Chicken Poultry Shed  Agrowon
काळजी पशुधनाची

Chicken Poultry Shed Security : पोल्ट्री शेडमधील जैवसुरक्षा महत्त्वाची...

डॉ. सुधाकर आवंडकर, 

डॉ. सुधाकर आवंडकर

Poultry Farming : कोंबड्यांचे आजाराच्या जैविक कारणांपासून रक्षण करणे म्हणजेच जैवसुरक्षा होय. आजाराच्या जैविक कारणांमध्ये रोगकारक जिवाणू, विषाणू, कवक, कृमी, परोपजीवी, रोगाणूचे वाहक इत्यादी बाबी येतात. कुक्कुटपालन करताना जैवसुरक्षा राखण्याची जबाबदारी या व्यवसायाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निगडित सर्व व्यक्तींवर असते. म्हणून संबंधित प्रत्येकाने जैवसुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी.

शेडची जागा उंच ठिकाणी तसेच वर्दळीचे रस्ते, मानवी वस्ती आणि पाण्याच्या स्रोतापासून लांब असावी. बांधकाम जमिनीपासून कमीत कमी दोन फूट उंच असावे. गादी पद्धतीत शेडची लांबी ३० फुटांपेक्षा जास्त नसावी. दोन शेडमध्ये कमीत कमी ५० फूट अंतर असावे. ब्रुडींग, ग्रोइंग आणि लेइंग शेडमधील अंतर १५० फुटांपेक्षा कमी नसावे.

खाद्य यंत्र आणि भांडार गृह मुख्य शेडपासून किमान १५० फूट दूर असावे. आजारी कोंबड्यांसाठी विलगीकरण शेड असावे. असे शेड मुख्य शेडपासून कमीत कमी ५०० फूट अंतरावर असावे. साधारणत: १ कि.मी. परिघात दुसरे शेड असू नये.

शेडमधील वायुविजन पुरेसे असावे. योग्य तापमान राखले जाईल याची दक्षता घ्यावी. शेडमध्ये कोंबड्यांना पुरेशी जागा असावी.

शेडच्या कडेने कुंपण असावे. शेड बांधकाम कच्च्या स्वरूपाचे असल्यास उंदीर, घूस, सरपटणारे प्राणी बीळ करून किंवा अन्य मार्गाने शिरकाव करून इतर आजार संक्रमित करू शकतात.

शेडच्या प्रवेशद्वारावर निर्जंतुक द्रावण किंवा चुना भुकटीने भरलेला ट्रे असावा. त्यात पादत्राणे बुडवून आत प्रवेश करावा. शेडच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत निर्जंतुक द्रावणासाठी अर्धा फूट खोल आणि पाच फूट रुंद हौद असावा. शक्य असल्यास दोन्ही बाजूंनी फवारे लाऊन घ्यावेत.

दैनंदिन व्यवस्थापन

नवीन पिले आणण्याअगोदर संपूर्ण शेड आणि उपकरणे निर्जंतुक करून घ्यावीत. उत्तम वंशावळीची निरोगी पिले घ्यावीत.

वेळापत्रकानुसार नियमित लसीकरण करावे. ताणरहित वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. सकस व समतोल आहार आणि पुरेसे स्वच्छ पाणी दिल्यास कोंबड्यांची प्रतिकारशक्ती वाढते.

शेडमध्ये कोंबडीच्या मलमूत्र साठत असते. त्यातून मोठ्या प्रमाणात अमोनिया वायू उत्सर्जित होत असतो. हे लक्षात घेऊन लिटर व्यवस्थापन काटेकोर असावे. लिटर ओले किंवा अगदी सुके असू नये.

वेळोवेळी उपकरणांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण गरजेचे असते.

शेडमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी नेमून दिलेल्या कामाची क्रमबद्धरित्या अंमलबजावणी करावी. शेडमध्ये दैनंदिन कार्य करताना लहान, तरुण आणि प्रौढ या क्रमाने कोंबड्यांची हाताळणी करावी. खाद्य, पाणी आणि गादीपासून आजार संक्रमित होऊ नये याकरिता योग्य दक्षता घ्यावी.

पाणी, खाद्याची भांडी आणि इतर उपकरणे नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक करावीत.

मांसल आणि अंड्यावरील कोंबड्या एकत्र पाळू नये. कोंबड्या आणि वराहांचा संपर्क येऊ देऊ नये. ऑल इन ऑल आउट पद्धतीचा अवलंब करावा. कोंबड्यांचे रोज निरीक्षण करावे. एखाद्या कोंबडीत आजारपणाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित पशुवैद्याकास पाचारण करून निराकरण करून घ्यावे.

कामगार आणि इतर व्यक्तींसाठी नियमावली

कामगारांना आणि प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हात मोजे, कपडे, पादत्राणे, टोपी आणि मास्क घालून काम करणे किंवा प्रवेश करण्याची सक्ती असावी.

शेडमध्ये आणि बाहेर वापरण्याचे पादत्राणे, कपडे वेगवेगळे असावेत.

शेडमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी परसातील पक्षी, जंगली पक्षी, श्वापदे, पक्षी खरेदी विक्रीचे ठिकाण, मांस बाजार, इतर शेडमधील व्यक्ती यांच्या संपर्कात येऊ नये.

एका शेडमध्ये काम करणाऱ्याने स्वच्छ न होता दुसऱ्या शेडमध्ये जाऊ नये. आजारी कोंबड्यांची निगा घेणाऱ्या व्यक्तीने मुख्य शेडमध्ये जाऊ नये.

शेडमध्ये आजाराचा प्रादुर्भाव व्यक्ती किंवा वाहनांमार्फतसुद्धा होऊ शकतो. म्हणून शेडमध्ये आगंतुक व्यक्ती आणि वाहनांना प्रवेश देऊ नये. प्रवेश दिल्यास त्यांना जैवसुरक्षेचे नियम सांगून काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी.

डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९

(पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT