Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष

Team Agrowon

डॉ. लता शर्मा

Animal Disease Management : हवामान बदलानुसार जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागतात. हिवाळ्यात जनावरांचे आरोग्य, प्रजनन, प्रकृती, खाद्य, चारा याकडे लक्ष द्यावे. जनावरांमध्ये लाळ्या खुरकूत, मिल्क फिवर आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

प शुपालनासाठी हिवाळा ऋतू अत्यंत अनुकूल, पोषक आणि उपयुक्त ठरतो. सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा प्रादुर्भाव, भरपूर पाण्याची उपलब्धता, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता अशा वातावरणामुळे जनावरांच्या आरोग्य व प्रजननास हिवाळा अनुकूल असतो. जनावरांना सुलभ प्रजननासाठी चांगले आरोग्य व सुदृढ प्रकृतीची गरज असते. पावसाळ्यात वाढीस लागलेली जनावरे पोषक वातावरण, तसेच हिरवा व वाळलेला चारा मिळत असल्यामुळे हिवाळ्यात धष्ट-पुष्ट होतात.

हिवाळा ऋतू जरी आरोग्यदायक असला, तरी लहान वासरांचे थंडीपासून संरक्षण करणे आणि त्याचबरोबर व्यालेल्या जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. गोठ्यामधील उष्णता टिकून राहण्यासाठी जास्त क्षमतेचे बल्ब कमी उंचीवर लावावेत. शक्य झाल्यास गोठ्यामध्ये शेकोटी पेटवावी. गाभण जनावर आणि छोट्या जनावरांना गोठ्यात बसण्याच्या जागी रात्रीच्या वेळी वाळलेले गवत, कडबा पसरावा. गोठा कोरडा राहण्यासाठी दर ८ ते १० दिवसांनी फरशीवर चुना पसरावा.

गाभण गायी, म्हशींना जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी आहारात शेंगदाणा पेंड, सरकी पेंड यांचा वापर वाढवावा. शक्य असल्यास बायपास फॅट व प्रथिनयुक्त आहार द्यावा. क्षार व जीवनसत्त्वाचे मिश्रण वाढवावे. सकाळच्या वेळी हिरवा चारा व रात्रीच्या वेळी वाळलेला चारा द्यावा.

गोगलगायीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जनावरे चरावयास नेऊ नयेत. सर्दीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास जनावरांच्या नाकाभोवती टर्पेंटाइनचा बोळा फिरवावा.

अतिथंडीमुळे होणारे परिणाम :

थंडीमध्ये शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जनावरांची जास्त ऊर्जा खर्च होते. म्हणून या काळात चाऱ्याची जास्त गरज असते. चारा कमी पडल्यास जनावरांमध्ये अशक्तपणा दिसून येते. हिवाळ्यात जनावरांची त्वचा खडबडीत होते. त्वचेला खाज सुटते.

जनावरांचे स्नायू आखडतात. काही जनावरे लंगडतात. बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होऊन रवंथ कमी होते. सडावर भेगा पडून दूध काढताना रक्त येते, जनावर दूध काढू देत नाही, अस्वस्थ होते. दुधाळ जनावर पान्हा व्यवस्थित सोडत नाही. त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या प्रतीवर परिणाम होतो.

करडे आणि वासरे अतिथंडीमुळे गारठतात.

पाणी कमी पिण्यामुळे दूध उत्पादनात घट होते. कमी पाणी पिण्यामुळे याचा परिणाम पचन संस्थेवर होतो.

गोठा लवकर कोरडा होत नाही. त्यामुळे दुर्गंधी वाढते. दुधाळ जनावरांना दुग्धज्वर आजार होण्याची शक्यता वाढते. गोठा सतत ओला राहिल्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.

उपाययोजना :

हिवाळ्यात उघड्या गोठ्याच्या चारही बाजूंनी, खिडक्यांना पोत्याचे पडदे तयार करून बांधावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये बंद ठेवावेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत उघडे ठेवावेत. जेणेकरून दिवसभर ऊन आणि वारा गोठ्यामध्ये खेळता राहील.

जनावरांना एकदम उघड्या गोठ्यामध्ये ठेवू नये किंवा जनावरांना रात्री उघड्यावर बांधू नये.

गोठ्यामध्ये जनावरांना बसण्यासाठी भात किंवा गव्हाचे काड, भुसा वापरून गादी तयार करावी. करडांना उबदारपणा मिळण्यासाठी जमिनीवर गव्हाचे काड, भाताचे तूस पसरावे किंवा त्यांना पोत्यावर ठेवावे. जनावरांना दुपारी ऊन असताना शक्यतो गरम-कोमट पाण्याचा वापर करून धुवावे.

सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीन लावावे. सडाला भेगा पडल्यावर लगेच उपचार करावेत. दूध काढण्याच्या वेळी कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

जास्तीच्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी ऊर्जायुक्त पोषक चारा जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. जास्त ऊर्जायुक्त खाद्य पदार्थांचा आहारात वापर करावा. संरक्षित स्निग्ध पदार्थांचा आहारात वापर करावा. जेणेकरून जास्तीच्या ऊर्जेची गरज पूर्ण होऊन अपचन टाळता येईल.

पिण्याचे पाणी अति थंड नसावे. हिवाळ्यात पाणी थंड असल्यामुळे जनावर पाणी कमी पिते. जनावरांनी भरपूर पाणी प्यावे यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे.

बहुवर्षीय चारा पिकांची वाढ अति थंडीमुळे हळूहळू होत असल्यामुळे या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या पिकांची लागवड करावी. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.

आजारांचे नियंत्रण ः

लाळ्या खुरकूत ः

आजाराचा प्रसार हा थंड वातावरणामध्ये जास्त प्रमाणात होतो. जनावरांच्या तोंडामध्ये, जिभेवर तसेच हिरड्या व खुरामध्ये फोड येऊन ते फुटतात. फुटलेल्या जागी जखमा तयार होतात.

आजारी जनावरांना भरपूर ताप येतो. तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळते. रवंथ करणे बंद होते. श्‍वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. दूध उत्पादनात लक्षणीय घट येते.

योग्य उपचारानंतर झालेल्या जखमा जरी भरून आल्या तरी विविध व्यंग्य आढळून येतात. जसे की धाप लागणे, शरीरावर केस जास्त प्रमाणात वाढणे, प्रजननक्षमता कमी होणे इत्यादी.

उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय ः

हा विषाणूजन्य आजार आहे त्यामुळे उपचार नाहीत.

तोंड किंवा खुरामध्ये झालेल्या जखमा दोन टक्के पोटॅशिअम परमॅग्नेटच्या द्रावणाने निर्जंतुक कराव्यात. तोंडामध्ये जखम असल्यास ब्लोरो ग्लिसरीन लावावे. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

तीन महिन्यांवरील वासरे आणि जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण वर्षातून दोन वेळा करावे.

मिल्क फिवर :

चांगले दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ जनावरांमध्ये व्यायल्यानंतर ४८ ते ७२ तासांपर्यंत जास्त प्रमाणात आढळतो.

शरीर, दुधासाठी आवश्यक असलेला कॅल्शिअमचा पुरवठा आहारातून न झाल्यास आजार होतो.

लक्षणे ः

पहिल्या टप्प्यात जनावरांचे खाणे पिणे मंदावते, दूध उत्पादन कमी होते. दुसऱ्या टप्प्यात आजारी जनावर अशक्त होऊन जमिनीवर पोटात मान घालून शांत बसून राहते.

शरीराचे तापमान कमी होते. श्‍वसनाचा वेग वाढतो, नाडीचे ठोके वाढतात. डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या व स्थिर होतात. पोट फुगते.

उपचार ः

गाभण काळातील शेवटचे दोन महिने व विल्यानंतरच्या काळात आहारात कॅल्शिअम योग्य मात्रेत द्यावे.

पोट दुखणे किंवा पोट गच्च होणे :

कमी तापमान असताना जास्त प्रमाणात चारा खाल्ला आणि पाणी पिण्याचे प्रमाण घटले की पोट व आतड्यांची हालचाल मंदावते, जनावरांचे पोट गच्च होते.

जनावरांचे खाणे पिणे मंदावते. शेण पडणे घटते, त्यामुळे पोटात दुखते.

उपचार व प्रतिबंधात्मक उपाय ः

गोठ्यातील वातावरण उबदार ठेवावे. थंडीपासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करावे.

दुधाळ जनावरांना उत्तम खाद्य व चारा द्यावा. पिण्याचे पाणी जास्त थंड असू नये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Damage : ...अखेर पालकमंत्री विखे पाटील पोचले बांधावर

Soybean Yellow Mosaic : सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Rain Update : आखाडा बाळापूर मंडलात अतिवृष्टी

Rain Alert : राज्यात जोरदार वादळी पावसाचा इशारा

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

SCROLL FOR NEXT