कडूकवठाचे झाड साधारणपणे १० ते १२ मीटर उंच, सदाहरित आणि मध्यम आकाराचे असते. हे झाड प्रामुख्याने दक्षिण भारत, पश्चिम घाट आणि कोकणातील नैसर्गिक वनांमध्ये आढळते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवराईमध्ये हे झाड दिसते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासगी वनात याचे प्रमाण जास्त आहे. कोकणात साधारणपणे समुद्रसपाटीपासून तीनशे मीटर उंचीपर्यंत हे झाड आढळते. तसेच नदी-नाल्याजवळ हे झाड दिसते.
१) झाडाचे खोड तीन मीटर व्यासापर्यंत वाढते. खोडावरील साल ही खडबडीत तपकिरी रंगाची असते. पाने सदाहरित सरळ, टोकदार दहा ते बारा सेंटीमीटर लांब, तीन ते दहा सेंटिमीटर रुंद असतात. याचे फूल विभक्त लिंगी असते. साधारणपणे मार्च- एप्रिल महिन्यात याला फुलधारणा होते. फळ धारणा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते.
२) सुरवातीला फळे गोलाकार असतात. फळ पक्व झाल्यावर तपकिरी रंगाचे होते. ते पूर्ण पक्व होण्यास १२ ते १३ महिने लागतात. फळांमध्ये १० ते १२ तर काही फळांमध्ये सहा ते सात बिया असतात. बियांमध्ये प्रामुख्याने फॅटी ॲसिड ३२.४ टक्के, हिडनोकार्पीक ॲसिड २७ टक्के, चारमुर्गीक ॲसिड १२.४ टक्के, गार्लिक ॲसिड ६- ५ टक्के या प्रमाणात असते.
३) तेलाचा रंग पिवळसर असतो. तेलाचा उपयोग प्रामुख्याने कुष्ठरोग आणि इतर त्वचाविकारांवर उपचारासाठी केला जातो. पूर्वी कोकणात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात या बियांचे तेल लाकडी घाण्यावर काढले जात होते. तेल काढून उरलेल्या घटकाचा वापर शेतीत काम करताना झालेल्या जखमेवर उपचारासाठी केला जात असे. परंतु आधुनिक काळात लाकडी खाणे बंद पडले तसेच लोकांचा कल भुईमूग, सोयाबीन तेल वापरण्याकडे वाढत गेला. त्यामुळे कडूकवठ तेलाचा वापर कमी होत आहे. परिणामी लोकांचे या झाडाकडे दुर्लक्ष होत गेले.
७) या झाडाचे लाकूड उत्तम ज्वलनशील आहे. झाडाचे प्रमाण खासगी मालमत्तेमध्ये जास्त आहे परंतु सध्या लोकांचा कल नारळ, सुपारी यासारख्या नगदी पिकांकडे वाढला असल्याने खासगी जमिनीत याची तोड होत आहे. झाडाची फळे आणि त्यातील बिया माकड, कट्टंदर आणि साळींदर हे प्राणी खातात. याकारणाने त्यांचे नैसर्गिक पूनर्उत्पादन होण्याचे प्रमाण कमी आहे. या कारणामुळे हे झाडे संकटग्रस्त झाले आहे.
वनशास्त्र महाविद्यालयामधील संशोधन ः
१) पदव्युत्तर शिक्षणांतर्गत पश्चिम घाटातील स्थानिक झाडांचा अभ्यास आणि संशोधन सुरू आहे. या अंतर्गत
कडूकवठ या दुर्मिळ झाडांवर संशोधन सुरू आहे. सुरवातीला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची संशोधनासाठी निवड केली आहे. विविध संशोधनाच्या नोंदी, वनविभागाकडील पुरावे आणि स्थानिक लोकांसोबत चर्चा करून सर्वेक्षण करण्यात येत आहे.
२) या सर्वेक्षणानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १८ ते २० ठिकाणी कडूकवठाची साधारणतः ८० ते ९० झाडे दिसून आली आहेत. यामध्ये दापोली, रत्नागिरी, संगमेश्वर, वेंगुर्ला, दोडामार्ग या तालुक्यातील गावांचा समावेश आहे. त्यापैकी फक्त पाच ते सहा ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे फक्त दहा ते बारा झाडे पाचशे मीटरच्या परिसरात दिसून आली आहेत. उर्वरित ठिकाणी फक्त एक ते दोन झाडे असल्याचे निदर्शनात आले. बहुतांश झाडे ही देवराई तसेच सुपारी, नारळाच्या बागेत आहेत.
३) स्थानिक लोकांशी केलेल्या चर्चेतून असे समजले, की पूर्वी प्रत्येकाच्या बागेत एक ते दोन झाडे असायची. तेल काढण्यासाठी याच्या बियांचा वापर होतो. एका वर्षात जास्त फळांचे उत्पादन देणारे हे झाड आहे.
४) मादी आणि नर फुले वेगवेगळ्या दोन झाडांवर आढळतात. साधारणतः मार्च, एप्रिल महिन्यात फुलधारणा होते. फळ उत्पादनाची माहिती घेताना हे निदर्शनास आले, की सरासरी एका झाडाला एका वर्षी सातशे ते आठशे आणि काहीवेळा वर्षाला २०० ते ३०० फळधारणा होते. एका झाडापासून सरासरी सात ते आठ किलो बियाणे उत्पादन मिळते. त्यातून ४० ते ४५ टक्के तेलाचे उत्पादन मिळते. साधारणतः अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति लिटर दराने तेलाची विक्री होते. संशोधनाच्या निमित्ताने असे दिसून आले, की १५ ते १८ वर्षे या तेलाची टिकण्याची कालावधी आहे.
५) हे झाड संकटग्रस्त असल्याने त्यांचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक आहे. संवर्धनासाठी लोकांमध्ये जनजागृती आणि जास्तीत जास्त रोपनिर्मितीवर भर देण्यात आला आहे. वनशास्त्र महाविद्यालयातील रोपवाटिकेमध्ये कडू कवठाची रोपे तयार करण्यास सुरवात झाली आहे. सिंधुदुर्गातील काही शेतकऱ्यांनी या झाडाचे संवर्धन करून बिया गोळा करण्यास सुरवात केली आहे. येत्या काळात खासगी उद्योग समुहाच्या माध्यमातून लाकडी घाण्यावर तेलनिर्मितीला चालना देण्याचे नियोजन केले आहे. तसेच याच्या बिया आणि तेलाच्या गुणधर्माबाबत अभ्यास सुरू आहे.
वनस्पतीची ओळख ः
कडूकवठ हे पश्चिम घाटातील एक दुर्मिळ औषधी वनस्पतीपैकी हे एक झाड आहे. कोकणात यालाच कावठी किंवा कवठ या नावाने ओळखतात.हिंदी मध्ये तुरवक, संस्कृतमध्ये गरुडफळ आणि केरळमध्ये मार्टी या नावाने ओळखले जाते.
१) कूळ ः Achariaceae
२) शास्त्रीय नाव ः Hydnocarpus Pentandrus, (Buch.Ham ) oken,synonyms Hydnocarpus wightiana and Hydnocarpus laurifolia (Den)
संपर्क ः डॉ.अजय राणे, ७८७५४८५२२७ सहयोगी अधिष्ठाता, वनशास्त्र महाविद्यालय, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.