Tomato Cultivation
Tomato Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Tomato : तंत्र टोमॅटो पुनर्लागवडीचे...

टीम ॲग्रोवन

डॉ. अनिकेत चंदनशिवे, डॉ. भरत पाटील, भूषण हंडाळ

टोमॅटो पिकाच्या पुनर्लागवडीसाठी (Re Cultivation Of Tomato) जमिनीची पूर्वमशागत (Land Cultivation) करून जमीन तयार ठेवावी. रोपांची लागवड सरी-वरंबा किंवा गादीवाफ्यांवर ठिबक सिंचन (Micro Irrigation) पद्धतीने करावी. मिरची (Chili), वांगे (Brinjal), बटाटे (Potato) इत्यादी फळवर्गीय भाजीपाला पिके (Vegetable Crop) घेतलेल्या जमिनीत लागवड करणे टाळावे. टोमॅटो पिकाच्या (Tomato Crop) पुनर्लागवड करताना पिकाची अवस्था माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी आणि खत व्यवस्थापन, आंतरमशागत तसेच कीड व रोगनियंत्रण आदी बाबींचे नियोजन करणे सोईस्कर होते.

वाढीच्या अवस्थेनुसार व्यवस्थापन ः

तिसरी अवस्था ः

- ही लागवडीपासून ३० ते ३५ दिवसांची अवस्था आहे. यात रोपांची शाकीय वाढ जोमाने होते.

- झाडांना गरजेप्रमाणे अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. त्यामुळे झाडे सशक्त होऊन चांगला विस्तार होतो.

- या अवस्थेमध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करावे.

चौथी अवस्था ः

- ही लागवडीपासून ३५ ते ४५ दिवसांनी येणारी फुलकळीची अवस्था असते.

- या अवस्थेत पिकास फुले येऊन फळे तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे या अवस्थेत अन्नद्रव्यांची गरज अधिक असते.

- अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फुलगळ व फळगळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा होणे आवश्यक असते.

पाचवी अवस्था ः

- ही लागवडीपासून ५५ ते ६० दिवसांची अवस्था असून यात फळांची वाढ होते.

- या अवस्थेत फुलांची व फळांची संख्या वाढण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे गरजेचे असते.

- योग्य काळजी घेतल्यास फळांचा रंग, आकार व चव आणि उत्पादन वाढीस मदत होते.

जमीन ः

- पुनर्लागवडीसाठी चांगला निचरा होणारी, मध्यम व काळी किंवा पोयट्याची जमीन निवडावी.

- जमिनीतून जास्तीच्या पाण्याचा आणि क्षारयुक्त पाण्यातील क्षारांचा निचरा योग्य प्रकारे होण्यासाठी जमिनीत चर काढणे आवश्यक आहे.

पूर्वमशागत ः

- जमीन खोल नांगरून दोन आडव्या पाळ्या द्याव्यात.

- हेक्टरी २० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.

- शेतातील सर्व काडीकचरा गोळा करून नष्ट करावा.

रोप प्रक्रिया ः

- पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांवर रासायनिक प्रक्रिया अवश्य करावी.

- पुनर्लागवडीसाठीची रोपे

मेटॅलॅक्झिल (एम ३१.८ टक्के इ.एस.) ०.६ ग्रॅम किंवा

कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम

प्रतिलिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून काढावीत.

- नर्सरीमधून आणलेल्या रोपांच्या ट्रेमध्येच वरील द्रावणाची आळवणी करावी.

(ॲग्रेस्को शिफारस आहे.)

पुनर्लागवड ः

- शेतामध्ये सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे तयार करून घ्यावेत.

- पुनर्लागवडीपूर्वी रोपवाटिकेमध्ये साधारणतः १ आठवडा अगोदर पाण्याची मात्रा हळूहळू कमी करावी. म्हणजे रोपे कणखर होतात.

- जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुनर्लागवडीची कामे पूर्ण करावी.

- लागवडीसाठी वाफ्यातून रोपे काढण्यापूर्वी एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे. त्‍यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज निघतात.

पुनर्लागवडीसाठी २५ ते ३० दिवसांची, १० ते १५ सेंमी उंच व साधारण ६ ते ८ पाने असलेली रोपे निवडावीत.

- लागवडीसाठी योग्य वाढीची सशक्त रोपे निवडावीत. मुळे नसलेली, चपटे, वाकडे किंवा पातळ खोड असलेली रोपे पुनर्लागवडीसाठी वापरू नयेत.

- दोन रोपांत साधारण ३० सेंमी आणि सरीत ९० सेंमी अंतर ठेवून टोमॅटो रोपांची लागवड करावी.

- लागवडीनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे.

- लागवडीनंतर १० दिवसांनी मेलेली रोपांच्या जागी नवीन रोपे लावावीत.

खत व्यवस्थापन ः

- टोमॅटो पिकाला हेक्टरी २० टन शेणखताची आवश्यकता असते.

- संकरित वाणासाठी नत्र ३०० किलो, स्फुरद १५० किलो आणि पालाश १५० किलो, तर सुधारित वाणांसाठी नत्र २०० किलो, स्फुरद १०० किलो, पालाश १०० किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. लागवडीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा तर स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. उर्वरित नत्र ३ समान हप्त्यात विभागून लागवडीनंतर २० दिवसांच्या अंतराने द्यावे.

- खतांच्या मात्रा बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रात देऊन लगेच पाणी द्यावे.

- जैविक खतांमध्ये ॲझेटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जिवाणू आणि पालाश विरघळविणारे जिवाणू संवर्धक प्रत्येकी ६ किलो प्रमाणे १ टन शेणखतात मिसळून द्यावे.

पाणी व्यवस्थापन ः

- रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे. सुरुवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते. त्यामुळे फुलोरा येईपर्यंत (लागवडीपासून अंदाजे ६५ दिवसांपर्यंत) पिकाची पाण्याची गरज आणि वाफसा पाहून सिंचन करावे.

- हलक्या जमिनीत पाण्याच्या जास्त पाळ्या तर भारी जमिनीत पाण्याच्या कमी पाळ्या द्याव्यात.

- पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. पाण्याचा ताण पडल्यास फूल व फळगळ, फळ धारणा न होणे अशा समस्या उद्‍भवतात.

आधार देणे ः

- लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी झाडांची वाढ जोरदार झाल्यानंतर फांद्या व फुटी जोरात फुटतात. त्याकरिता त्यांना बांबू, सुतळी व तार यांनी आधार द्यावा.

- सरीच्या बाजूला ६ ते ९ फूट उंचीचे लाकडी बांबू जमिनीत रोवून घ्यावेत. जमिनीपासून १ मीटर उंचीवर दोन्ही खांबांवर तार ओढावी व घट्ट बांधून व मध्ये बांबूने आधार द्यावा.

- झाडाची उंची ३० सें.मी. झाल्यानंतर, झाडाच्या खोडाला सैलसर सुतळी बांधून ती तारेला बांधावी. नंतर जसजसे झाडाला नवीन फांद्या फुटतील, तशा प्रत्येक फांद्या सुतळीने तारेला ओढून बांधाव्यात.

मातीचा भर देणे ः

लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांत झाडांना मातीची भर द्यावी. यासाठी झाडाच्या समोरील अर्धी सरी फोडून झाडाच्या बाजूस माती लावावी, त्यामुळे झाडाच्या खोडाला आधार मिळतो आणि मुळ्या फुटण्यास मदत होते. मातीतील हवेचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. मातीची भर देताना झाड मातीमध्ये जास्त गाडणार नाही, याची काळजी घ्यावी.

फुलगळ व फळगळ ः

जास्त तापमान, अपुरा सूर्यप्रकाश, पाण्याचा ताण, कीड-रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे टोमॅटो पिकांत फुलगळ आणि फळगळ होते. त्यासाठी बोरॉन आणि एनएए (२० पीपीएम) या वाढ संप्रेरकाची प्रत्येकी ०.२ मिलि प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

- डॉ. अनिकेत चंदनशिवे, ७०६५७९१११५

(भाजीपाला संशोधन संकुल, उद्यानविद्या विभाग

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT