Mulberry Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Mulberry Cultivation : तुती रोपवाटिकेचे नियोजन

रेशीम उद्योगामध्ये रेशीम कीटक संगोपन करताना त्यांचे खाद्य असलेल्या तुती पानांचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे तुती लागवड आणि उत्पादन यामध्ये तुतीची रोपवाटिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

टीम ॲग्रोवन

डॉ. चंद्रकांत लटपटे, धनंजय मोहोड, डॉ. संजोग बोकन

रेशीम उद्योगामध्ये (Silk Industry) रेशीम कीटक संगोपन करताना त्यांचे खाद्य असलेल्या तुती पानांचे (Mulberry Leaves) महत्त्व मोठे आहे. त्यामुळे तुती लागवड (Mulberry Cultivation) आणि उत्पादन यामध्ये तुतीची रोपवाटिका (Mulberry Nursery) अत्यंत महत्त्वाची ठरते. महाराष्ट्रात एकूण १४,९०५ एकर तुती लागवड झाली आहे. त्यात मराठवाड्यामध्ये मार्च २०२२ पर्यंत ८,९०५ एकर तुती लागवड आणि २,०७८ मे. टन कोष उत्पादन झाले आहे. तुतीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीमध्ये येत्या काळात तुती रोपांची मागणी वाढत राहणार आहे. त्यामुळे रोपवाटिकेचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.

तुती रोपवाटिका कालावधी :

ज्यांनी जून ते सप्टेंबर या दरम्यान तुतीची लागवड करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत रोपवाटिकेचे नियोजन करावे.

तर ज्यांना डिसेंबर ते जानेवारीमध्ये लागवड करायची आहे, त्यांनी सप्टेंबर महिन्यात रोपवाटिकेचे नियोजन करणे गरजेचे ठरते.

रोपवाटिकेसाठी गादी वाफे करणे :

-सपाट व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.

- दोन ते तीन वेळा जमिनीची नांगरट करून शेतातील ढेकळे फोडून काडी कचरा स्वच्छ करून बेड करावेत.

-गादी वाफे करताना दोन भाग मातीमध्ये मुरलेले शेणखत मिसळावे. गादी वाफे ८२ फूट लांब व ४ फूट रुंद आकाराचे ४ बेड करावेत.

३ ते ४ महिने वयाची रोपे आवश्यक असल्यास दोन रोपात १० सेंमी व दोन ओळींत २० सेंमी अंतर ठेवावे. प्रत्येक बेड भोवती १.५ फूट रुंद पाण्यासाठी सरी करून घ्यावी. एक एकर तुती लागवड पट्टा पद्धतीने ५ × ३ × २ फूट अंतरावर करण्यासाठी ५,५५५ रोपे लागतात.

बेणे निवड व लागवड :

-बागायतीसाठी ‘व्ही-१’ व कोरडवाहूसाठी ‘एस-१३’ या तुती वाणाचे बेणे निवडावे.

-बेणे निवडीसाठी तुतीचे वय ७ ते ८ महिने आणि बेण्याची जाडी पेन्सिल आकाराची असावी.

-शेंड्याकडील कोवळ्या हिरव्या कांड्या बेण्यासाठी वापरू नये. ३ ते ४ डोळे असलेले करड्या रंगाचे बेणे निवडावे.

-सिकेटरच्या साह्याने डोळ्याच्या वरच्या बाजूने सरळ व तीन डोळ्यानंतर खालच्या बाजूने थोडा तिरपा काप घ्यावा. २२ ते २५ सेंमी लांबीचे बेणे करताना साल फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.

-तुती बेणे तयार केल्यानंतर लगेच कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या मिश्रणात १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर लगेच बेडवर लागवड करावी.

-२ ते ३ दिवसांनी लागवडीसाठी लांब ठिकाणी बेणे लागत असल्यास ओल्या गोणपाटात गुंडाळून वाहतूक करावी. फांद्यांचा गठ्ठा बांधून घेऊन जावा. लागवड करण्याच्या ठिकाणी बेणे तयार करावे.

-गादी वाफ्यावर एकच बेणे वापरून दोन डोळे जमिनीत व एक डोळा जमिनीच्या वर राहील अशी लागवड करावी. लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यावे.

-रोपवाटिकेस सुपीक काळी जमीन असल्यास ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. एक महिन्याच्या अंतराने खुरपणी करून तणनियंत्रण करावे. दोन महिन्यांनंतर ५०० ग्रॅम युरिया प्रति बेड प्रमाणे देऊन हलकेसे पाणी द्यावे.

तुती बागेची वैशिष्ट्ये :

-तुती लागवड केल्यानंतर १५ वर्षांपर्यंत टिकते. प्रत्येक वर्षी पुनर्लागवड करण्याची गरज नाही.

-रोपांची लागवड केल्यापासून ३ ते ४ महिन्यांत तुती पाला रेशीम कीटकास टाकण्यायोग्य होतो. कमी पाण्यात तुती झाडे जगतात. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची उपलब्ध नसल्यास १ ते २ महिन्यांनी पाणी मिळाले तरी तुती बाग पुन्हा उगवते.

-ठिबक सिंचन केल्यास प्रति हेक्टर झाडांची संख्या टिकते. तूट होत नाही.

-कीटक संगोपन झाल्यानंतर तुती बागेत उरलेला आणि रेशीम कीटकांनी खाऊन उरलेला पाला जनावरांना वापरता येतो. किंवा त्यापासून गांडूळ खत, कंपोस्ट करता येते.

-नैसर्गिक आपत्ती उदा. जास्त पाऊस किंवा ढगफुटी अशा स्थितीमध्ये जास्त नुकसान होत नाही.

-तुती बाग व कीटक संगोपन यातून कुटुंबातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध होते. हेक्टरी सुमारे १६ जणांना (पुरुष, महिला व वृद्ध अपंग मिळून) रोजगार उपलब्ध होतो.

तुती रोप काढणी व लागवड :

-गादी वाफ्यावर बेणे लावल्यापासून ३ महिन्यांत रोपांची वाढ ३ फूट होते.

-तयार झालेली रोपे लागवडीसाठी बेडवरून काढण्याआधी १ ते २ दिवस बेडला पाणी द्यावे. त्यामुळे रोपे काढताना रोपाच्या मुळास इजा होत नाही.

-रोपांची वाहतूक करायची झाल्यास सकाळी किंवा सायंकाळी करावी.

-जमीन नांगरणी करून शेणखत टाकून पट्टा पद्धतीने ५ × ३ × २ फूट किंवा ६ × ३ × २ फूट अंतरावर लागवड करावी. बेणे लागवड करण्यापेक्षा रोपे लावावीत. १०० टक्के रोपे जगतील.

डॉ. चंद्रकांत लटपटे, प्रभारी अधिकारी, ७५८८६१२६२२

धनंजय मोहोड, वरिष्ठ संशोधन सहायक, ९४०३३९२११९

(रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT