Humani Control Agrowon
ॲग्रो गाईड

Sugarcane Humani Control : सामूहिकरीत्या हुमणीचे एकात्मिक नियंत्रण आवश्यक

Humani Control : यंदा राज्यामध्ये कमी पाऊस आणि बराच काळ खंड अशी स्थिती आहे. त्यामुळे बहुतांशी भागात हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रामुख्याने ऊस लागवडीत जास्त प्रादुर्भाव दिसत आहे.

Team Agrowon

डॉ. शालिग्राम गांगुर्डे, डॉ. राजेंद्र भिलारे

Humani Pest : यंदा राज्यामध्ये कमी पाऊस आणि बराच काळ खंड अशी स्थिती आहे. त्यामुळे बहुतांशी भागात हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रामुख्याने ऊस लागवडीत जास्त प्रादुर्भाव दिसत आहे. सुरुवातीला जिरायती आणि नंतर बागायती भागातही प्रादुर्भाव दिसून येण्यास सुरुवात झाली आहे.

भारतामध्ये हुमणीच्या साधारणपणे ३०० प्रजाती असून, त्यातील लिकोफोलिस लेपीडोफोरा (नदी काठावरील) आणि होलोट्रॅकिया सेरेटा (माळावरील) या दोन प्रजाती राज्यामध्ये आढळतात. त्यातील होलोट्रॅकिया सेरेटा या प्रजातीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ऊस पिकामध्ये हुमणीच्या प्रादुर्भावामुळे सुमारे ३० ते ८० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

हुमणीच्या भुंग्याचे नियंत्रण पहिल्या अवस्थेमध्ये जून ते जुलै या काळात करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविणे शक्य होते. मात्र त्यानंतरही प्रादुर्भाव दिसून आल्यास तिसऱ्या अवस्थेतील अळीचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य पद्धतींचा अवलंब करावा. अन्यथा, नियंत्रण करणे अवघड होते. साधारणपणे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शेतामध्ये हुमणीच्या अळ्या दिसण्यास सुरुवात होते.

अळीच्या तीन अवस्था असून, पहिल्या अवस्थेतील अळी जमिनीतील सेंद्रिय पदार्थावर आणि नंतर पिकांच्या मुळांवर उपजीविका करते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील अळी ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात झपाट्याने मोठी होते. आणि पिकाच्या मुळांवर आणि उसाच्या बेटावर आधाशाप्रमाणे तुटून पडते. उसाची बेटेच्या बेटे उद्ध्वस्त झाल्यानंतर नुकसानीचा प्रकार लक्षात येतो.

जीवनक्रम ः
- अंडी, अळी, कोष व भुंगेरे या चार अवस्था.
- चारही अवस्थेत आकार, रंग आणि नुकसानीत बदल होतो.
- एका वर्षांत एकच पिढी निर्माण होते.
- एक वर्षामध्ये किडीच्या सर्व अवस्था पूर्ण होतात.
- किडीची भुंगेरे ही एकमेव अवस्था काही वेळेसाठी जमिनीबाहेर असते. इतर सर्व अवस्था जमिनीमध्ये असतात. त्यामुळे भुंगेरा अवस्थेतच किडीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

अंडी ः
- मादी जून ते ऑगस्टचा पहिला आठवडा या काळात जमिनीमध्ये १० ते १५ सेंमी खोलीपर्यंत अंडी घालते.
- अंडी साबुदाण्यासारखी पांढरी, गोल असतात.
- मादी १० ते १५ दिवसांत ५५ ते ६० अंडी घालते.

अळी ः
- अळीच्या तीन अवस्था असतात. पहिली अवस्था २५ ते ३० दिवस, दुसरी ३० ते ४५ दिवस आणि तिसरी १४० ते १४५ दिवसांची असते.
- आकाराने ४७ मिमी लांब आणि १२ मिमी जाड.
- चंद्राकृती इंग्रजी ‘C’ आकाराची, रंगाला भुरकट पांढरी, पोटाचा शेवटचा भाग चकचकीत काळसर आणि गुळगुळीत.
- डोळे गडद तांबूस, टणक व जबडा मजबूत असतो.

कोष ः
- सुरुवातीस फिक्कट रंगाचे असून, नंतर तपकिरी आणि टणक होतात.
- कोष कालावधी ः २५ ते ४० दिवस.

भुंगेरे ः
- रंगाला पिवळसर पांढरे असून पंख पांढरट तपकिरी असतात. कालांतराने शरीर व पंख कठीण बनतात. रंगाला तांबूस तपकिरी काजू बियांसारखा होतो.
- जानेवारी ते मे महिन्यापर्यंत जमिनीतच सुप्तावस्थेत पडून राहतात.
- कालावधी १३ ते १०३ दिवसांचा असतो.
- पहिला पाऊस झाल्यावर जमिनीतील सुप्तावस्थेतील भुंगेरे संध्याकाळी ६.३० ते ७.३० या दरम्यान बाहेर पडतात. त्यानंतर ५ ते १० मिनिटे नर आणि मादी भुंगेऱ्यांचे मिलन होते. नंतर ते कडूनिंब, बोर, शेवगा किंवा बाभळीच्या झाडांवर पाने खाण्यासाठी जातात.
- मादी भुंगेरे सुर्योदयापूर्वी जमिनीत पुन्हा अंडी घालते. मादी भुंगेरे प्रतिदिन ५ ते ६ अंडी अशी २ ते ३ आठवडे अंडी घालते.

नुकसानीचे स्वरूप ः
- आर्थिक नुकसान पातळीच्या दृष्टीने अळी अवस्था सर्वात उपद्रवी आहे. अळी जमिनीत राहून ऊस पिकाच्या मुळांवर, पेरावर व कांडीवर उपजीविका करते.
- अळी वनस्पतीची मुळे कुरतडते. त्यामुळे झाडाचे अन्न आणि पाणी घेण्याचे कार्य बंद पडते, पानांचा रंग पिवळा पडू लागतो. कालांतराने संपूर्ण बेटच वाळून जाते.
- जास्त प्रादुर्भावामध्ये उसाचे बेट सहज उपटून येते. खोडवा उसामध्ये नुकसान जास्त दिसून येते.
- पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी उपद्रव थांबविते. आणि जमिनीतच १० ते १५ सेंमी खोलीवर कोषावस्थेत जाते.
- लागवडीसाठी किडीच्या प्रादुर्भावास तुलनेने कमी बळी पडणाऱ्या वाणांची लागवड करावी.
- एप्रिल-मे किंवा सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यांत हुमणीग्रस्त शेताची नांगरट दिवसा करावी. त्यामुळे अळ्या जमिनीबाहेर पडतात आणि पक्षी त्यांना खातात.
- हुमणीग्रस्त क्षेत्रात खोडवा घेणे टाळावे. पीक फेरपालट म्हणून सूर्यफुलाची लागवड करावी.
- सापळा पीक म्हणून भुईमूग किंवा तागाची लागवड करावी.

सामुदायिक नियंत्रण आवश्यक ः
किडीची भुंगेरे हीच एकमेव अवस्था काही वेळेसाठी जमिनीबाहेर असते. या अवस्थेतच किडीचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. किडीच्या जीवनक्रमाचा अभ्यास करून अळी आणि भुंगेरे यांचा बंदोबस्त केल्यास प्रभावी कीड व्यवस्थापन करता येईल. त्यासाठी प्रतिबंधात्मक मशागती, यांत्रिक, जैविक आणि रासायनिक उपाययोजना करणे आवश्यक आहे. नियंत्रणासाठी गावपातळीवर एकाचवेळी सामूहिक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- जुलै ते सप्टेंबर दरम्यान उसाच्या पानांवरील तसेच कडुलिंब, बाभूळ, बोर या झाडांवरील भुंगेरे संध्याकाळी गोळा करून केरोसीन मिश्रित पाण्यात टाकून मारावेत.
- हेक्टरी ५ प्रमाणे प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
- केरोसीन मिश्रित पाण्याच्या टाक्यांवर दिवे लावल्यास, भुंगेरे त्याकडे आकर्षित होऊन पाण्यात पडतात.
- यजमान झाडांच्या फांद्या रात्री ८.३० वाजता हलवून त्या झाडाखाली प्लॅस्टीक कागद ठेवून त्यावर पडलेले भुंगेरे गोळा करून केरोसीन मिश्रित पाण्यात टाकावेत.
- कडुलिंब झाडांच्या डहाळ्यावर रासायनिक कीटकनाशक फवारून हे डहाळे शेतामध्ये जागोजागी ठेवावेत. त्याची पाने खावून भुंगेरे मरून जातील.
- तीव्र प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी बेटे खोदून तेथील अळ्या गोळा करून माराव्यात. प्लॅस्टिक भांड्यात भरडलेली एरंडी २५० ग्रॅम आणि ५ लिटर पाणी घ्यावे. हे भांडे उसाच्या शेतात ठेवून द्यावे. साधारण आठवडाभराच्या कालावधीत या भांड्यांमध्ये हुमणीचे भुंगेरे मरून पडल्याचे आढळून येईल. या पद्धतीमुळे भुंगेऱ्यांच्या अंडी घालण्यावर आणि अळ्या तयार होण्याच्या क्रियेवर नियंत्रण मिळविता येईल. मात्र यासाठी गावपातळीवर सामुदायिकरीत्या मोहीम राबवावी. जेणेकरून अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट करणे शक्य होईल.

जैविक नियंत्रण ः
- बगळे, चिमणी, मैना, कावळा, घार इ. पक्षी व मांजर, रानडुक्कर, मुंगूस इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात. त्यामुळे हुमणीचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते.
- ऊस लागवडीच्या वेळी सरीमध्ये मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना है जैविक बुरशीनाशक २० ते २५ किलो प्रति १२५ किलो शेण खतामध्ये मिसळून प्रति हेक्टरी मिसळावे. या बुरशी हुमणीच्या अळ्यांवर वाढून प्रादुर्भाव कमी होतो.
- तसेच उसाच्या बेटाजवळ देखील वरीलप्रमाणे शेणखतातून वापर करावा. त्यासाठी झाडाच्या सावलीत गोणपाट अंथरून त्यावर २५ किलो शेणखत किंवा गांडूळ खत पसरून त्यावर मेटाऱ्हायझीयम ॲनिसोप्ली ही बुरशी मिसळावी. त्यावर पाणी शिंपडून मिश्रण ओलसर करावे. हे मिश्रण एक आठवडा गोणपाटाने झाकून नंतर सरीमध्ये उसाच्या बुडाजवळ टाकून हलके पाणी द्यावे.
- हेटेरोहॅब्डिटिस सूत्रकृमी हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यामुळे शेतामध्ये या सूत्रकृमींचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

रासायनिक नियंत्रण ः
- फिप्रोनिल (४० टक्के) अधिक इमिडाक्लोप्रिड (४० टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त कीटकनाशक) ५०० ग्रॅम प्रति १२५० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी पंपाची तोटी (नोझल) काढून सरीतून सोडावे. किंवा
- थायामेथोक्झाम (०.९० टक्का) अधिक फिप्रोनिल (०.२० टक्का जी.आर.) (संयुक्त कीटकनाशक) १५ किलो प्रति हेक्टर प्रमाणे सरीमध्ये चळीतून देऊन नंतर पिकास हलके पाणी द्यावे.

(लेबलक्लेम शिफारस आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT