Soil Texture
Soil Texture Agrowon
ॲग्रो गाईड

समजावून घ्या जमिनीची कणरचना...

प्रताप चिपळूणकर

विना नांगरणी पद्धतीच्या शेतीत लांब अंतरावरील पिकात सुरुवातीच्या काळात आणि जवळ अंतरावरील पिकात दोन पिकांमधील काळात तण (Weed) वाढवून सेंद्रिय खत व्यवस्थापन (Organic Fertilizer Management) अगदी फुकटात शक्य होते. हा सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) संपणारा व टिकून राहणारा असा दोनही प्रकारात मिळतो. तणाची वाढ करून तणनाशकाने (Weedicide) मारून टाकली की त्याचे मुळांचे जाळे हळूहळू आकसू लागते. त्याच्या सभोवती लहान-मोठ्या पोकळ्या निर्माण होतात. यामध्ये हवा खेळती राहते. पिकाची मुळे आणि मुळांभोवतालचे जिवाणू यांना हवा लागते. हवेचा जितका जास्त पुरवठा करता येईल तितके उत्पादन जास्त मिळते. नांगरलेल्या अगर मशागत केलेल्या जमिनीत अशी हवा खेळती ठेवणे शक्य नसते. यामुळे उत्पादन घटते.

जमिनीची निचरा शक्ती ः

१) जमिनीची स्वतःची अशी एक निचरा शक्ती असते. ती वापरून कमी होत असते आणि प्रयत्नपूर्वक वाढविता येते. माती अनेक लहान-लहान कण एकत्र येऊन तयार होते. सेंद्रिय पदार्थ कुजत असताना डिंकासारखे पदार्थ तयार होतात. हे लहान-लहान मातीचे कण एकत्र येऊन त्यांची दाणेदार गोळी स्वरूपाची रचना तयार होते. याला मातीची कणरचना (सॉइल ॲग्रिगेशन) असे म्हणतात.

२) जमिनीच्या सुपीकतेतील कणरचना हा एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे, ज्याचे नियंत्रण संपूर्णपणे आपल्या हातात आहे. मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष कुजविल्यास पाण्यात स्थिर कणरचना तयार होते. तण त्या मानाने कुजण्यास हलकी, तणे जर जून करून मारली तर त्याचे जमिनीखालचे अवशेषसुद्धा पाण्यात स्थिर कणरचना देऊ शकतात. आच्छादनातून अस्थिर तर जमिनीखालील भागापासून स्थिर अशा दोनही प्रकारच्या कणरचना गरजेच्या आहेत. कुजण्यास जड पदार्थ बुरशीकडून कुजविले जातात. मातीच्या कणांसभोवती बुरशीचे धागे वाढून त्यात मातीचे कण गुरफटले जातात. म्हणून असे म्हटले जाते, की सुपीकता वाढवायची असेल तर जमिनीत बुरशींची संख्या वाढविणे गरजेचे आहे. संवर्धित शेतीत ही सर्व कामे आपोआप होतात. यावर एक पैसाही खर्च नाही.

याबाबत मला आलेले काही अनुभव शेतकऱ्यांपुढे मांडतो. हरितक्रांतीनंतर १५ ते २० वर्षांनंतर रानाला ओलित करीत असता जो पाटाला कट्टा घालून पाणी वळविले जाते, तो कट्टा प्रवाहाबरोबर पाण्यात विरघळून मोडला जात असे. पुढे संवर्धित शेती करू लागल्यानंतर कट्टा पटकन धरला जात असे आणि असा कट्टा कधीच धुपून जात नसे. या मातीला एक प्रकारचा चिकटपणा आलेला आहे हा फरक मी स्वतः अनेक वेळा अनुभवला आहे.

दुसरा अनुभव असा आहे, की १९७६ ला बैलजोडी बंद करून नांगरणीसाठी पॉवरटिलर घेतला. त्या काळात पॉवरटिलरने नांगरणी करीत असता दातेरी नांगरावरील पत्र्यात माती अडकत असे. त्याचा जाड थर तयार झाल्यानंतर दात फिरण्यास अडथळा होत असे. मग ती सर्व माती कटावणीने पाडावी लागे. सुरुवातीला खूप ताकदीने कटावणी मातीत खुपसली, तर बोटाएवढाच तुकडा रिकामा होत असे. संपूर्ण माती काढण्याच्या कामात हात भगभगू लागत. रान नांगरलेले बरे; पण पत्र्यातील माती काढणे नको, अशी अवस्था होई. पुढे संवर्धित शेती चालू केल्यानंतर पत्र्यात अडकलेली माती २ ते ४ कटावणीच्या दाबात पटकन पडून पत्रा स्वच्छ होऊ लागला. मातीचा पोत कसा बदलतो याचे हे एक चिंतन करण्यासारखे उदाहरण आहे. हे अनुभव शिकण्यासाठी प्रत्यक्ष शेतात स्वतः काम करावे लागते. मेळाव्यातून व भाषणे ऐकून हे शिकता येत नाही.

जलधारण शक्ती ः

१) जमिनीत पिकाचे व तणाचे अवशेष कुजविल्यानंतर त्यातील सेंद्रिय कर्बाची पातळी वाढते. यामुळे जलधारण शक्ती वाढते. माझी

जमीन काळीभोर, ४ ते ५ मीटर खोल माती असणारी, उत्तम निचरा असणारी आहे. हरितक्रांतीत उत्पादन वाढले; परंतु सुपीकतेकडे दुर्लक्ष झाले. या जमिनीत दर ८ ते १० दिवसांनी पाण्याचा फेर आला नाही तर उन्हाळ्यात ऊस वाळत असे.

२) संवर्धित शेतीचा वापर करू लागल्यानंतर जलधारण शक्ती वाढली. आता १५ ते १८ दिवस पाण्याचा फेर लांबला तरी पीक अजिबात सुकणे बंद झाले. संवर्धित शेतीत वाढलेल्या सेंद्रिय कर्बाने केलेली ही कमाल आहे. सहकारी पाणीपुरवठा संस्थेवरील ऊस नेहमीच उन्हाळ्यात वाळतात, त्या शेतकऱ्यांनी या तंत्राचा अभ्यास करावा.

रासायनिक खताचा कार्यक्षम वापर ः

१) रासायनिक खताचे दर वाढत आहेत. यामुळे त्यावरील खर्चाचे आकडे एका बाजूला फुगत चालले आहेत. हरितक्रांतीच्या सुरुवातीच्या काळात अतिशय कमी खतात चांगले उत्पादन मिळत असे. पुढे पुढे ते कमी मिळू लागले. म्हणून शेतकऱ्यांनी खताचे हप्ते वाढविले. (५० ते १०० टक्के). जसजशी वर्षे जातील तसे हप्ते वाढतच गेले.

२) मी संवर्धित शेती लवकरच स्वीकारल्याने शेती करायला सुरुवातीला जे हप्ते शिफारशीप्रमाणे देत होतो तितक्याच खत हप्त्यात आज ५० वर्षांनंतरही पिकाचे उत्पादन मिळते. ही संवर्धित शेतीतून मिळणाऱ्या सेंद्रिय कर्बाची कमाल आहे. आज रासायनिक खताची १८ ते २० टक्केच कार्यक्षमता वापरली जाते. हा आणखी १० ते २० टक्के आपण वाढवू शकलो तर शेतीत क्रांती होऊ शकते. जे संवर्धित शेतीत सहज शक्य आहे.

जमिनीचे शुद्धीकरण ः

१) देशावरील जमिनीचा सामू ७ च्या पुढे जाऊन बहुतेक जमिनी अल्कधर्मी बनत चालल्या आहेत. जागेला सेंद्रिय पदार्थ कुजविल्यास निर्माण होणाऱ्या सेंद्रिय आम्लामुळे अल्कता कमी होऊन जमिनीचे शुद्धीकरण होते. यासाठी कुजायला हलक्यापासून जडपर्यंत सर्व दर्जाचे पदार्थ सातत्याने जमिनीतच कुजले पाहिजेत.

२) पिके वाढविणे हे अल्कधर्मी काम आहे आणि पिकाचे अवशेष कुजविणे हे आम्लधर्मी काम आहे. आपण अल्कधर्मी काम सातत्याने जमिनीत करतो. आम्लधर्मी काम जमिनीबाहेर करून चांगले कुजलेले खत वापरतो. यामुळे तयार झालेल्या सेंद्रिय आम्लांना तेथे काहीच काम नसल्याने ती कर्बवायू + पाणी अशी संपून जातात.

३) पीक वाढत असता निर्माण झालेली अल्कता जमिनीत साठत जाते. जमिनी काही वर्षांनंतर अल्कता दाखवू लागतात. काही जण यासाठी गंधकाम्ल अगर स्फूरदाम्ल वापरण्याची शिफारस करतात. हे चुकीचे आहे. ही अल्कता संपविण्याचे काम निसर्गात आपोआप होऊ शकते; परंतु शेतकऱ्यांना तसे शिकविले जात नाही. अजून चांगले कुजलेल्या शेणखत कंपोस्टचीच शिफारस केली जाते. मग निर्माण होणाऱ्या अल्कतेचा दोष रासायनिक खतांना दिला जातो. हे अत्यंत चुकीचे आहे. वरील संवर्धित शेतीचे तंत्र शिकवणे गरजेचे आहे.

पिकाचा दर्जा महत्त्वाचा

१) आज बहुतांशी शेतकरी पीक उत्पादन जास्तीत जास्त कसे मिळवता येईल यामागेच धावतो आहे. फक्त जास्त उत्पादन घेण्यापेक्षा उत्तम दर्जाचे उत्पादन घेणे याला तितकेच महत्त्व आहे. तुमचा स्वतःचा एक ब्रँड बाजारात विकसित झाला पाहिजे, तर मर्यादित उत्पादन घेऊनही आपण चांगले पैसे कमावू शकतो. बाजारात तेजी-मंदी असणारच आहे. मंदीमध्येही केवळ दर्जावर पैसे करता येतात. आज बाजारात सर्व शेतमालाची आवक भरपूर आहे. त्यातच आपला माल दर्जावर आपल्याला पैसे देऊ शकतो.

२) आम्ही रसायनविरहित गूळ तयार करतो. हंगामात सर्व गूळ मी घरीच विकतो. कितीही भरपूर केला तरी मार्चअखेर माल संपून जातो. कित्येक ग्राहकांना गूळ संपल्याची पाटी वाचून नाराज होऊन परतावे लागते.

३) अनेक शेतकऱ्यांचा गूळ खारट होऊ लागला आहे. मात्र आपला गूळ स्वच्छ, गोड चवीचा आहे. त्याचबरोबर त्याला एक स्वतंत्र चव, स्वाद, सुगंध आहे. जो अलीकडे लुप्त झाला आहे. तांदळाच्या अनेक जातींना सुगंध असतो; परंतु जमिनी खराब झाल्याने सुगंध गायब झाला आहे. संवर्धित शेतीत तो परत पहिल्यासारखा येतो. आम्ही थोडाफार तांदूळ विकतो. तयार होण्याअगोदर ग्राहकांकडून मागणीची नोंद असते. असा संवर्धित शेतीचा महिमा अगाध आहे. शेतकऱ्यांनी ही शेती पद्धती आत्मसात करावी.

संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८

(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT