Land Survey
Land Survey Agrowon
ॲग्रो गाईड

Land Survey : जमिनीची मोजणी झाल्यानंतर आवश्यक नकाशे कसे बनवले जातात? कोणती संस्था त्यासाठी कामे करते?

Team Agrowon

पांडुरंग सुपेकर

Land Survey Update : काल राष्ट्रीय सर्वेक्षण दिन होता. जमीन हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. नैसर्गिक वाढ, प्रगती आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे जमिनींचे दर (Land Rate) दिवसेंदिवस वाढत आहेत. स्थावर मिळकतीमध्ये जमिनीला महत्त्व आहे.

जमीन खरेदी विक्रीमध्ये होत असलेली वाढ, नवीन प्रकल्प, विकास आराखडे, प्लॉटींग, हिस्सेवारी इत्यादी कारणांमुळे जमीन मोजणीला खूप महत्त्व आले आहे. पूर्वीच्या काळी राजेशाही, संस्थाने यांच्या हद्दी कशा ठरत असत, जमीन कशी मोजली जात होती.

हद्दीचे वाद कले सोडवले जात होते. अशा अनेक प्रश्नांबाबत कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात ‘‘शिवशाही काठी’’ हे एकक जमीन मोजणीसाठी वापरले गेले होते. त्यानुसार जमिनीची प्रतवारी करून बिघा, चावर मध्ये जमिनीचे क्षेत्रफळ मोजले जात.

कालांतराने इंग्रजांची राजवट भारतात प्रस्थापित झाली. राज्य व्यवस्थापन आणि महसूल वसुलीसाठी जमिनीची तांत्रिक पद्धतीने मोजणी सुरू करण्यात आली. भारतातील जमीन मोजणी क्षेत्रातील सर्वोच्च संस्था ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ची स्थापना १७६७ साली करण्यात आली.

कॉलिन मॅकेन्झी हे भारताचे पहिले सर्व्हेअर जनरल होते. सार्वभौम भारताच्या जमिनीची मोजणी करून आवश्यक नकाशे अभिलेख उपलब्ध करून देण्याचे काम सर्व्हे ऑफ इंडिया करते.

या संस्थेचे मुख्यालय डेहराडून येथे आहे. १० एप्रिल १८०२ या दिवसापासून भारतामध्ये महात्रिकोणमित्तीय (Great Trigonometrical Survey - GTS) पद्धतीचे सर्वेक्षण विल्यम लॅम्बटन यांनी सुरू केले. तेव्हापासून भारतामध्ये १० एप्रिल हा राष्ट्रीय सर्वेक्षण दिन साजरा केला जातो.

पृथ्वी गोल असली तरी ती चेंडूसारखी गोल नसून काहीशी अंडाकृती आहे. त्यालाच ‘‘जिऑईड’’ असे भौगोलिक नाव आहे. जमीन मोजणी करताना पृथ्वीची गोलाई विचारात घेतल्यास त्यास जिओडेटिक सर्व्हे म्हटले जाते.

आणि ज्या मोजणी प्रकारात गोलाईचा विचार केला जात नाही किंवा सर्व जमीन समतल आहे असे समजून मोजणी प्रक्रिया केली जाते त्यास प्लेन सर्व्हे म्हणतात. १९५६ पूर्वी जमीन एकर आणि गुंठ्यामध्ये मोजली जात होती.

सध्या हेक्टर, आर आणि चौरस मीटर मध्ये जमिनीचे क्षेत्रफळ नमूद केले जाते. पूर्वी साखळीचा वापर करून मोजणी केली जात असे त्यामध्ये गुंटूर, रेव्हेन्यू, मेट्रिक आणि इंजिनिअरिंग साखळी वापरली जात होती. शंकू साखळी पद्धतीच्या जमिनीच्या मोजणी प्रकारात टिपणबुक महत्त्वाचे असते.

वसलेवार पद्धतीने जमिनीचे क्षेत्रफळ काढले जायचे. पुढे समतल फलक (Plne Table) उपकरणाच्या सहायाने जमीन मोजणी करण्यात येऊ लागली. प्लेन टेबल सर्व्हे तुलनेने सोपा असल्याने फार काळ प्लेन टेबलने मोजण्या केल्या जात होत्या.

तांत्रिक सर्वेक्षणासाठी थिओडोलाईट हे उपकरण निर्माण झाले. फक्त अंतरे मोजून अचूकता मिळत नव्हती. अंतर्गत कोन मोजणे अनिवार्य झाले. तेव्हा थिओडोलाईट या उपकरणाचे महत्त्व अधोरेखित झाले. थिओडोलाईट हे उपकरण जमीन मोजणी क्षेत्रामधील मैलाचा दगड असलेले महत्त्वपूर्ण उपकरण ठरले. अचूकता हे मोजणी शास्त्रातील महत्त्वाचा मापदंड आहे.

दिवसेंदिवस इंच इंच जागेला किंमत आल्याने मोजणीमध्ये गती व अचूकता यावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आहे. डिजिटल थिओडोलाईट नंतर टोटल स्टेशन या उपकरणाचा सध्या जमीन मोजणीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

टोटल स्टेशन मध्ये इनबिल्ट डिजिटल थिओडोलाईट EDM (Electronic Distance Meter) असल्याने अचूक मोजणी शक्य होते. महाराष्ट्र शासनाच्या भूमिअभिलेख खात्याने देखील नवीन तंत्राचा वापर मोजणीसाठी सुरू केलेला आहे.

मोजणी क्षेत्रात नव्याने GNSS (Global Navigation Satelite System) प्रणालीचा वापर होत आहे. यामध्ये उपग्रहाद्वारे जमिनीचे अक्षांश व रेखांश मिळविले जातात आणि संगणक प्रणालीद्वारे नकाशांचे आरेखन केले जाते.

राज्यात सर्व्हे ऑफ इंडियाच्या सहकार्याने ७७ ठिकाणी कॉर्स (Contineous Operation Reference Station) उभारले आहेत. या कॉर्सच्या आधारे जीपीएस रीडींग ३० सेकंदात घेता येतात. त्यामुळे जमिनीची मोजणी ३० ते ३५ मिनिटांत करता येणे शक्य झाले आहे.

मिळकत धारकांना त्यांच्या मिळकतींचे नकाशे, मालमत्तापत्रक लवकर मिळावेत. नवीन मालमत्तांचा शोध यासाठी ड्रोन सर्वेक्षण ही सुरू करण्यात आले आहे. परंतु, त्यासाठी संबंधित खात्यांच्या पूर्वपरवानग्या आवश्यक असतात.

मोजणी केल्यानंतर जमीन मालकांना मोजणीच्या नकाशांची ‘‘क प्रत’’ भूमिअभिलेख विभागाकडून देण्यात येते. सध्या गाव नकाशे, गट नकाशे, डी.पी.नकाशे संदर्भासाठी वापरले जातात. राज्याच्या पुनर्मोजणीचा प्रकल्प देखील शासनाने हाती घेतला आहे.

स्वामित्व योजना सर्व्हे ऑफ इंडिया सहकार्याने सुरू आहे. लहान लहान होत चाललेले जमिनीचे तुकडे, नवीन पायाभूत सुविधा, निवासी प्रकल्प, विकास आराख़डे, रस्ते बांधणी यामुळे येणारा काळ हा जमीन मोजणी क्षेत्रासाठी अधिक आव्हानात्मक असणार आहे.

या क्षेत्रातील अभियंत्यांनाही रोजगार उपलब्धतेस अधिक वाव देणारा असेल हे निश्चित!

संपर्क - पांडुरंग सुपेकर, (९८८११३०१९९) प्राचार्य, विश्वेश्वरय्या व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, औंध पुणे. स्थापत्य अभियंता (PMRDA Licence Engineer) गेली ३० वर्षे जमीन मोजणी अध्यापनाचे काम करतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT