विकास माने
Medicinal Plants Update : कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय उपचार प्रणाली म्हणून आयुर्वेदाचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे औषधी वनस्पतींची मागणी वाढत आहे. त्याला साथ मिळत आहे ती सुगंधी वनस्पतींची.
सुगंधी वनस्पतींपासून मिळणारी सुगंधी तेले, द्रव्ये ही प्रामुख्याने सौंदर्यप्रसाधने, स्नानाचे साबण, शाम्पू, क्रीम, अगरबत्ती इ. मध्ये वापरले जात आहे. सध्या औषधे आणि सुगंधी वनस्पती यांची भारतात एकत्रित बाजारपेठ सुमारे ७ हजार कोटी रुपयांची आहे. या निर्यातीचा व्यापार ही सुमारे सहाशे कोटीच्या घरात पोहोचला आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने २००१ मध्ये आपल्या देशी प्राचीन आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आयुष मंत्रालयांतर्गत औषधी वनस्पती व सुगंधी वनस्पतीच्या लागवडीला महत्त्व देण्यात आले आहे.
देशातील बहुतांश सर्व कृषी विद्यापीठांनी स्वतंत्र औषधी वनस्पती विभाग सुरू केले आहे. त्यांच्या रोपवाटिकाही सुरू केल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या पातळीवर लागवड, उत्पादन, व्यवस्थापन या बाबींचा काही विभाग वगळता फारसा योजनाबद्ध विकास झालेला दिसत नाही.
कारण केवळ उत्पादन करून शेतकऱ्यांचा माल विकला न गेल्याच्याही अनेक घटना पुढे आलेल्या दिसतात. यामुळे शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीला फारसे धजावत नाहीत. म्हणूनच औषधी वनस्पतीचे मूल्यवर्धन व प्रक्रिया यावर भर देण्याची आवश्यकता आहे.
सध्या शेतकरी उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात कार्यान्वित होत आहेत. त्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्याची आवश्यकता आहे. ते मिळाले तर १४० कोटी लोकसंख्येची देशांतर्गत बाजारपेठेत हे शेतकरी मानाने उभे राहतील.
विदर्भात औषध वनस्पतीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त दिसते. त्या तुलनेत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात तितका विकास झालेला दिसत नाही. वातावरणानुसार वेगवेगळ्या पिकांची शेती करणे शक्य आहे. पुणे येथे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ सुरू केले आहे.
मात्र त्यांच्याकडून कोणते उपक्रम राबविले जातात, याविषयी पूर्ण अनभिज्ञता आहे. औषधी, सुगंधी वनस्पतींसंदर्भात राज्यशासनाकडून फारशा तरतुदीही केलेल्या दिसत नाहीत.
राष्ट्रीय स्तरावरून काही तरतुदी व योजना काही प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचाही योग्य प्रचार प्रसार शेतकऱ्यांपर्यंत होताना दिसत नाहीत. कृषी विभागात या विषयातील जाणकार, तज्ज्ञ असा एकही स्वतंत्र अधिकारी मार्गदर्शनासाठी उपलब्ध नाही.
कोरोना महामारीच्या काळात विविध काढे आणि आयुर्वेदिक औषधांचे महत्त्व आपल्याला चांगले कळले आहे. त्यामुळे औषधी वनस्पतीचा विकास करणे, त्यांच्या शेती पद्धती, व्यवस्थापन यांचा विकास, त्यांचे मूल्यवर्धन आणि प्रक्रिया या सर्व महत्त्वाच्या बाबींवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करायला हवे.
औषधी वनस्पतींची लागवड ही आपल्याकडे उपलब्ध जागेनुसार कमी अधिक करता येते. ज्यांच्याकडे शेती अधिक आहे, त्यांनी व्यापारी तत्त्वावर योग्य ती काळजी घेऊन लागवडीचे नियोजन करता येते.
अगदीच कमी जागा असेल परस बाग, टेरेस, गार्डन, गावस्तरावरील क्षेत्र, शाळा, महाविद्यालयांच्या बागांमध्ये लागवड करता येते. त्यासाठी शासकीय साह्य उपलब्ध आहे. आपल्या शक्य त्या वनस्पतींची लागवड करून त्यातून चांगले उत्पादन घेता येते.
औषधे वनस्पती
(१) गुळवेल : ही वेलवर्गीय वनस्पती असून, उपयुक्ततेमुळे तिला अमृतवेल असेही म्हणतात. घरात, बागेत मनी प्लॅँटप्रमाणे लावता येते.
कुंपणाच्या भिंतीवरही चढवता येते. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचा उपयोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, ज्वर विकार, कावीळ, मधुमेह यासाठी वापरली जाते. औषधांमध्ये तिच्या खोडांचा वापर अधिक प्रमाणात होतो. या वेलीच्या पानांची भाजीही केली जाते.
(२) अश्वगंधा : ही झुडूप वर्गीय वनस्पती ३ ते ४ फुटांपर्यंत वाढते. या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, खोड, फळे (एकूणच पंचांग) उपयुक्त आहे. ही वनस्पती शक्तिवर्धक असून, शुक्रपेशींची वृद्धी करते. वात, रक्तविकार, मूत्रविकार, निद्रानाश यावर उपयुक्त आहे.
दुधाळ जनावरांच्या आहारात वापरल्यास २० टक्क्यांपर्यंत दूध वाढू शकते. म्हणूनही ग्रामीण भागात या वनस्पतीला ‘ढोरगुंज’ असेही म्हणतात.
(३) शतावरी : या वेलवर्गीय वनस्पतींचा काटेरी वेल ४ ते ५ फुटांपर्यंत वाढतो. बियांपासून ते कंदापासून लागवड होऊ शकते. या वनस्पतीची मुळे बलवृद्धीसाठी उपयुक्त आहेत. अर्धांगवायू, शतावरी कल्प, शुक्रजंतू कल्प, विकार, संधिवात, स्त्रियांचे आजार यांसाठी ही वनस्पती उपयुक्त आहे.
(४) सफेद मुसळी : या वनस्पतीच्या मुळांचा उपयोग औषधांमध्ये केला जातो. ही वनस्पती शक्तिवर्धक, बलवर्धक, शुक्रजंतूवाढीसाठी उपयुक्त, धातुवर्धक, उत्तेजक, मूतखडा, श्वेतपदर यासाठी गुणकारी आहे.
(५) सदाफुली : सर्वत्र आढळणारी, बहुतांश बागेत लावले जाणारे फुलझाड आहे. हिची मुळे औषधी असून, वाळवून पावडर करून ठेवल्यास मधुमेह व कर्करोगावरील औषधांमध्ये उपयोगी ठरते.
(६) अडुळसा : या झुडूपवर्गीय ४ ते ५ फुटांपर्यंत वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये पानात व्हॅसिसी अल्कलाईड असते. कफ, दमा, अस्थमा, खोकला, क्षयरोग या विकारांवर अडुळसा हा रामबाण उपाय आहे.
(७) गवती चहा : यात सी जीवनसत्त्व असते. खोकला, मुखशुद्धी, सौंदर्य प्रसाधने, डासांपासून संरक्षक तेल करता येते. सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
(८) स्टिव्हिया (मधुपर्णी) : तुळशीसारखी वाढणारे झेंडूच्या कुळातील प्रजाती आहे. ही वनस्पती साखरेच्या २५० पट गोड असते. मधुमेही लोकांच्या पदार्थांमध्ये गोडी आणण्यासाठी ही वनस्पती वापरली जाते. रक्तातील साखरेचे नियंत्रण करते.
स्वादुपिंडाची कार्यक्षमता वाढविते. रक्तदाबही नियंत्रित ठेवते. हर्बल चहा (टी) म्हणून उपयुक्त आहे. सरबते, जॅम, जेली, चॉकलेटसाठी व ड्रिंकमध्ये उपयोग केला जातो.
(९) आघाडा : या झुडपाच्या मुळ्याचा उपयोग दाताची स्वच्छता, विकार विशेषतः पायोरियासाठी केला जातो. मूतखडा, लघवी मोकळी करण्यासाठीही ती उपयुक्त आहे.
(१०) उन्हाळी : या वनस्पतीची मुळे, खोड, पाने, फुले, फळे असे पंचांग औषधी असून, मूळव्याध व काविळीसाठी उपयुक्त मानले जाते.
(११) पानफुटी : मधुमेह, गँगरीन, अर्धांगवायू, जीर्णवर्ण, महारोग यावर उपयुक्त आहे.
(१२) सराटा : मूतखडा, पोटाच्या विकारावर उपयुक्त, सर्पदंश व विंचूदंशावर उपयुक्त वनस्पती आहे.
औषधी भाज्या
(१) कुंजर : पचनास हलकी, पौष्टिक आहे. मूळव्याधीवर गुणकारी, पित्तनाशक, रक्तविकारात उपयुक्त.
(२) केना : या भाजीमुळे पचनक्रिया सुधारते. पोट साफ होते. त्वचा विकार व सूज कमी करण्यासाठी उपयुक्त.
(३) घोळ : मधुमेह कमी करते. अल्सर होत नाही. मूळव्याधीवर गुणकारी, लघवी साफ होण्यास उपयोगी कफ व पित्तदोष कमी करते.
(४) पातर : शक्तिवर्धक आहे. लोह भरपूर असते. महिलांना जास्त उपयुक्त आहे.
(५) वासनवेल : शक्तिवर्धक भाजी, पोट साफ करते. अशक्तपणा जातो. प्रतिकार शक्ती वाढवते.
(६) आघाडा : पित्त झाल्यास आघाड्याचे बी ताकात देतात. त्वचा विकार, मूत्र विकार, कावीळ, दातदुखी यावर उपयुक्त, कफ बाहेर टाकण्यास मदत, मधुमेह व विषमज्वर यावर प्रभावी.
(७) शेवगा : शेवग्याच्या पानांपासून पावडर, चहा व रस करतात. शेवग्याची कोवळी पाने, फुले व शेंगाची भाजी करतात. यात अ, ब, क जीवनसत्वे असून, प्रतिकारशक्ती वाढवून अनेक समस्या दूर करते. रक्ताची कमतरता दूर करते.
डोळ्याचे विकार कमी करते. सांधेदुखी, ट्यूमर कमी करण्यात मदत, रक्तदाब नियंत्रणात ठेवते. मधुमेह नियंत्रणात ठेवते. घशाची खवखव कमी करते. कफ सर्दी कमी करण्यास मदत. पानाचा चहा औषधी आहे.
विकास माने, ९८९०११७५६३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.