Amba Mohar
Amba Mohar Agrowon
ॲग्रो गाईड

Amba Mohar : मोहरली आंबेराई, अन्...

Team Agrowon

डॉ. कैलास दौंड

Mango Agriculture : आंब्याच्या झाडांना मोहर आला की वातावरणामध्ये एक वेगळा सुगंध थरारून जातो. सारे रान त्या वासांनी धुंद होते. आंब्याच्या मोहरासोबतच त्याच्याशी संबंधित कुटुंबांचा उत्साह वाढू लागतो.

हापूस, पायरी, लंगडा, तोतापुरी, निलम, केसर असे काही आंब्याचे वाण आता लोकप्रिय झालेले आहेत. अक्षय तृतीया झाली की साधारणतः बाजारपेठेत आंब्यांची गजबज दिसू लागते. बाजारपेठेत आंब्यांची निवड करायला पुरेपूर संधी असते पण खरेदीला मर्यादा असते.

घरचीच जर आंब्यांची झाडे असतील तर मात्र त्याचे आंबे खाण्यात वेगळाच आनंद आणि मनसोक्त समाधान मिळते. अलीकडे केसर आंब्यांचीच आपल्याकडे अधिक चलती दिसते. मात्र एकाच ऋतूमध्ये नेहमी‌ केसर खाल्याने एकाच विशिष्ट गोड चवीचाही कंटाळा येतो.

अशावेळी जुन्या आणि मधल्या पिढीतील लोकांना आठवतात त्या गावातील वेगवेगळ्या चवीची आंबे देणाऱ्या आंबेराया. गावोगावच्या जुन्या आंबेराया नष्ट झाल्या आहेत तर उरलेल्या आंबेराया जवळपास अखेरच्या घटका मोजत आहेत.

गावोगावच्या आंबेरायांचा काळ आजच्या प्रौढ माणसांनाही चांगलाच आठवत असेल. नदीकाठी, ओढ्याकाठी आणि डोंगराच्या जवळ आंबेराया हमखास असत. त्यामुळे भरपूर आंबे उपलब्ध होत. अगदी ज्यांना शेती नाही किंवा आंब्यांची झाडे नाहीत त्यांनाही आंबे खायला भेटत.

पिकून खाली पडणाऱ्या आंब्याला दुसऱ्या कुणी खाण्यासाठी उचलले तरीही मालक काही म्हणत नसत. या आंबेराया मधील प्रत्येक आंब्याचे अंबामत्व (व्यक्तीचे जसे व्यक्तिमत्त्व असे तसे) असे.

त्याचे रूप, त्याची उंची, पानाच्या रंगांची हिरवी छटा, त्याच्या फळाचा आकार, त्याची पिकण्याची पद्धत, त्याची चव हे सगळे प्रत्येकाचे वेगवेगळे असे. त्यामुळे त्या प्रत्येक आंब्याचा परिसरातील लोकांना खास परिचय असे.

शिवाय आंबेराई मधील शक्यतो कोणत्याही दोन आंब्याची चव एकसारखी नसे. काहींच्या कैऱ्या आंबट आणि पाडी लागल्यानंतर पाड गोड‌ तर अढीत पिकवल्यावर एकदम गोड असे. काहींची चव शेपट असे‌ तर काही आंबटही असत.

काही दिसायला एकदम साधी दिसत पण त्यांची चव अफलातून असे; उलट काही झाडे अशी असत की त्यांचे दिसणे खूपच मोहक आणि आकर्षक असे पण जिभेचे चोचले पुरवण्यात हे थोडे कमी पडत. अशा परिस्थितीत जे झाड आंब्याचे रूप आणि चव याबाबतीत सरस असेल त्याचा गवगवा गावभर पसरलेला असायचा.

शिवाय आंबेराईतील आंबे पाडी लागण्याचा काळही थोडाफार मागेपुढे असायचा. या झाडांची नावे गोटी, कळशा, कोयरी, शेंदऱ्या, हळद्या, ‌काळ्या अशा प्रकारची असत. ज्यांच्या मालकीच्या आंबेराया असत त्यांच्या घरी आंबेराईच्या दिवसात पाहुणे रावळ्यांची वर्दळ असे.

काही आंबे उशिरा पाडी लागत. थेट आषाढात पाडी लागणारेही काही आंबे असत. एका लोकगीतातील स्त्रीला तिचा 'हिरा आंबा' पाडी लागण्याच्या दिवसात भावाची आठवण येते. तो भाऊ तिला मंजूळ वाऱ्यासारखा वाटतो.

या वाऱ्याच्या हेलकाव्यांनिशी हिरा नावाचा आंबा डौलाने हालतो अर्थातच काही पिकू लागलेली फळे तो भावासाठी खाली टाकतोच.

‘आखाडीचा हिरा‌ आंबा लई डौले देतू

सुखी हाई मपला बंधू, मंजुळ ग वारा येतू.’

बहिणीची ही माया तिच्या भावासाठी असते. मात्र आंब्याच्या शेजारी शेती असणारे लोकही त्या आंब्याखाली जात येत असतात. आंब्याच्या हंगामात लोकांच्या ये-जा करण्याने तिथे एखादी पाऊलवाटच तयार होते.

विशेषतः ज्या झाडाचे आंबे चवीला खूप गोड असतील त्या झाडाखाली पाऊलवाट तयार होणे ही जणू साहजिकच गोष्ट होती. स्त्रियांच्या जात्यावरील गाण्यात आंबेराईशी संबंधित काही ओव्या हमखास असायच्या. त्या ऐकताना त्या आंबेराईचे, तिथल्या परिसराचे एकूणच चित्र मनपटलावर उभे राही.

‘आंब्याची आंबेराई मह्या घरी लई दाट

कळशा कोयरी खालून, पडली पाऊलवाट.’

या आंब्याच्या दिवसात पाहुण्या-रावळ्यांची घरी वर्दळ असते. त्यातही आपला भाऊ देखील आपल्याला यावेळी भेटायला यावा. मग त्याला खाण्यासाठी आमरसाचे जेवण करता येईल असा विचार देखील स्रीमन करते.

आताही अनेक शेतकरी आंब्यांच्या बागा लावतात आणि त्या बागांनाही कैऱ्यांचे घोस लगडतात. त्यांच्याकडे बागा नाहीत त्या बहिणीही या दिवसात बंधूराजाची वाट पाहतात.

‘पाहुणे आले मला आंब्याच्या दिसात

बंधवाला मह्या तूप वाढीते रसात.’

आंब्याचे झाड आणि त्याची गर्दगार सावली पाहिली की स्त्रियांचे मन माहेरी पिंगा घालू लागे. आईवडिलांची सय दाटू लागे. या सावलीत निवांत विसावा घ्यावा असे मनात येई.

‘असे मायबाप मह्ये, माझं आंबियाचं बन

थंडगार सावलीला थीर झालं माझं मन.’

असा हा मोहरल्या आंबेराईचा हंगाम, जगण्यात रस भरणारा!

(लेखक ग्रामीण कवी व कादंबरीकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT