हवामान अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात दिनांक ४ ते १० सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान सरासरी इतके राहण्याचा अंदाज आहे. तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने पावसाचा अंदाज बघून पिकावर कीडनाशकाची किंवा बुरशीनाशकाची फवारणी करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ऊस, तूर, मूग, मका, सोयाबीन, केळी आणि भाजीपाला पिकातील व्यवस्थापनाविषयी पुढील सल्ला दिलेला आहे.
ऊस (Sugarcane) पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. उसामध्ये हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम अॅनीसोप्ली बुरशी २० किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात जमिनीत मिसळावी किंवा हेक्टरी २.५ ते ३ किलो फवारणीसाठी वापरावी.
तूर पीक सध्या फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. तूर पीक ४५ दिवसांचे झाले असेल तर शेंडे पाच सेंटीमीटरवरून खुडावेत. आवश्यकतेनुसार कोळपणी किंवा खुरपणी करावी. त्यामुळे जमीनीतील ओलावा व अन्नद्रव्यासाठी पिकांची परस्परांशी स्पर्धा होणार नाही.
मूग पीक सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. मुगाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यानंतर पहिली तोडणी व त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. शेंगा खळ्यावर चांगल्या वाळल्यानंतर मळणी करावी.
मका (Maize) पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. सध्याच्या ढगाळ व दमट हवामानामुळे मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा दहा टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी स्पिनेटोरम (११.६०% एस सी) ५ मिली किंवा थायामिथोक्झाम (१२.६ %) अधिक लॅंब्म्डासायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) २.५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सोयाबीन (Soybean) सध्या फांद्या फुटण्याच्या तसेच फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. ढगाळ हवामानामुळे सोयाबीन पिकावर सध्या स्पोडोप्टेरा अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी पाच या प्रमाणात स्पोडोल्यूरचा वापर करून फेरोमन सापळे वापरावेत. मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होत असल्याने नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (१८.७ % एस एल) या कीडनाशकाची चार मिली प्रति दहा लिटर किंवा डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) दहा मिली किंवा मिथिल डिमॅटॉन (२५% प्रवाही) दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व निरभ्र वातावरणात फवारणी करावी.
भेंडी व टोमॅटो पीक सध्या फळधारणेच्या अवस्थेत आहे. भेंडी व टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी किडलेली फळे मातीत पुरून टाकावीत. डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के इसी) ५ मिली किंवा क्विनॉलफॉस (२५ % इसी) २० मिली किंवा लॅम्ब्डासायहॅलोथ्रीन (५ टक्के) ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सध्याच्या ढगाळ, उष्ण व दमट हवामानामुळे केळीवरील करपा म्हणजेच सीगाटोका रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी रोगग्रस्त पानाचा भाग किंवा रोगग्रस्त पाने काढून जाळावीत. रोगाची लक्षणे दिसताच प्रोपीकोनॅझोल ५ मिली व मिनरल ऑइल १०० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी. त्यानंतर २० दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
जनावरांचे व्यवस्थापन कसे कराल?
जंतांपासून होणाऱ्या विविध आजाराच्या नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सहाय्याने जंतनाशक जनावरांना टोचून घ्यावे. लसीकरणाची खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात मेंढ्यांच्या खुरामध्ये चिखल्या होतात. त्यासाठी महिन्यातून एकदा कॉपर सल्फेट किंवा फॉरमॅल्डीहाइड द्रावण असलेल्या उथळ हौदातून संपूर्ण खुरे बुडतील अशा सोडाव्यात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.