Organic fertilizer Agrowon
ॲग्रो गाईड

Organic Fertilizer : सेंद्रिय खत व्यवस्थापनाचे तंत्र...

Organic Carbon : वनस्पतींनी निर्माण केलेले अन्न प्राणी सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय घेऊ शकत नाही, तर प्राण्यांनी वनस्पतीसाठी तयार केलेले अन्न वनस्पती सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय घेऊ शकत नाही.

Team Agrowon

प्रताप चिपळूणकर
Organic Farming : वनस्पतींनी निर्माण केलेले अन्न प्राणी सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय घेऊ शकत नाही, तर प्राण्यांनी वनस्पतीसाठी तयार केलेले अन्न वनस्पती सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय घेऊ शकत नाही. सूक्ष्मजीवांची मध्यस्थी आजवर झाकून पडलेली आहे. यामुळे वनस्पतीचे अन्नपोषण नेमके कसे होते, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

सेंद्रिय खत व्यवस्थापन हा शेतीतील कळीचा मुद्दा आहे. त्याअभावी शेती ठप्प होऊ शकते. आज सर्वत्र उत्पादकता कमी होण्यामागे जमिनीत कमीतकमी होणारे सेंद्रिय खताची टक्केवारी हे आहे. सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासाने हे लक्षात आले. पृथ्वीवर दोन सजीवांचे मुख्य गट आहेत. यामध्ये वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होतो. आज आपल्याला शिकविले जाते अन्नद्रव्यांबाबत वनस्पती स्वयंपूर्ण आहेत. प्राणी गट पूर्णपणे वनस्पतीवर अवलंबून आहे. अभ्यासातून हे लक्षात आले की, हे विधान चुकीच्या गृहतिकावर आधारित आहे. याबाबत अन्नचक्राचा अभ्यास करावा. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्राण्यांना ते शक्य नाही. इथे थोडा खोलवर जाऊन अभ्यास केल्यास वनस्पती प्राणीवर्गासाठी अन्ननिर्मिती करतात, तर प्राणी वनस्पतीसाठी अन्ननिर्मिती करतात. वनस्पतींनी निर्माण केलेले अन्न प्राणी सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय घेऊ शकत नाही, तर प्राण्यांनी वनस्पतीसाठी तयार केलेले अन्न वनस्पती सूक्ष्मजीवांच्या मध्यस्थीशिवाय घेऊ शकत नाही. सूक्ष्मजीवांची मध्यस्थी आजवर झाकून पडलेली आहे. यामुळे वनस्पतीचे अन्नपोषण नेमके कसे होते हा भागच शेतकऱ्यांना शिकविला जात नाही. यातील सूक्ष्मजीवांच्या योग्य मध्यस्थीच्या अज्ञानामुळे शेती धोक्याच्या पातळीकडे जात आहे.

जमिनीतील सेंद्रिय घटक महत्त्वाचे...
आपण जे सेंद्रिय खत जमिनीला देतो ते केवळ या सूक्ष्मजीवासाठीच असते. त्याची कमतरता असेल तर तुम्ही टाकलेली अन्नद्रव्ये पिकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अनेक कारणामुळे गरजेइतके सेंद्रिय खत आपण देऊ शकत नाही आणि भावी काळात पुरेसे देऊ शकणार नाही. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेतली तर तो काहीतरी करून शिफारशीइतके रासायनिक खताचे हप्ते देईल. परंतु सेंद्रिय खत वापरात कमी अगर न वापराची तडजोड करेल. त्याऐवजी रासायनिक खताचे जास्त हप्ते देऊ असे ठरवेल, हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. कृषी विद्यापीठाची २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले खत जमिनीत मिसळण्याची शिफारस आहे. या शिफारशीचा वापर शेतकरी कधीच करू शकणार नाही, हे वास्तव विद्यापीठात केव्हा पोहोचणार ? या जुन्या मार्गाने शक्य नसेल तर पर्यायी मार्ग सुचविणे गरजेचे आहे. पर्यायी मार्गात हिरवळीचे खत, पेंडी, लेंडी, साखर कारखान्याकडून मिळणारे मळी खत असे काही पर्याय सुचविले जातात. या सर्व मार्गांचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्याकडे खरेदी, वाहतूक, भरणी उतरणी, रानात पसरणे आणि मिसळणे अशा सर्व कामासाठी मोठ्या प्रमाणावर वित्त बळ लागते ते बहुतेक शेतकऱ्याकडे नसते. या कामासाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागते, त्याची टंचाई लक्षात घ्यावीच लागेल.

शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीबाबत काही उदाहरणे आपणापुढे मुद्दाम ठेवाविशी वाटतात. आमचे कोल्हापुरात प्रामुख्याने ऊस शेती केली जाते. त्याचप्रमाणे पशुपालन दुधासाठी मोठ्या प्रमाणावर आहे. आमच्यापासून तासगाव १२५ ते १५० किमी अंतरावर आहे. आमच्या भागात तयार होणारे बहुतांशी शेणखत ट्रकद्वारे तेथील द्राक्ष शेतीमध्ये पोहोचविले जाते. ते जसे पैसे देतात त्या प्रमाणात ऊसवाला देऊ शकत नाही. बरेच दिवस मला वाटे की भूमिहीन लोकच फक्त असे खत विकून टाकत असावेत. खोलात शिरून अभ्यास करता स्वतःची जमीन आणि पीक असणारा शेतकरीही खत विकून टाकतो असा शोध लागला. ऊसवाल्याचे पैसे मे- जून पर्यंत संपून गेलेले असतात. खरीप पिकाचे व्यवस्थापन आणि त्याच काळात असणारे बहुतेक मोठे सण यातून पार पडण्यासाठी बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे खत विकून घराची गरज भागविली जाते.
असेच आणखी एक उदाहरण आहे. धान्ये आणि कडधान्याच्या
काडापासून वैरणीची निर्मिती होते. या वैरणीतून पशुपालन व खत, परंतु हे खत कोठे जाते? या दुष्काळी प्रदेशातील डाळिंब, सीताफळ वगैरे बागाकडे जाते. धान्य- कडधान्य शेतीला बहुतेक वापर केलाच जात नाही. प्रचंड मोठे धान्य कडधान्याचे क्षेत्र दरवर्षी गरीब गरीब होत जाते, तर छोटेसे फळबागेचे क्षेत्र श्रीमंत होते. नुसती शिफारस करून काय करावयाचे? हे वास्तव शास्त्रज्ञांना दिसत नाही का? या सामाजिक त्रुटी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना योग्य असे पर्याय देणे गरजेचे आहे.

विना नांगरणीची शेतीचा अभ्यास महत्त्वाचा ...
१) प्रत्येक जमिनीला गरजेचे सेंद्रिय खत मिळालेच पाहिजे. विना नांगरणीची शेती हा यावरील उत्तम मार्ग आहे. भारतात विना नांगरणीची शेती पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेशचा हिमालयाकडील भागात केली जाते. तेथील या पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याकडील शास्त्रज्ञांनी मत मांडले की, तेथे खरीपाच्या कापणीनंतर रब्बीच्या पेरणीला पूर्व मशागतीत वेळ घालविण्यास उत्पादनात घट येते म्हणून ही पद्धत त्यांच्यासाठी योग्य आहे. आपल्याकडे खरीप कापणी आणि रब्बी पिकाची पेरणी यामध्ये आरामात ४० ते ५० दिवस मिळतात. आपण चांगली पूर्व मशागत करूनच रब्बी पीक घेणे ठीक. यामुळे शून्य मशागतीवर महाराष्ट्रातील चारही विद्यापीठात फारसे संशोधन होऊ शकले नाही.
२) पेरणीची वेळ साधणे इतक्या मर्यादित हेतू व्यतिरिक्त इतर अनेक फायदे या पद्धतीत आहेत. आपल्याकडे केवळ नांगरणीचे पैसे वाचतात हाही फार संकुचित विषय आहे. मी गेले १७ वर्षे माझी १०० टक्के जमीन या पद्धतीने शेती करतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जमिनीला फुकटात मुबलक प्रमाणावर दरवर्षी दर पिकाला अत्यंत उच्च दर्जाचा सेंद्रिय कर्ब मिळतो हा मुख्य फायदा नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखा नाही.

३) मी सुरवातीला जमिनीला फुकटात सेंद्रिय कर्ब मिळतो, मशागतीचे पैसे वाचताहेत इतक्याच मर्यादित हेतूने या तंत्राकडे आकर्षित झालो, जसजसा अभ्यास होत गेला तसा शेतीपुढील बहुतेक प्रश्न या तंत्राने अगदी सहज सुटू शकतात. हे सर्व फायदे क्रमाक्रमाने आपण अभ्यासणार आहोत.
४) विना नांगरणीच्या शेतीमध्ये मी मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष तसेच ठेवून जगत असले तर तणनाशकाने मारून कोणतीही पूर्व मशागत न करता पीक वाढविले आणि एकदम पहिल्याच वर्षात ७० साली (३५ वर्षांपूर्वी) जसे पीक येत असे तसे आले. असे काही होऊ शकेल ही अपेक्षाही नव्हती. फरक इतकाच होता की पूर्वी केव्हातरी जनावरांचे खत थोडे फार मिळे त्या जागी आता जमिनीखालील अवशेषाचे खत जमिनीला मिळाले. बाकी सर्व नेहमीप्रमाणे. यातून एक भावार्थ निघतो की जनावरापुढील खतापेक्षा हे खत चांगल्या दर्जाचे असावे. शेणखत, कंपोस्ट यापुढे हलक्या दर्जाचे असावे. याचा सरळ अर्थ असा की जमिनीखालील अवशेषाचे खत भारी.

वनस्पतीपासून तयार झालेले खत ः
१) जमिनीपासून जसजसे वरवर जावे तसतसा खताचा दर्जा हलका हलका होत जातो. सर्वांत हलके खत पानाचे. आजपर्यंत शेकडो वर्षे पिढ्यानपिढ्या जमीन सुपीक करण्याची संपूर्ण जबाबदारी या हलक्या खतावर आपण ठेवलेली होती. पावसाळी एकच पीक घेत होते तोवर चालले. नगदी वार्षिक, बहुवार्षिक पिके घेणे चालू केल्यावर सेंद्रिय खताचे धोरणही बदलणे गरजेचे होते.
२) वनस्पती तीन धाग्याच्या जिवावर उभी राहते. यामध्ये सेल्युलोज धागे (हलके), हेमी सेल्यूलोज धागे (मध्यम दर्जाचे) आणि लिग्निन धागे (ताकदवान धागे). वाढणाऱ्या वनस्पतीला ठराविक जागेला किती भार पेलावयाचा आहे, त्यानुसार वरील तीन धाग्याचे मिश्रण तेथे तयार होते. पानांना कोणताच भार पेलायचा नसल्याने तेथे हलके तर जमिनीखालील बुडखा व मुळांचे जाळे यांना आयुष्यभर वरील सर्व भार पेलायचा असल्याने तेथे बळकट धाग्यांचे नियोजन केलेले असते. हे शास्त्र केवळ अपघाताने शिकायला मिळाले. तत्पूर्वी २०-२५ गाड्या शेणखत यावरच सर्व भिस्त आहे.

३) हलके खत आपण पैसे खर्च करून वापरतो; तर उत्तम दर्जाचे खत देणारा पदार्थ धसकटे या नावाखाली पैसे खर्च करून गोळा करून जाळून टाकतो अगर बांधावर नेऊन त्याचा कचरा करतो. आपली जमीन कशी सुपीक होणार? तंत्रज्ञान सोपे स्वस्त व सुलभ झाले तरच शेतकरी जगू शकेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT