Fruit Orchard
Fruit Orchard  Agrowon
ॲग्रो गाईड

Fruit Orchard Water Management : सध्याच्या वातावरणात फळबागांचे पाणी व्यवस्थापन कसे करावे?

डॉ. आदिनाथ ताकटे

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. सकाळी व सायंकाळी थोडासा गारवा, तर दिवसाचे सर्वसाधारण तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होताना दिसत आहे.

कडक सूर्यप्रकाश, गरम वारे, कोरडी हवा याचा विपरीत परिणाम नवीन लावलेल्या फळझाडांवर तसेच फळे देणाऱ्या झाडांवर होत असतो.

यामुळे कोवळी फूट करपणे, खोड तडकणे, फळगळ होणे, फळांचा आकार लहान होणे, सर्व पाने, फळे गळून झाडे वाळून जाणे, झाडांची वाढ थांबणे आणि शेवटी झाड मरणे असे प्रकार होतात. याकरिता पाणी आणि उपलब्ध साधनांचा कार्यक्षम वापर करावा.

पाण्याचा कार्यक्षम वापर

१) ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीने थेट फळझाडांच्या मुळापाशी गरजेनुसार पाणी द्यावे. या पद्धती पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्राकरिता अत्यंत फायदेशीर आहेत. या पद्धतीत इतर प्रचलित पद्धतीपेक्षा ५० ते ६० टक्के पाण्याची बचत होते.

उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ मिळू शकते. या पद्धतीमुळे झाडांच्या गरजेनुसार पाणी मोजून देता येते व पाण्याचा अपव्यय होत नाही. पाण्याबरोबर खते देता येतात,त्यामुळे खताच्या खर्चात बचत होते.

२) फळबागेस/पिकास पाणी सकाळी अथवा रात्री दिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रात एक आड एक सरीने पाणी द्यावे. पाणी देण्याच्या पाळीत (अंतरात) वाढ करावी.

उदाहणार्थ एखाद्या बागेस १० दिवसांच्या अंतराने पाणी देत असाल तर पुढील पाणी १२ दिवसांनी, त्यापुढील पाणी १५ दिवसांनी अशा प्रकारे जमिनीचा मगदूर, तापमान आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घ्यावी.

३) कमी क्षेत्रातील व जास्त अंतरावरील फळझाडांना मडका सिंचन पद्धती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. या पद्धतीत लहान झाडांना साधारणपणे दोन ते तीन वर्षाकरिता ५ ते ७ लिटर पाणी बसणारी लहान मडकी वापरावीत.

जास्त वयाच्या मोठ्या झाडांकरिता १० ते १५ लिटर पाणी मावेल, अशी मडकी वापरावीत. मडकी शक्यतो जादा छिद्रांकित किंवा आढीत कमी भाजलेली असावीत. पक्क्या भाजलेल्या मडक्याच्या बुडाकडील बाजूस लहानसे छिद्र पाडावे.

त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी. प्रत्येक झाडास दोन मडकी जमिनीत खड्डा खोडून बसवावीत. त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे. मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकणी किंवा लाकडी फळी ठेवावी.त्यामुळे मडक्यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही. या पद्धतीमुळे ७० ते ७५ टक्के पाण्याची बचत होते.

४) उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे जमिनीतून पाण्याचे अधिक उत्सर्जन होते. आच्छादनांचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते. आच्छादनाकरिता पालापाचोळा, वाळलेले गवत, लाकडी भूसा, उसाचे पाचट, गव्हाचे काड, भाताचे तुसाचा वापर करावा.

सेंद्रिय आच्छादनाची जाडी १२ ते १५ सेंमी असावी. सेंद्रिय आच्छादन वापरल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. सध्या आच्छादनासाठी पॉलिथीन फिल्मचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. आच्छादनामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तणांची वाढ होत नाही,तसेच जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते.

५) सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन असेल तर कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते. आच्छादनांमुळे जमिनीची धूप कमी होते. जमिनीस भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते. आच्छादनामुळे दिलेल्या खताचा जास्त कार्यक्षमरीत्या उपयोग करून घेता येतो.

आच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्याच्या पाळ्यातील कालावधी वाढविता येतो. आच्छादनांमुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनातही वाढ होते.

६) फळझाडांनी जमिनीमधून शोषलेल्या एकूण पाण्यापैकी ९५ टक्के पाणी वनस्पती पर्णोत्सर्जनाद्वारे हवेत सोडतात. हे वाया जाणारे पाणी बाष्परोधकाचा वापर करून अडविता येते. पर्ण्ररंध्रेबंद करणारी आणि पानावर पातळ थर तयार करणारी बाष्परोधके उपलब्ध आहेत.

उन्हाळ्यातील पाणीटंचाईस तोंड देण्यासाठी बाष्पच्छादनाबरोबर, बाष्परोधकाचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. उन्हाळ्यात ६ ते ८ टक्के (६०० ते ८०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) तीव्रतेचे केओलीन २१ दिवसांच्या अंतराने किमान २ ते ३ वेळा फवारणी करावी.

७) नवीन लागवड केलेल्या फळझाडांना पहिल्या एक–दोन वर्षे कडक उन्हापासून सरंक्षण देण्यासाठी सावली करावी. झाडाच्या दोन्ही बाजूंना ३ फूट लांबीचे बांबू रोवावेत.या बाबूंना चारही बाजूने व मधून तिरकस असे बांबू किंवा कामट्या बांध्याव्यात.

त्यावर वाळलेले गवत अंथरावे. या गवतावरून तिरकस काड्या सुतळीने व्यवस्थित बांध्याव्यात. वाळलेल्या गवताऐवजी बारदाना किंवा शेडनेटचा वापर करावा.

८) उन्हाळ्यात वाऱ्याची गती १८ ते २० किमी प्रति तास असल्यास जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते. बागेभोवती अगदी सुरुवातीलाच शेवरी, मलबेरी, चिलार, विलायती चिंच, सुबाभूळ, ग्लिरिसिडीया, सुरु, शेर, निवडुंग यापैकी उपलब्ध वनस्पतींची कुपंणाकरिता लागवड करावी.

अशा कुंपणामुळे वारा वादळाचा बागेला त्रास होत नाही. गरम वाऱ्यापासून फळबागांचे सरक्षण होते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.बागेस कमी प्रमाणात पाणी लागते.

९) उन्हाळी हंगामात बाष्पीभवन व पर्णोत्सर्जनाचा वेग जास्त असल्यामुळे फळझाडांची पाने कोमजतात.पानांचे तापमान वाढते. पानातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पानातील अन्नांश तयार होण्याची क्रिया मंदावते.

अशा वेळी १ ते १.५ टक्का (१०० ते १५० ग्रॅम १० लिटर पाणी) पोटॅशिअम नायट्रेट आणि २ टक्के विद्राव्य डायअमोनिअम फॉस्फेट (२०० ग्रॅम १० लिटर पाणी) यांची २५ ते ३० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.यामुळे पानातील अन्नांश तयार होण्याची क्रिया गतिमान होते. झाडे जमिनीतील ओलावा शोषण्यास सुरुवात करतात.

१०) उन्हामुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास खोडावरील साली तडकण्याचे प्रमाण वाढू शकते. अशावेळी झाडांचे बुरशीजन्य व इतर रोगांपासून सरंक्षण करण्याच्या दृष्टीने खोडांना बोर्डो पेस्ट लावावी.

सर्वसाधारणपणे १ ते २ मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. बोर्डो पेस्ट लावण्याने सूर्यकिरण परावर्तीत होतात, खोडाचे तापमान कमी राहते, साल तडकत नाही.

११) उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असेल तर आंबे बहर, हस्त बहर न धरता मृग बहर धरावा. कारण मृग बहर धरल्यास पावसाळ्यात पावसाचे पाणी मिळते आणि थोडे फार वरचे पाणी देऊन बहर घेता येतो.

मात्र आंबे बहर धरल्यास उन्हाळ्यात पाणी द्यावे लागते. ते पाण्याच्या कमतरतेमुळे शक्य होत नाही, पाण्याची कमतरता असल्यास डाळिंब, संत्री, मोसंबी, पेरू यांचा मृग बहर धरावा.

उन्हाळ्यात विशिष्ट फळबागेसाठी विशिष्ट काळजी ः

- नवीन लागवड केलेल्य् नारळाच्या रोपांना सावली करावी.

- केळीचे घड झाकून घ्यावेत म्हणजे करपणार नाहीत.

- डाळिंबाच्या प्रत्येक फळाला कडक उन्हापासून सरंक्षण मिळण्यासाठी कागदी पिशव्या बांधाव्यात.

- बागेभोवती शेवरी, ग्लिरिसिडीया, मलबेरी, चिलर विलायती चिंच, सुबाभूळ यांचे कुंपण करावे. अशा कुंपणामुळे वारा वादळाचा बागेला त्रास होत नाही, त्यामुळे बागेचे पाणी कमी सुकते आणि कमी पाणी लागते.

- द्राक्षे,संत्रा, मोसंबी यांच्या झाडांना बोर्डो पेस्ट लावावी.

- लहान झाडावरील फुले, फळे काढून टाकावीत. झाडांची हलकी छाटणी करून घ्यावी. उन्हाळ्यात आवश्यकता असेल तर रासायनिक खते थोड्या प्रमाणात द्यावी.

- फळझाडांवर १ ते १.५ टक्का म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी केली असता पाणीटंचाई परिस्थितीत फळझाडांना तग धरण्यास मदत होते.

संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९, (मृदा शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT