Custard Apple Disease Agrowon
ॲग्रो गाईड

सीताफळामध्ये आढळतोय ‘टी मॉस्क्युटो बग’

मुख्यत्वे चहा, कॉफी व कोकणात काजूत आढळणाऱ्या ‘टी मॉस्किटो बग’ या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव मागील वर्षी पुरंदर (जि. पुणे) भागातील काही सीताफळ बागांमध्ये २० ते ३० टक्के प्रमाणात आढळला आहे. या किडीचा प्रादुर्भाव व नुकसानही पुढे वाढू शकते. वेळीच खबरदारी घेऊन या किडीची ओळख व नियंत्रणाच्या उपायांबाबत सज्ज होणे गरजेचे आहे.

टीम ॲग्रोवन 

नितीश घोडके, डॉ. युवराज बालगुडे, डॉ. प्रदीप दळवे

सीताफळात जूनमध्ये नैसर्गिक बहर येतो. परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीस बहर धरता येतो. उन्हाळी बहाराची फळे जुलै-ऑगस्टदरम्यान काढणीस तयार होतात. त्यास चांगला बाजारभाव मिळतो. उन्हाळी बहर धरणाऱ्या काही शेतकऱ्यांनी छाटणी पूर्ण केली आहे. काही त्याच्या तयारीत आहेत. मुख्यत्वे चहा, कॉफी तसेच कोकणातील काजू पिकावरील डासासारख्या दिसणाऱ्या ‘टी मॉस्किटो बग’ या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव मागील वर्षी सीताफळावर २० ते ३० टक्के प्रमाणात आढळला. कीड व पुढे बुरशी संसर्गातून झाडांचे शेंडे जळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी प्रादुर्भावाची वेळीच दखल घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे.

नुकसान होणारी पिके

  • बहुभक्षी. चहा, कॉफी, काजू, कोको, शेवगा, कडुलिंब, पेरू, डाळिंब, सफरचंद, द्राक्षे, सीताफळ अशा सुमारे १०० हून अधिक पिकांवर आढळते.

  • या किडीमुळे सीताफळाचे नुकसान झाल्याची नोंद २००९ मध्ये सर्वप्रथम कर्नाटक राज्यात.

किडीची जीवनक्रम :

  • मादी सीताफळाची कोवळी फूट, कोवळ्या पानांचे देठ तसेच पानाच्या खालील बाजूच्या शिरेत एकटी अथवा समूहामध्ये लंबगोलाकार १.५ ते २.० मिमी लांबीची अंडी देते.

  • एकूण जीवनकाळात ६० ते ८० अंडी. ज्या ठिकाणी अंडी घातलेली असतात त्या ठिकाणच्या सालीमधून दोन बारीक केसासारखे भाग वर आलेले दिसतात. अंड्यामधून साधारण ६ ते १२ दिवसात तांबूस रंगाची मुंग्याप्रमाणे दिसणारी लहान पिले बाहेर पडतात. पिलांची अवस्था ११ ते १३ दिवसांत पूर्ण होते. प्रौढ अवस्था ८ ते १२ दिवस असते. संपूर्ण जीवनक्रम पूर्ण होण्यास सुमारे २५ दिवस लागतात.

नुकसानीचा प्रकार :

पिले व प्रौढ सीताफळाच्या झाडांची कोवळी फूट, कळ्यांचा व फुलांचा देठ, कोवळी व पक्व फळे या भागामधून रस शोषतात. जिथे ही कीड सोंड घुसवून रस शोषते, तेथील पेशी लाळेतील विषारी विकरांच्या कार्यामुळे मरून जातात. कालांतराने पेशी काळ्या पडून कठीण होतात. नंतर रस शोषणामुळे तयार झालेल्या ठिपक्यांचा आकार मोठा होतो. करपल्यासारखा काळा पडतो. या किडीमुळे होणाऱ्या जखमांमधून फळसड रोगाच्या बुरशी (उदा. कोलेटोट्रीकम ग्लिओस्पोराइड्स) प्रवेश करते. त्यामुळे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेंडेमर, शेंडे करपणे, कळ्या जळणे, फळे देठाजवळ काळी पडणे व सडणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.

एकात्मिक व्यवस्थापन :

किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून आला तरी आर्थिक नुकसान पोहोचविण्याची क्षमता जास्त आहे. त्यामुळे कीड सर्वेक्षण अत्यंत गरजेचे आहे. कोवळ्या फुटीवर या किडीचा प्रादुर्भाव ५ ते ८ टक्क्यांपर्यंत आढळल्यास किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असे समजून नियंत्रणाचे उपाय करावेत.

  • बागेत स्वच्छता राखावी.

  • नियोजनबद्ध एकात्मिक खत व पाणी व्यवस्थापन करावे.

  • जीवनक्रम लक्षात घेता ही कीड कोवळ्या फुटींवर अंडी घालते. त्यामुळे उशिरा येणारी कोवळी फूट काढून नष्ट करावी.

  • सीताफळामध्ये या किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचे लेबल क्लेम नाही. चहा पिकामध्ये मात्र पुढील रासायनिक कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे. त्यांचा केवळ संदर्भ येथे देत आहोत.

नाव प्रमाण प्रति १० लिटर पाणी काढणीपूर्व कालावधी

  • बायफेन्थ्रीन (८ % एससी) १२.५ मिलि ११ दिवस

  • क्लोथीयानिडीन (५० % डब्ल्यूडीजी) २.४ ग्रॅम ०५ दिवस

  • थायाक्लॉप्रीड (२१.७ % एससी) ९.३७ मिलि ०७ दिवस

  • थायामेथोक्झाम (२५ % डब्लूजी) २ ग्रॅम ०७ दिवस

  • थायामेथोक्झाम १२.६० % अधिक ३.७५ मिलि ०१ दिवस

  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५० % झेडसी

काजू संशोधन संचालनालय, पुत्तूर, कर्नाटक या संस्थेमार्फत काजू पिकात या किडीच्या नियंत्रणासाठी आयोजित प्रशिक्षणात शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांची माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे.

(प्रमाण प्रति १० लिटर पाणी)

  • पहिली फवारणी (कोवळी फूट फुटताना) : लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ६ मिलि किंवा

  • इमिडाक्लोप्रीड ६ मिलि किंवा ॲसिटामीप्रीड ५ मिलि किंवा प्रोफेनोफॉस १५ मि

  • दुसरी फवारणी (फुलधारणा होताना): लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ६ मिलि

  • तिसरी फवारणी (फळधारणा होताना) : लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ६ मिलि किंवा

  • प्रोफेनोफॉस १५ मिलि प्रति १० लिटर

  • एकदा वापर केलेल्या कीटकनाशकाचा नंतरच्या फवारणीसाठी वापर करू नये.

नितीश घोडके, ९९६०९८१५४८

(वरिष्ठ संशोधन सहायक - कृषी कीटकशास्त्र, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन (अंजीर व सीताफळ) प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule : आमदार विकत घेता येतात, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का खर्चत नाही

Voting Awareness : अकलूजला मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

Krushna Valley Water : कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबरअखेर तुळजापुरात

Sugarcane Season 2024 : ‘कादवा’चे यंदा साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ८१ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT