Banana Disease Management Agrowon
ॲग्रो गाईड

Banana Disease Management : केळी पिकातील ‘सिगाटोका’ रोग

Banana Farming : केळी पिकामध्ये अनेक बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. ज्यामध्ये मुख्यत: सिगाटोका, रायझोम रॉट, ॲन्थरॅक्नोज, बुरशी व जीवाणूजन्य मर रोग, मोझॅक विषाणूजन्य रोग, बंची टॉप इत्यादी महत्त्वाचे रोग दिसून येतात.

Team Agrowon

राहुल वडघुले

Banana Sigatoka Disease : केळी पिकामध्ये अनेक बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. ज्यामध्ये मुख्यत: सिगाटोका, रायझोम रॉट, ॲन्थरॅक्नोज, बुरशी व जीवाणूजन्य मर रोग, मोझॅक विषाणूजन्य रोग, बंची टॉप इत्यादी महत्त्वाचे रोग दिसून येतात. या रोगांमुळे केळी पिकाचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी केळी पिकामध्ये येणाऱ्या रोगांची ओळख, प्रादुर्भावाची लक्षणे माहिती असणे गरजेचे आहे. आजच्या लेखात केळीवरील सिगाटोका या रोगाविषयी माहिती घेऊया.

हा रोग सर्वात प्रथम १९०२ मध्ये फिजी या देशामध्ये सिगाटोका व्हॅली या ठिकाणी आढळून आला होता. त्यानंतर १९१३ मध्ये या रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात दिसून आला. यावरून या रोगाला ‘सिगाटोका’ असे नाव पडले. या रोगाचे पिवळा सिगाटोका आणि काळा (ब्लॅक) सिगाटोका असे दोन प्रकार पडतात. या दोन्ही रोगांची लक्षणे व रोग निर्माण करणारी बुरशी ही वेगवेगळी असते.

रोगाची ओळख ः
- रोगाचे नाव ः काळा (ब्लॅक) सिगाटोका (Black Sigatoka)
- रोगाचे कारण ः हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.
- किंगडम ः Fungi
- बुरशीचे डिव्हिजन ः Ascomycota
- बुरशीचे शास्त्रीय नाव ः Mycosphaerella fijiensis
- परजीवी प्रकार ः Necrotrophic Parasite
- नुकसान ः या रोगामुळे केळी पिकाचे सुमारे १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

लक्षणे ः
- या रोगाची लक्षणे सुरवातीला नवीन पानांवर दिसून येतात. वरील बाजूने तीन ते चार क्रमांकाच्या पानांवर ही लक्षणे दिसू लागतात.
- सुरवातीला पानावर स्पिंडल आकाराचे फिक्कट पिवळे ठिपके किंवा छोट्या रेषा दिसू लागतात. ही लक्षणे पानांच्या आडव्या शिरांना समांतर असतात. काही दिवसातच हे ठिपके अर्धा ते एक सेंटीमीटर इतके मोठे होतात.
- ठिपक्यांचा मधला भाग राखेडी, तर कडा गर्द तपकिरी ते काळ्या रंगाच्या असतात. बाजूचा भाग फिक्कट पिवळसर दिसतो. दोन ठिपक्यांतील भाग फिक्कट हिरवा दिसतो. राखेडी भागामध्ये लहान काळ्या रंगाचे कोनीडीओफोर दिसतात.
- कालांतराने हे ठिपके एकमेकांत मिसळून संपूर्ण पान काळे दिसू लागते. म्हणून याला ‘काळा सिगाटोका’ असे म्हणतात.
- संपूर्ण पान काळे होऊन नंतर सुकून जाते. पानांची संख्या कमी झाल्याने त्याचा विपरीत परिणाम फळांच्या गुणवत्तेवर होतो.

पोषक वातावरण ः
या रोगासाठी पावसाळी, आर्द्रतायुक्त, धुके असणारे हवामान पोषक असते. तापमान २० ते ३० अंश सेल्सिअस, जास्त आर्द्रता असे वातावरण रोगासाठी अत्यंत पोषक ठरते. रोगाची लागण होण्यासाठी पान ओले असणे गरजेचे असते. अशा वातावरणात रोगाच्या बीजाणूंचे अंकुरण चांगले होते. सकाळी दव असेल, तर हा रोग जास्त प्रमाणात दिसून येतो. बागेमध्ये पाणी साचून राहणे व पोटॅश या अन्नद्रव्यांची कमतरता असेल तरी हा रोग जास्त प्रमाणात येतो.

रोग कसा निर्माण होतो ः
या रोगाचे तंतू किंवा अलैंगिक बीजाणू इतर केळी किंवा पॅराकीट फ्लॉवरच्या झाडावर जिवंत राहतात. त्यांच्यापासून मुख्य पिकावर नवीन रोगाची लागण होते. ज्या वेळी केळी किंवा पॅराकीट फ्लॉवरचे पिके नसेल अशावेळी लैंगिक बीजाणू (ॲस्कोस्पोर) हे जमिनीत, जुन्या पीक अवशेषांवर जिवंत राहतात. नवीन पिकांची लागवड झाल्यावर हे ॲस्कोस्पोर हे वारा, कीटक, पाणी यांच्यामार्फत मुख्य पिकांवर पोचतात. पोषक वातावरण तयार होताच, मुख्य पिकाच्या पानांवर रोगाची लागण होते. याला ‘प्राथमिक लागण’ म्हणतात.
रोगाची लागण झाल्यानंतर रोगाची लक्षणे ३ ते ४ दिवसांनी दिसून येण्यास सुरुवात होते. या लक्षणांमधील ठिपक्यांच्या खालील बाजूने अनेक कोनिडीओफोर (Conidiophore) असतात, यामध्ये अनेक बीजाणू (Conidia) तयार होतात. हे बीजाणू हवेमार्फत इतर यजमान पिकांवर जातात. व रोगाचा प्रसार होतो. यालाच ‘दुय्यम लागण’ असे म्हणतात.

सूक्ष्मदर्शिकेखाली काय दिसते?
सूक्ष्मदर्शिकेखाली रोगाचे बीजाणू (Conidia) स्पष्टपणे पाहू शकतो. हे बीजाणू लांब निमुळते असून त्यामध्ये चार ते पाच पेशी भित्तिका असतात. या बिजाणूची लांबी ०.०२ मिमी ते ०.०३ मिमी (२० मायक्रोमीटर), तर रुंदी ०.००२ मिमी असते.

नियंत्रणाचे उपाय ः
- पिकाची फेरपालट करावी.
- रोपांची लागवड जास्त जवळ करू नये. लागवड अंतर जास्त ठेवावे. शेतात हवा खेळती असावी.
- पाने ओली राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- नवीन रोगग्रस्त पाने शेताबाहेर नेऊ नष्ट करावीत.
- नवीन फुटणारे कोंब (Suckers) वेळोवेळी काढावेत.
- पिकामध्ये पोटॅश या अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी.
- बागेमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे. खूप जास्त प्रमाणात पाणी देऊ नये. सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
- पावसाचे पाणी बागेत साचणार नाही याची काळजी घ्यावी. निचरा होण्याची व्यवस्था करावी.
- जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- पोषक वातावरणात शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा.
- सकाळी दव पडत असेल. तर स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा फवारणी किंवा धुरळणीद्वारे वापर करावा.
- रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्वरित शिफारस केलेल्या आंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी करावी. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT