Grape Production Agrowon
ॲग्रो गाईड

Grape Production : सेंद्रिय घटकांवर भर देत रंगीत द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन

नारायणगाव (जि. पुणे) येथील सुजीत पाटे यांनी द्राक्षाच्या दोन रंगीत वाणांची शेती यशस्वी केली आहे. रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर कमी करून विविध सेंद्रिय व जैविक घटकांच्या वापरावर त्यांनी भर दिला आहे.

Ganesh Kore

Climate Change : हवामान बदलांचा फटका सर्वच पिकांना बसत आहे. मात्र त्यातही हवामानाला सर्वाधिक संवेदनशील असल्याने द्राक्षशेती (Grape Farming) अधिक बेभरवशाची झाली असून, उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

तरीही व्यवस्थापनात सुधारणा व तंत्रज्ञानाचा वापर करून ही शेती यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव (ता. जुन्नर) येथील सुजीत पाटे या युवा शेतकरी त्यापैकीच एक आहे. त्यांची चार एकर शेती असून, खंडाने सहा एकर शेती त्यांनी घेतली आहे.

रंगीत वाणांची द्राक्षशेती

द्राक्ष हे सुजीत यांचे मुख्य पीक असून, नानासाहेब पर्पल व कळंब जंबो अशा दोन रंगीत वाणांची लागवड त्यांच्याकडे आहे. पैकी पहिल्या वाणाची गोडी चांगली आहे. मण्यांचा आकार चांगला आहे. तर दुसऱ्या वाणामध्ये ‘क्रॅकिंग’चे प्रमाण कमी जाणवल्याचे सुजीत सांगतात.

अन्य पिकांमध्ये टोमॅटो, बटाटा, कांदा, चारापिके, कारले आदींचा समावेश आहे. सुजीत सांगतात, की हवमान बदलाच्या संकटात सातत्याने द्राक्षपिकात कीडनाशकांवरील फवारण्या व त्यावरील खर्च वाढत होता. शेती तोट्यात चालली होती.

यावर मात करण्यासाठी चार वर्षांपासून जैविक व सेंद्रिय घटकांचा वापर वाढवण्यावर भर दिला. त्यातून जमिनीला बळकटी देतना मातीची सुपीकता व झाडाची प्रतिकारक्षमता वाढ या गोष्टींकडे अधिक लक्ष दिले.

सुजीत यांनी व्यवस्थापनात बदल करताना ‘दहा ड्रम थेअरी’चा वापर केला आहे. त्यासाठी मंगेश भास्कर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सेंद्रिय घटकांचा वापर

दहा ड्रम पद्धतीत पाच ड्रमचा वापर जमिनीतून तर पाच ड्रमचा वापर फवारणीद्वारे सेंद्रिय घटक देण्यासाठी करण्यात आला आहे. यात ह्युमिक ॲसिड, फुल्वीक ॲसिड, सूक्ष्‍म अन्नद्रव्यांसाठी डीएफ द्रावण, जिवाणू स्लरी, वेस्ट डीकंपोजर आदींचा समावेश आहे.

त्याचबरोबर पिठ्या ढेकूण, लाल कोळी आदी किडींच्या नियंत्रणासाठी आले, मिरची, लसूण, वेखंड आदींच्या अर्काचा वापर केला जातो. दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी बांधावर काही वनस्पतींची लागवड केली आहे.

प्रत्येक ड्रम हा दोनशे लिटरचा असतो. सेंद्रिय घटकांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहे. पूर्वी जमिनीचा सेंद्रिय कर्ब ०.२५ टक्के होता. आता तो १.२५ टक्क्यावर पोहोचल्याचे सुजीत सांगतात.

उत्पादन, विक्री व्यवस्था

गोडी छाटणीनंतर सुमारे १३० दिवसांनी द्राक्षे काढणीला येतात. एकरी सात ते आठ टन उत्पादन मिळते. काही वेळा हे उत्पादन १० ते १२ टनांच्या दरम्यानही मिळाले आहे. सुजित यांनी यापूर्वी दुबई, चीन, बांगला देश आदी देशांना निर्यातदारांमार्फंत निर्यातही साधली आहे.

निर्यातीसाठी प्रति किलो ७० ते ८० रुपये, कमाल १०० ते १२० रुपये तर स्थानिक बाजारपेठेत हा दर ६० ते ७० रुपये मिळतो. व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात. एकरी उत्पादन खर्च किमान दीड लाख रुपये येतो.

ड्रम पद्धतीमुळे रासायनिक खते व कीडनाशकांवरील ३० ते ४० टक्के खर्च कमी झाला आहे. कीडनाशकांचा वापरही दक्षतापूर्वक असल्याने चाचणीसाठी गेलेला नमुना ‘फेल’ होत नाही असे सुजित सांगतात. रासायनिक अंशमुक्त द्राक्षांचे उत्पादन घेत असल्याचे समाधान त्यांना आहे.

भारनियमनावर पर्याय म्हणून संपूर्ण सिंचन व्यवस्था सौरऊर्जेवर करण्यात आली आहे. सुजित यांना पत्नी प्रतिमा, वडील जनार्दन, मोठे बंधू विशाल व त्यांची पत्नी हर्षदा यांची शेतीत साथ मिळते.

द्राक्षांचे मार्केट

पुणे बाजार समितीमध्ये द्राक्षांचा हंगाम बहरात आला आहे. सध्या दररोज विविध वाणांच्या द्राक्षांची २० ते २५ टन आवक होत असून, ती प्रामुख्याने सांगली, इंदापूर, बारामती, सोलापूर आदी भागांतून आहे.

आवकेमध्ये ९० टक्के आवक सफेद द्राक्षांची, तर १० टक्के आवक रंगीत वाणांची होत असल्याची माहिती द्राक्षांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. विविध वाणांचे दर पुढीलप्रमाणे.

प्रति १० किलो (रुपये)

सुपर सोनाका : ३००-५००

अनुष्का : ३५०-५५०

सोनाका : ३००-४५०

जम्बो (ब्लॅक) : ४५०-९००

कृष्णाशरद (ब्लॅक) : ५००-९००

शरद सीडलेस (ब्‍लॅक): ४००-६००

माणिक चमन (१५ किलो) : ३५०-५००

थॉमसन (१५ किलो) : ३५०-५००

बागेच्या व्यवस्थापनातील ठळक बाबी

१) माती, पाणी व देठ परिक्षण करूनच अन्नद्रव्यांच्या मात्रा निश्‍चित दिल्या जातात.

२) दर दोन वर्षांनी एकदा एकरी सहा टन शेणखताचा वापर होतो. चार गायी व तेवढीच वासरे आहेत. महिन्याला एक ट्रॉलीपर्यंत शेणखत उपलब्ध होते.

३) जमिनीच्या पोतानुसार पाणी. चांगल्या जमिनीत दर आठ दिवसांनी तर मुरबाड जमिनीत दर ४ ते ५ दिवसांनी पाणी दिले जाते.

४) साडेसात बाय पाच व आठ बाय पाच अशा अंतराने लागवड. बागेत सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे येईल व एकसारख्या फुटी याव्यात असे नियोजन. प्रति झाड २४ ते २८ घड ठेवण्याचे नियोजन होते. सुजीत सांगतात, की नानासाहेब पर्पलसारख्या वाणासाठी १५ घड देखील पुरेसे होतात.

५ गोडी छाटणीनंतर सुमारे साठ दिवसांनंतर रासायनिक कीडनाशकांचा वापर थांबवून जैविक निविष्ठांवर भर दिला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT