Turmeric Crop Management
Turmeric Crop Management Agrowon
ॲग्रो गाईड

Turmeric Crop Management : हळदीची पाने पिवळी पडण्याची समस्या अन् उपाय

टीम ॲग्रोवन

डॉ. मनोज माळी, डॉ. रावसाहेब पवार, डॉ. संग्राम काळे

हळद लागवड (Turmeric Cultivation) होऊन २ ते ३ महिन्यांचा कालावधी झाला आहे. पीक सध्या कायिक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी हळद पीक (Turmeric Crop) पिवळे पडत असल्याचे दिसत आहे. पिवळेपणा वाढत गेल्यास अन्न निर्मिती प्रक्रियेत अडथळा येतो. परिणामी उत्पादनात (Turmeric Production) घट येते. तसेच हळदीची प्रत (Turmeric Quality) किंवा गुणवत्ता घटक जसे रंग, कुरकुमीनचे प्रमाण आदी बाबींवर परिणाम होतो. त्यासाठी हळद पीक (Turmeric) पिवळे पडण्यामागील नेमकी कारणे शोधून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. पिकाच्या कायिक वाढीच्या काळात अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (Integrated Nutrition Management) तसेच कीड-रोग व्यवस्थापन (Pest-Disease Management) करणे गरजेचे आहे.

पाने पिवळी पडण्याची कारणे ः

१) समस्यायुक्त जमिनीमध्ये लागवड ः

- हळद लागवडीसाठी क्षारपड जमीन (विद्युत वाहकता ४ डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा जास्त),चोपण जमीन (सामू ८.५ पेक्षा जास्त आणि विनीमययुक्त सोडिअमचे प्रमाण शेकडा १५ पेक्षा जास्त ) आणि चुनखडीयुक्त जमीन (कॅल्शिअम कार्बोनेट चे प्रमाण शेकडा ५ पेक्षा जास्त) निवडलेली असेल तर अशा जमिनीत हळद पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये (नत्र, स्फुरद, पालाश व कॅल्शिअम , मॅग्नेशिअम, गंधक) आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये (लोह, जस्त, बोरॉन) यांची उपलब्धता कमी होते.

- हळद पिकाचे शेंड्याकडील पाने पिवळी पडून वाढ खुंटते. परिणामी हळद पिकाच्या पानांवर कायम स्वरूपी पिवळसरपणा दिसून येतो.

- विशेषतः चोपण जमिनीमध्ये मातीच्या कणांची रचना बिघडल्यामुळे जमिनी घट्ट बनतात. अशा जमिनीत हवा-पाणी खेळण्याचे प्रमाण अत्यल्प असते. जमिनीमध्ये नत्र, मॅग्नेशिअम आणि लोहाच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात.

२) अधिक प्रमाणात पाऊस ः

- अधिक पावसामुळे जमिनीत पाणी साचून राहते. परिणामी जमीन संपृक्त होते. हवा खेळती राहत नाही.

- अशा स्थितीत हळद पिकाच्या मुळांना श्वासोच्छ्वास (ऑक्सिजन) घेण्यास अडथळा येतो. परिणामी मुळांची वाढ खुंटते आणि पिकाला जमिनीतील अन्नद्रव्ये शोषून घेता येत नाही. पिकाची शेंड्याकडील पाने पिवळी पडतात.

- सततच्या पावसामुळे शेतात ओलावा कायम असल्यामुळे डवरणी करण्यास अडचण निर्माण होते. अति ओलाव्याने पाने पिवळी पडतात. त्यासाठी योग्य निचरा पद्धतीचा अवलंब करून शेतातील अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे.

३) अन्नद्रव्यांची कमतरता ः

- लागवडीपासून ते काढणीपर्यंत वाण परत्वे हळद पीक नऊ महिने शेतात राहते. उत्पादनाचा स्रोत जमिनीत वाढणारे गड्डे (कंद) असल्यामुळे बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की, नत्रयुक्त खते जसे युरिया दिल्यास हळदीचे गड्डे खराब होतील. त्यामुळे हळद पिकास शिफारशीत मात्रेत नत्रयुक्त खते मिळत नाहीत.

- जमिनीतील अन्नद्रव्ये जसे नत्र, मॅग्नेशिअम आणि लोह यांच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात.

- नत्राच्या कमतरतेमुळे पाने लहान व फिक्कट हिरवी होतात. काहीवेळा संपूर्ण पान पिवळे होते. मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे पाने कडापासून पिवळी पडतात. लोहाच्या कमतरतेमुळे हरितद्रव्याची निर्मिती कमी होते. परिणामी पाने पिवळी दिसतात, पानातील शिरा हिरव्या राहतात.

४) ढगाळ वातावरणामुळे अपुरे प्रकाश संश्लेषण ः

सतत ढगाळ वातावरण राहिल्यास अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. परिणामी पाने स्वतःचे अन्न (हरितद्रव्य) तयार करू शकत नाहीत. त्यामुळे पाने पिवळी पडतात.

उपाययोजना ः

१) जमीन व्यवस्थापन ः

- लागवडीसाठी मध्यम प्रतीची, भुसभुशीत व पाण्याचा चांगला निचरा होणारी, उत्तम सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. जमिनीत गरजेपुरता सतत वाफसा असणे गरजेचे आहे. त्यामुळे बारीक तंतुमय मुळांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

- चोपण, क्षारपड, चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हळद लागवड करू नये. लागवडी पूर्वी माती परीक्षण करून घ्यावे. त्यामुळे खतांचे नियोजन करणे सोईस्कर होते.

- जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ पर्यंत असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.८ टक्के पेक्षा जास्त असावे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर चांगले परिणाम दिसून येतात. अन्नद्रव्य पुरवठ्याचा वेग हा जमिनीतील सेंद्रिय कर्बावर अवलंबून असतो.

- चुनखडीयुक्त जमिनीत दरवर्षी भरपूर प्रमाणात सेंद्रिय खते मिसळल्यास आणि खोल नांगरट करून गंधकाचा वापर केल्यास चुनखडीचा पिकावरील वाईट परिणाम कमी करता येतो. हिरवळीची खते उदा. ताग, धैंचा घेऊन ती फुलोऱ्यात असताना (४५ ते ५० व्या दिवशी) जमिनीत गाडावीत. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते.

- भारी काळ्या जमिनीमध्ये अतिवृष्टी होऊन शेतात पाणी साचले असल्यास चर खोदून पाणी उताराच्या दिशेने शेताबाहेर काढावे. कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे आळवणी किंवा फवारणी करावी.

२) अन्नद्रव्यांचे नियोजन ः

- नत्राची कमतरता असल्यास युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) याप्रमाणे पानांवर फवारणी करावी.

- रासायनिक खतांचा वापर करताना नत्र हे अमोनिअम सल्फेटद्वारे, स्फुरद हे डाय अमोनिअम फॉस्फेटद्वारे आणि पालाश हे सल्फेट ऑफ पोटॅशद्वारे हळद पिकाला दिल्यास खतांची आणि पर्यायाने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

- रासायनिक खते जमिनीच्या पृष्ठभागावर फोकून देऊ नयेत. ती जमिनीत पेरून मातीत मिसळून द्यावीत.

- सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. लोह हे फेरस सल्फेट द्वारे, झिंक हे झिंक सल्फेट द्वारे, बोरॉन हे बोरॅक्स द्वारे जमिनीत सेंद्रिय खतात मिसळून द्यावीत. सेंद्रिय खतांचा नैसर्गिक चिलेट म्हणून उपयोग होतो. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

- हळदीला (पावडरला) गर्द पिवळा रंग येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कुरकुमीन घटकाची योग्य प्रमाणात वाढ होण्यासाठी गंधक हे आवश्यक असते.

- पाने लोहाच्या कमतरतेमुळे पिवळी पडल्यास पानांवर फेरस अमोनिअम सल्फेट किंवा फेरस सल्फेट ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून ३ ते ४ वेळा फवारणी करावी.

- फवारणीसाठी लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते चिलेटेड स्वरूपात असल्यास उपलब्धता वाढते. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे असते. चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचे फवारणीचे प्रमाण १० ते २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी असे ठेवावे. फवारणीसाठी शासन प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड-२ किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने उत्पादित केलेले द्रवरूप फुले मायक्रो ग्रेड -२ यांचा वापर करावा.

- माती परीक्षण अहवालामध्ये जमिनीमध्ये लोह आणि जस्ताची कमतरता असल्यास शिफारशीत खत मात्रे बरोबर शिफारशीत प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्ये हे रासायनिक खते तसेच शेणखतात मिसळून द्यावीत.

सूक्ष्म अन्नद्रव्ये--- प्रमाण (प्रति एकर)---द्यावयाची वेळ

१) फेरस सल्फेट (हिराकस)---५ किलो---लागवडीनंतर दीड महिन्याने

२) ००--५ किलो---भरणी करताना (लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी)

३) झिंक सल्फेट---४---लागवडीनंतर दीड महिन्याने

४) ००---४ किलो---भरणी करताना (लागवडीनंतर २.५ ते ३.०० महिन्यांनी)

----------------------

- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४

डॉ. रावसाहेब पवार, ९८९०३ ४००७३

डॉ. संग्राम काळे, ८८८८२ ८०८८५

(हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT