Grape Advice
Grape Advice Agrowon
ॲग्रो गाईड

Grape Advice : द्राक्ष सल्ला : रिकटचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. शर्मिष्ठा नाईक

द्राक्ष बागेमध्ये मागील हंगामात (Grapes Season) कलम केल्यानंतर आता रिकट घेऊन, पुन्हा वेलीचा सांगाडा तयार करण्याची महत्त्वाची वेळ आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये कलम केल्यानंतर निघालेली फूट पाऊस (Rain) आणि थंडीमध्ये सापडल्यामुळे (Cold Weather effect in Grapes) वाढ बऱ्याचदा खुंटलेली असते.

पानेही रोगग्रस्त झालेली असतात. काडी काही अंशी कलमजोडावर परिपक्व झालेली असेल. या काडीवरून नवीन फुटी निघणे शक्य होत नसल्याने रिकट घेणे यावेळी महत्त्वाचे ठरते.

रिकट ( Ricket) घेतल्यानंतर नवीन फुटी निघण्याकरिता बागेतील वातावरणही तितकेच महत्त्वाचे असते. किमान तापमान (Temperature) ज्या वेळी १५ अंश सेल्सिअसच्या वर वाढण्यास सुरुवात होते.

अशा वेळी वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो. सध्याच्या तापमानाचा (Tapman) विचार करता बऱ्याच भागात ही परिस्थिती पोषक असल्याचे दिसून येते. या वेळी बागेत रिकट घेणे फायद्याचे होईल.

मुळांच्या विकासासाठी खत व्यवस्थापन ः

रिकटनंतर वेलीचा सांगाडा तयार करून या वर्षी फलधारक काड्या तयार करून घ्याव्यात. त्यानंतर याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात साधारणतः प्रति एकर ८ ते १० टन द्राक्ष उत्पादन मिळेल, अशा प्रकारे नियोजन करावे.

यासाठी दोन वेलीमध्ये दोन फूट रुंद व तीन ते चार इंच खोल चारी घ्यावी. या चारीमध्ये शेणखत व अन्य रासायनिक खते टाकून मातीने झाकून घ्यावे. रिकटनंतर नवीन फुटी चांगल्या निघण्यासाठी मुळांचा विकास महत्त्वाचा असतो.

यासाठी चारी घेणे गरजेचे असते. पहिल्या वर्षीची बाग असल्यामुळे खुंट रोपांची मुळे खाली जमिनीमध्ये रुतलेली असेल. तेव्हा या वर्षी बोद तयार करून घ्यावेत.

त्यामुळे वेलीच्या विकासासाठी आवश्यक असलेली पांढरी मुळे तयार होतील. त्यांच्याद्वारे वेलींना अन्नद्रव्यांचा पुरवठा सुरळीत राहील. कलम केलेल्या वेलीच्या बुंध्यापासून साधारणतः ७ ते ८ इंच जागा सोडून चारी घ्यावी.

या ठिकाणी मुळे उपलब्ध नसतात. दोन वेलीमध्ये घेतलेल्या चारीत साधारणतः २० किलो शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट ३०० ग्रॅम मिसळून घ्यावे. रिकटनंतर वाढ चांगली व्हावी, यासाठी रासायनिक खतांपैकी नत्राचा वापर महत्त्वाचा असते.

तेव्हा बागेची परिस्थिती पाहून साधारणतः ५० किलो युरिया, १० किलो फेरस सल्फेट, १५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट, पाच किलो झिंक सल्फेट प्रति एकरी शेणखतामध्ये व्यवस्थित मिसळून बोदामध्ये द्यावे.

त्यावर मातीचा हलका थर द्यावा. यामुळे वेलीला बोद तयार होईल. पांढरी मुळे तयार होण्यास मदत होईल. डॉगरीज खुंटावर कलम केलेल्या बागेत पहिल्या वर्षी फेरसची कमतरता जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे फेरस सल्फेटचा वापर वेळोवेळी काळजीपूर्वक करावा.

पानगळ करणे ः

रिकट घेण्यापूर्वी पानगळ करून घेतल्यास फायद्याचे होईल. रिकट घेण्याची जागा सुद्धा तितकीच महत्त्वाची असेल. ज्या ठिकाणी परिपक्व कलमकाडीची जाडी १२ ते १३ मि.लि. आहे, अशा ठिकाणी रिकट घेता येईल.

सुमारे ९० टक्के काड्या एका जाडीच्या असल्यास त्या ठिकाणी रिकट घ्यावा. अन्यथा, कलमजोडाच्या चार ते पाच डोळे वर सरसकट रिकट घ्यावा.

पानगळ करून घेण्यासाठी पुढील पर्यायांचा उपयोग करता येईल.

१) रिकट घेण्यापूर्वी पानगळ करण्यासाठी बागेत पाण्याचा ताण देणे गरजेचे असेल. साधारणतः रिकटच्या १५ ते २० दिवस आधी पाणी बंद केल्यास त्याचा पानगळीसाठी चांगला परिणाम मिळेल.

२) इथेफॉन ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास पानगळीस फायदा होईल.

३) हे शक्य होत नसल्यास ज्या ठिकाणी रिकट घ्यावयाचा आहे, अशा भागातील पानगळ हाताने करून घ्यावी.

४) रिकट घेण्याच्या दोन ते तीन डोळे वर कलम काडी खाली वाकवून दिल्यास डोळे फुगण्यास मदत होईल. ही प्रक्रियासुद्धा रिकटच्या पंधरा दिवस आधी करावी.

हायड्रोजन सायनामाइडचा वापर

१) काडी एकसारखी फुटण्यासाठी फक्त पानगळ करून चालणार नाही, तर त्यासाठी हायड्रोजन सायनामाइडचा वापर आवश्यक असेल. काडीची जाडी विचारात घेता हायड्रोजन सायनामाइड कमी जास्त करता येईल.

२) पहिल्या वर्षीची बाग असल्यामुळे काडीवरील डोळे वरील सर्व उपाययोजना केल्यानंतरसुद्धा काही वेळा फुगत नसल्याचे दिसून येते. अशा वेळी हायड्रोजन सायनामाइड दोन वेळा वापरावे लागेल.

३) ८ ते १० मि.मी. जाड काडी असल्यास हायड्रोजन सायनामाईड ४० मि.लि. प्रति लिटर प्रमाणे एक दिवसाच्या अंतराने दोन वेळा वापरावी.

यापेक्षा जास्त जाड काडी असल्यास हायड्रोजन सायनामाइडचा ५० मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात वापर करावा.

४) बऱ्याचदा रिकट घेतेवेळी तापमान वाढलेले दिसते, मात्र काही वेळा पुन्हा थंडी सुरू होऊन काडीवरील डोळे फुटण्यास अडथळे येतात.

या गोष्टीचा विचार करून हायड्रोजन सायनामाइड दोन वेळा लावावे लागते.

५) डोळे फुटण्यासाठी पाणी व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे आहे. बोद तयार केल्यानंतर त्यामधील खत पाणी शोषून घेते. म्हणजेच यासाठी पाण्याची जास्त आवश्यकता भासते. बोद या वेळी पूर्ण भिजेल, अशा प्रकारे पाणी द्यावे.

६) रिकटनंतर सुमारे १० ते १२ दिवसांत नवीन फुटी निघण्यास सुरुवात होईल. या वेळी तापमान वाढत असल्यामुळे उदड्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्याच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार कीडनाशकाचा वापर करावा.

७) नवीन निघालेल्या फुटीपैकी फक्त दोन फुटी ठेऊन इतर फुटी काढाव्यात. शक्यतो वरील फूट तीन ते चार पानांवर खुडून घ्यावी. त्यानंतरची खालील फूट सुतळीने बांबूला बांधून घ्यावी.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT