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
असमतोल आहार, निष्क्रिय स्त्रीबीजांड, स्त्रीबीजांडावर असणारे पितपिंड गर्भधारणा न होतासुद्धा ते नाहीसे होत नाही. त्यामुळे गाई-म्हशी पुन्हा माजावर येत नाही.
अपेक्षित शारीरिक वजनवाढ नसणे हेसुद्धा माजावर न येण्याचे प्रमुख कारण आहे.
गर्भाशयाची नियमित तपासणी, खनिज मिश्रणांचा वापर, माजावर येण्यासाठीच्या आयुर्वेदिक औषधीचा वापर, जीवनसत्त्व अ, ड, इ यांचे इंजेक्शन, लुगोल्स आयोडीनचा वापर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा.
पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने संप्रेरकाचा प्रोटोकॉल वापरून गाई म्हशी माजावर आणता येतात.
शेण तपासणीनंतर जंत प्रादुर्भाव दिसून आल्यास जंत निर्मूलन करावे.
रक्त तपासणीनंतर त्यामध्ये काही घटकांची कमतरता दिसून आल्यास पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचाराचा अवलंब करण्यात यावा.
गाई-म्हशी माजावर असूनसुद्धा त्याची बाह्य लक्षणे दाखवत नाही. यामुळे पशुपालक त्यांना रेतन करत नाहीत. तापमानवाढीमुळे विशेषतः उन्हाळ्यामध्ये म्हशींमध्ये ही फार मोठी समस्या निर्माण होत आहे. कारण शारीरीक तापमान नियंत्रित राखण्यासाठी म्हशी तुलनेने अकार्यक्षम असतात.
उपाययोजना
उन्हाळ्यामध्ये गोठा थंड ठेवण्यासाठी छताला चुना लावावा, त्यावर पाचट, तणीस टाकावे.
उन्हाळ्यामध्ये गोठ्यातील तापमान नियंत्रणासाठी फॉगर्स तसेच फॅनचा वापर करावा. मुक्त संचार
गोठा पद्धतीचा अवलंब करावा.
गाई- म्हशीतील माजाची लक्षणे विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळेस असतात. यावेळी निरीक्षण करावे. ऋतुचक्राच्या नोंदी ठेवाव्यात. तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून संप्रेरकांचा वापर करून गोठ्यातील सर्व गाई, म्हशींना माज एकत्रीकरण प्रक्रियेद्वारे एकाच दिवशी माजावर आणणे आणि रेतन करणे शक्य आहे.
गाई, म्हशी सलग तीनपेक्षा अधिक वेळा रेतनानंतरही त्यांच्यात गर्भधारणा न होता पुन्हा माजावर येणे हा उलटणारा माज असतो. संकरित गाईमध्ये याचे ४० टक्के प्रमाण असू शकते.
कारणे
सदोष स्त्रीबीज, लवकर स्त्रीबीज सुटणे, स्त्रीबीज सुटू न शकणे, अयशस्वी फलन, सदोष प्रजनन संस्था.
पोषण घटकांची कमतरता, गर्भाशयाचा दाह, रेतनातील चुका, अयोग्य वेळी अथवा अयोग्य ठिकाणी केलेले रेतन.
रेतपेशींचे दोष, भ्रूण लवकर मृत होणे
उपाययोजना
सुप्त गर्भाशय दाह चाचणी : माजचक्र सुरू असताना सतत उलटणारी जनावरे माजाच्या दिवशी तपासण्यात यावीत. माजाचा स्त्राव एका स्वच्छ परीक्षानळीत संकलित करून एक टक्के सोडियम हायड्रॉक्साइड मिश्रणासह थोडा उकळून घ्यावा. स्राव असणारा भाग पांढऱ्या रंगाचा दिसून आल्यास जनावरास सुप्त गर्भाशयाचा दाह नसल्याचे आणि स्त्राव असणारा भाग पिवळट दिसून असल्यास गर्भाशय दाह असल्याची खात्री होते. जेवढा रंग गडद तेवढा गर्भाशय दाह अधिक असतो. याचप्रमाणे स्रावाचा सामू पडताळून तो ६.५ ते ७.५ असल्याची खात्री करावी.
आवश्यकतेनुसार गर्भाशयात औषधे सोडावीत. तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने संप्रेरकांचा वापर करावा.
समतोल आहार, खनिज मिश्रणे, जीवनसत्त्वे यांचा वापर करावा.
कृत्रिम रेतन करणाऱ्यांनी गाई-म्हशीच्या माजाची योग्य स्थिती असल्याची खात्री करावी. द्रवनत्र पात्रामधील नत्र पातळी योग्य असावी. प्रमाणित रेतमात्रांचा वापर, रेतमात्रा योग्य तापमानास वितळवणे आदी बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
गाई, म्हशींची प्रसूती स्वच्छ निर्जंतुक वातावरणात व्हावी. प्रसूतीवेळी काही पशुपालक वासरांचे पाय हाताला माती, राख लावून दोरीने ओढतात. अप्रशिक्षित व्यक्तीकडून अशा वेळी गर्भाशय हाताळले जाण्याने गर्भाशयाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
पशुप्रजनन आणि वजनवाढ याचा थेट संबंध आहे. अपेक्षित शारीरिक वजनवाढ असणाऱ्या पशुधनामध्ये उच्च प्रजननक्षमता दिसून येते. सर्वसाधारणपणे कालवड २५० किलो तर पारड्यांनी २७५ किलो शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवितात.
शारीरिक वजनवाढीची साप्ताहिक नोंद ठेवणे गरजेचे आहे. ज्या गाई, म्हशीमध्ये सलग तीन आठवडे शारीरिक वजनात घट दिसून येते, अशांमध्ये प्रजननाची कमतरता आणि वंध्यत्वाची बाधा असण्याची दाट शक्यता असते. पशुपालकांना जनावरांचे वजन काढण्याची पद्धत माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी शिवणकामात
वापरात येणाऱ्या टेप वापरून जनावरांचे शारीरिक वजन नोंद करता येते.
गाईमध्ये वर्षाला एक वासरू आणि म्हशीमध्ये दीड वर्षाला एक वासरू याप्रमाणे नियोजन करावे.
वयात आलेल्या व माज न दर्शविणाऱ्या सर्व कालवडी व पारड्यांची गर्भाशय तपासणी करून त्यांच्या जननेंद्रियाची पूर्ण वाढ झाली असल्याची खात्री करावी.
कालवडी, पारड्यामध्ये प्रथमच येणारे दोन माज हे गर्भाशय तपासणीचे आणि तिसरा नियमित माज हा कृत्रिम रेतनाचा असावा.
जंत, गोचिड व गोमाशीच्या प्रादुर्भावामुळे गाई-म्हशींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन वंध्यत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे गोठा व सभोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा. नियमितपणे बाह्य परोपजीवींचे नियंत्रण करावे.
गाई, म्हशींना शिफारशीनुसार जंतनाशके द्यावीत. जनावरांचे सर्व प्रकारचे लसीकरण नियमित करावे.
गाई, म्हशींमध्ये माजाचे चक्र नियमितपणे दिसून येणाऱ्यासाठी समतोल आहार आणि आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे.
- डॉ. गणेश निटूरे ९९७०१२३२२०
(पशुधन विकास अधिकारी, तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, रेणापूर, जि. लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.