Tomato Pest Agrowon
ॲग्रो गाईड

Tomato Pest : टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

टोमॅटो पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे २४ ते ६५ टक्क्यांपर्यंत नुकसान होते. कमी सूर्यप्रकाश, ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता या बाबी किडीच्या वाढीस पोषक ठरतात. अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा.

Team Agrowon

अमोल ढोरमारे

टोमॅटो पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीच्या (Tomato Fruit Borear) प्रादुर्भावामुळे २४ ते ६५ टक्क्यांपर्यंत नुकसान होते. कमी सूर्यप्रकाश, ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता या बाबी किडीच्या वाढीस पोषक ठरतात.

अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा. टोमॅटो पिकाची खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामांत लागवड केली जाते. पिकास २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ६० ते ७५ टक्के आर्द्रता असलेले हवामान चांगले मानवते.

टोमॅटो पिकावर विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतो. विशेषतः फळधारणा झाल्यानंतर विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. कीड नियंत्रणासाठी एकात्मिक नियंत्रण पद्धतींचा अवलंब फायदेशीर ठरतो.

फळ पोखरणारी अळी ः
शास्त्रीय नाव ः हेलिकोव्हर्पा अर्मिजेरा (Helicoverpa armigera)
- ही बहुभक्षीय कीड सुमारे १८१ पेक्षा जास्त पिकांवर जीवनक्रम पूर्ण करते. या अळीला अमेरिकन बोंड अळी, शेंगा पोखरणारी अळी व घाटे अळी अशा विविध नावांनी ओळखले जाते.

जीवनक्रम ः
- अवस्था ः अंडी, अळी, कोष आणि पतंग.
- अळी अवस्था जास्त नुकसानकारक असते.


- मादी पतंग साधारणपणे २५० ते ५०० गोलाकार हिरवट पिवळसर रंगाची अंडी पाने, कळी आणि फुलांवर घालते. अंड्यातून ४ ते ६ दिवसांत अळी बाहेर पडते.
- अळीचा रंग हा पिकानुसार वेगवेगळा असतो. अळीची १५ ते २० दिवसांत वाढ पूर्ण होते. त्यानंतर पिकांजवळील जमिनीत ती कोष अवस्थेत जाते.


- कोषावस्था १ आठवडा ते एक महिन्यांपर्यंतची असते.
- अळी एका वर्षात ७ ते ८ पिढ्या पूर्ण करते.

नुकसानीचा प्रकार ः
- लहान अवस्थेतील अळी शेंड्याची पाने खाते. त्यामुळे पानांवर पांढरे पट्टे दिसतात.
- मोठी अळी हिरव्या, पिकलेल्या लहान टॉमॅटोला छिद्र पाडून त्यातील गर खाते. गर खाताना अळी फळांमध्ये विष्ठा टाकते. त्यामुळे फळे खराब होतात.


- अळी फळे खाताना अर्धे शरीर आत, तर अर्धे शरीर बाहेर ठेवून विशिष्ट पद्धतीने फळ खाते. हे तिच्या नुकसानीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे.
- टोमॅटो पिकात या अळीमुळे सुमारे २४ ते ६५ टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

एकात्मिक नियंत्रण ः
- उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे किडीच्या अवस्था जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्ष्यांनी खाल्ल्यामुळे नष्ट होतात.


- किडीस सहनशील वाणांची लागवड करावी.
- सापळा पीक म्हणून पिकाच्या बाजूने झेंडू पिकाची लागवड करावी. टोमॅटोच्या १४ ओळींनंतर झेंडूच्या दोन ओळी लावाव्यात.


- कोळपणी व निंदणी करून शेत तणविरहित ठेवावे.
- प्रादुर्भावग्रस्त फळे तोडून त्यांची योग्या विल्हेवाट लावावी.


- मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
- सर्वेक्षणासाठी एकरी ५ ते ६ कामगंध सापळे लावावेत.

जैविक नियंत्रण ः
- पीक फुल अवस्थेत असताना, अझाडीरॅक्टीनची (३०० पीपीएम) फवारणी करावी.
- एच.ए.एन.पी.व्ही. (२५० एल.ई.) विषाणूची १ मिलि प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
- कामगंध सापळ्यांच्या निरीक्षणाचा आधार घेऊन ट्रायकोग्रामा ब्रासिलिअन्सिस

(Trichogramma brasiliensis) हेक्टरी ५० हजार अंडी या प्रमाणे दोन वेळा सोडावीत. पहिल्यांदा फुले येण्यावेळी आणि त्यानंतर १० दिवसांनी सोडावीत किंवा
ट्रायकोग्रामा ब्रासिलिअन्सिस अडीच लाख अंडी प्रति हेक्टर प्रमाणे फळ धारणेपासून सोडावीत. त्यामुळे फळांचे १६ टक्क्यांपर्यंत नुकसान कमी होण्यास मदत होते.

आर्थिक नुकसान पातळी ः
प्रति कामगंध सापळा प्रतिदिन २ पतंग किंवा
१ ते २ अळ्या प्रति मीटर ओळींत किंवा
२ टक्के नुकसानग्रस्त फळे.

रासायनिक नियंत्रण ः
किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.
(प्रमाण ः फवारणी प्रति १० लिटर पाणी) (नॅपसॅक पंपासाठीचे प्रमाण)
फ्लुबेडायअमाइड (२० टक्के डब्ल्यूजी) ५ ग्रॅम किंवा
- नोव्हॅलुरॉन (१० टक्के ईसी) ७.५ मिलि किंवा
- क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ३ मिलि किंवा
- इन्डोक्झाकार्ब (१४.५० टक्के एससी) ८.३३ मिलि किंवा
- क्विनॉलफॉस (२५ ईसी) १० मिलि
वरीलपैकी एका कीटकनाशकाची नॅपसॅक पंपाने फवारणी करावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.

(टीप ः लेबलक्लेम आहेत.)

- अमोल ढोरमारे, ९६०४८३३८१५
(सहायक प्राध्यापक, कृषी कीटकशास्त्र विभाग, सौ. के.एस.के (काकू) कृषी महाविद्यालय, बीड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation: कृषिमंत्री भरणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची दिली ग्वाही

Marathwada Rain: तीन जिल्ह्यांतील १९८ मंडलांत पावसाची हजेरी

Nanded Heavy Rain: मुखेडला पाच नागरिकांसह ५२ जनांवरांचा मृत्यू

Agriculture Technology: विदर्भातील दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी प्रयत्न

Agriculture Technology: भात रोप निर्मितीचे नवे तंत्र ठरतेय फायद्याचे...

SCROLL FOR NEXT