Fish Farming
Fish Farming Agrowon
ॲग्रो गाईड

Fish Seed:मत्स्यबीज वाहतूक, संचयनाचे महत्त्व

Team Agrowon

किरण वाघमारे, शुभम कोमरेवार

मत्स्यबीज संचयनाकरिता मत्स्यबीज (Fish seeds) निर्मिती केंद्र किंवा बीज विक्री ठिकाणापासून संवर्धन तलावापर्यंत विविध माध्यमांच्या साह्याने मत्स्यबीजांची वाहतूक केली जाते. मत्स्यबीज वाहतुकीदरम्यान अनेक बाबींमुळे मत्स्यबीजावर ताण येऊ शकतो. या दरम्यान योग्य व्यवस्थापन न केल्यास बीजाची मोठ्या प्रमाणात मरतूकदेखील होऊ शकते. मत्स्यबीजाची वाहतूक करण्याआधी बीजाला प्रवासासाठी योग्यरीत्या तयार केल्यास व वाहतुकीदरम्यान विशेष काळजी घेतल्यास बीजावरील ताण कमी करणे शक्य होते.

९० ते ९५ टक्क्यांपर्यंत मत्स्यबीज जगण्याचे प्रमाण मिळणे शक्य होते. देशातील मत्स्य उत्पादकांद्वारे मत्सबीज वाहतुकीदरम्यान बीज ठेवण्यासाठी विविध पारंपरिक माध्यमांचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने मातीची हंडी, मडके, प्लॅस्टिक टाकी इत्यादींचा वाहतुकीकरिता वापर केला जातो. यामध्ये मत्स्यबीज मरतुकीचे प्रमाण हे अधिक असते. डोंगराळ आणि उंच ठिकाणी नमूद पारंपरिक साहित्यांचा वापर करणे चुकीचे ठरू शकते.

मत्स्यबीज वाहतुकीच्या पद्धतीः

मत्स्यबीज वाहतुकीकरिता विविध पद्धतींचा वापर केला जातो. मत्स्यबीजच्या पॅकिंगनुसार मत्स्यबीज वाहतूक पद्धतीच्या सील बंद वातावरण पद्धत आणि खुले वातावरण पद्धत असे दोन भाग आहेत.

सील बंद वातावरण पद्धतः

- सील बंद वातावरण पद्धतीमध्ये ऑक्सिजन भरलेल्या प्लॅस्टिक पिशवीचा प्रामुख्याने वापर केला जातो.

- योग्य पॅकिंग केल्यास यामध्ये किमान ३६ ते ४४ तासांपर्यंत बीजाची वाहतूक करणे शक्य असते.

- देशातील बहुतांश मत्स्यबीज व्यावसायिक याच पद्धतीचा वापर करतात. यामध्ये मत्स्यबीज मरतुकीचे प्रमाण कमी असते. कमीत कमी जागेत मोठ्या प्रमाणावर मत्स्यबीजांची वाहतूक करणे शक्य होते.

खुले वातावरण पद्धतः

- खुल्या वातावरणातील मत्स्यबीज वाहतूक ही मत्स्यबीज वाहतूक करण्याची पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये प्रामुख्याने मातीचे मडके, प्लॅस्टिक ड्रम, टाकी किंवा ताडपत्रीने झाकलेल्या चारचाकी ट्रॉली वाहतूक इत्यादींचा वापर केला जातो. ही पद्धती प्रामुख्याने मोठ्या माशांच्या किंवा मोठ्या मत्स्यबीजाच्या वाहतुकीसाठी वापरली जाते.

मत्स्यबीज वाहतुकीदरम्यानच्या महत्त्वाच्या बाबीः

१) मत्स्यबीज अत्यंत नाजूक असल्याने वाहतुकीदरम्यान वातावरणाची अनुकूलता फार महत्त्वाची असते. थंड व शांत वातावरणात मत्स्यबीजाची वाहतूक केल्यास, मत्स्यबीज मरतुकीचे प्रमाण कमी करणे शक्य असते.

२) थंड वातावरणात मासळीच्या चयापचय क्रिया आणि श्‍वसनाचा वेग हा मंद असतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये ऑक्सिजनची गरज कमी असते.

३) वाहतुकीदरम्यान मत्स्यबीज अतिउत्साही असल्यास त्यांची ऑक्सिजन गरज तीन ते पाच पटीने वाढते. त्यामुळे वरील प्रमाणे वातावरणाची अनुकूलता लक्षात घेता, मत्स्यबीज वाहतूक ही पहाटे किंवा सायंकाळी केल्यास सोईचे ठरते.

४) मत्स्यबीज पॅकिंग पूर्ण होताच मत्स्यबीज लवकरात लवकर संचयनाच्या जागी पोहोच करण्याकरिता योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे असते. किमान अंतर असणाऱ्या योग्य मार्गाचा वापर करून मत्सबीज संचयनाच्या ठिकाणापर्यंत पोहोचविल्यास मत्स्यबीजावर येणाऱ्या ताणतणावावर नियंत्रण मिळविणे शक्य होते.

५) वाहतुकीदरम्यान पिशव्या गळती होत नसल्याचे तपासून घेणे आवश्यक असते. असे निदर्शनास आल्यास त्वरित सदर पिशवीला बदलून घेण्यात येते.

६) दूरचा प्रवास असल्यास मत्स्यबीज असलेल्या पिशव्यांना पुठ्यांच्या बॉक्सचा वापर करून सुरक्षित ठेवण्यात येते.

वाहतूक पूर्वतयारी आणि व्यवस्थापनः

वाहतूक करण्यापूर्वी मत्स्यबीजाला योग्यरीत्या तयार केल्यास मत्स्यबीजावरील ताण कमी होतो. वाहतुकीदरम्यान त्यांच्या मरतुकीचे प्रमाण कमी करणे शक्य होते. पूर्वतयारी करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे मत्स्यबीजाला वाहतुकीदरम्यान परिस्थितीला व नवीन वातावरणाला जुळवून घेण्यासाठी तयार करणे होय.

१) मत्स्यबीज पकडणे आणि हापा नेटमध्ये गोळा करून ठेवणेः

- मत्स्यबीज पकडण्यासाठी गाठ नसलेल्या ओढ जाळ्याचा किंवा हापा नेटचा वापर केला जातो. याकरिता ०.३ ते ०.८ सेंमी मेश आकाराचे ओढ जाळे वापरले जाते. मत्स्यजिरे किंवा मत्स्य फ्राय बीज पकडायचे असल्यास यासाठी नायलॉन हापा किंवा सुती कापडाचा गमछा इत्यादींचा वापर केला जातो.

मत्स्यबीज पकडताना बीजांची योग्य हाताळणी करणे महत्त्वाचे असते. पकडलेल्या मत्स्यबीजाला नायलॉन हापा चार बांबूच्या साहाय्याने (लहान आकाराचे कापडी पिंजरा) तलावाच्यामध्ये बांधून ठेवला जातो. बोटुकली किंवा मोठ्या माशांना वाहतुकीपूर्व किमान १० ते ४८ तास याप्रकारे हापा नेटमध्ये (कंडिशनिंग) ठेवणे गरजेचे असते. यादरम्यान कोणत्याही प्रकारचे खाद्य दिले जात नाही. जेणेकरून त्यांचे पोट व अन्न नलिका साफ असावी. वाहतुकीदरम्यान त्यांची चयपचय प्रक्रिया कमी असावी. यामुळे ऑक्सिजनची मागणी कमी करण्यास मदत होते. पॅकिंग पिशव्यामधील नत्रयुक्त घटकांचे प्रमाण कमी होते.

पूर्वतयारीदरम्यान हापा नेटमध्ये माशाची घनता जास्त असल्यास पाण्यातील प्राणवायू प्रमाण वाढविण्यासाठी एरीयशन पद्धतीचा वापर केला जातो. मत्स्यबीज पकडण्याआधी मत्स्यबीज पॅकिंग करिता आवश्यक असलेले सर्व साहित्य जसे मत्स्यबीज मोजमाप साहित्य, ऑक्सिजन सिलिंडर, पॅकिंग प्लॅस्टिक पिशव्या, पॅकिंग बॉक्स इत्यादीची व्यवस्था करून ठेवावी. जेणेकरून आवश्यकते नुसार वेळेत पॅकिंग करणे शक्य होते.

२) मत्स्यबीजांचे विभाजनः

मासळीच्या प्रजातीनुसार व मत्स्यबीज आकारमान, वजनानुसार त्यांचे विभाजन केले जाते. असे केल्यास पॅकिंगदरम्यान होणारा त्रास टाळणे शक्य होते. मत्स्यबीजाच्या आकारमानात विविधता असल्यास संवर्धन करते वेळी योग्य व्यवस्थापन करणे कठीण होते. त्यामुळे माशांचे विभाजन करून सारख्या आकारानुसार विभाजन करणे महत्त्वाचे असते. अशक्त, रोगी, कमजोर मत्स्यबीज निदर्शनास आल्यास त्याला सुदृढ बीजांपासून वेगळे केले जाते. अशा मत्स्यबीजांचे पॅकिंग केले जात नाही.

३) पॅकिंगपूर्व निर्जंतुकीकरणः

मत्स्यबीज पॅकिंग करण्याआधी त्याला पोटॅशिअम परमॅग्नेट किंवा सोडिअम क्लोराईडचा (मीठ) वापर करून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. यासाठी १ ते २ पीपीएम (१००० लिटर पाण्यामागे १ ग्रॅम) पोटॅशिअम परमॅग्नेट किंवा १० लिटर पाण्यामध्ये २ ते ३ ग्रॅम मीठ यांचा वापर केला जातो.

मत्स्यबीज पॅकिंगकरिता पाण्याची गुणवत्ताः

मत्स्यबीज पॅकिंगकरिता वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता योग्य असावी. मत्स्यबीज पॅकिंग करिता संचयन तलावातील पाणी वापरले जाते. पण संचयन तलावातील पाण्यातील गढूळता जास्त असल्यास पाण्यातील गढूळता कमी करण्याकरिता विविध उपाययोजना केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने पाण्याला किमान २० ते २४ तासांपर्यंत वेगळ्या टाकीमध्ये स्थिर ठेवण्यात येते. पाण्यातील गढूळता कमी झाल्यावर सदर पाण्याचा पॅकिंगकरिता वापर केला जातो. पॅकिंगकरिता कूपनलिकेच्या पाण्याचा वापर शक्यतो टाळावा.पाण्याची गढूळता जास्त असल्यास मत्स्य बिजाला श्वसन प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. यामुळे माशाची मर होऊ शकते.

४) मत्स्यबीज मोजमापः

१) वजनानुसार :

यामध्ये वजन मापावर १ किलो मत्स्यबीजाची मोजणी केली जाते. मत्स्यबीज विक्री केली जाते. असे करतेवेळी डिजिटल वजन काट्याचा वापर केल्यास, तंतोतंत मत्स्यबीज मोजणे शक्य ठरते.

२) संख्येनुसारः

यामध्ये मत्स्यबीज त्याच्या संख्येनुसार मोजले जाते. मत्स्यबीजाचे आकार हे लहान असल्यामुळे एकूण एक मत्स्यबीज मोजणे शक्य होत नाही. म्हणून याकरिता गाळणी, कप किंवा लहान मग इत्यादींचा वापर केला जातो. माप ठरवून घेण्यासाठी वरील मापकामध्ये तंतोतंत बीज भरून त्याची तीन वेळा मोजणी केली जाते. मोजणीदरम्यान प्राप्त झालेल्या आकड्यांची सरासरी काढून मापाला प्रमाणित केले जाते. प्राप्त झालेला सरासरी आकड्यानुसार मत्स्यबीज मोजणे शक्य होते.

५) प्लॅस्टिक पिशवीमधील पॅकिंगः

मत्स्यबीज पॅकिंग करण्याकरिता ६५ ते ७५ सेंमी लांब, ४०-४५ सेंमी रुंद आणि १५ ते २५ लिटरपर्यंत क्षमता असलेले प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. पिशव्यांची जाडी ३० ते ३५ मायक्रॉन असावी. प्लॅस्टिक पिशवीची खालची बाजू ताणपूर्वक बांधून घेतली जाते. जेणेकरून पाणी गळती होण्याची शक्यता कमी होते. पॅकिंग करण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये त्यांच्या २० ते ३० टक्के क्षमतेपर्यंत पाणी भरण्यात येते.

पाणी भरणा केल्यानंतर सदर प्लॅस्टिकमधून पाणी गळती होत असल्यास गळकी पिशव्या बदलून घेतल्या जातात. गळती तपासणी झाल्यावर योग्य मापाचा वापर करून सदर पिशवीमध्ये मत्स्यबीज सोडण्यात येते. या दरम्यान वेळ वाया न घालविता लवकरात लवकर ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करून पिशव्यांमध्ये ऑक्सिजन भरणा करून लगेच सील बंद केल्या जातात.

वाहतुकीदरम्यान प्रति पिशवीनुसार मत्स्यबीज पॅकिंगची घनताः

बीजाचे वजन (ग्रॅम)---मत्स्यबीज प्रति पिशवी (नग)----वाहतूक कालावधी

१-५---२०००---११-१२ तास

१-५---१०००---२२-२४ तास

५-३०---२०-३०---८ तास

३०-६०---१०-२०---८ तास

६०-१००---८-१०---८ तास

>१००---खुल्या पद्धतीने (१००० लिटर पाण्यामध्ये २००० नग)---१२-१४ तास

योग्य पॅकिंग करण्याकरिता प्लॅस्टिक पिशवीमध्ये किमान ७० ते ८० टक्के जागा ऑक्सिजन भरून घेणे आवश्यक असते. किमान ३ ते ५ टक्के जागा मोकळी सोडण्यात येते.

ट्रक ट्रॉलीमध्ये खुल्या पद्धतीने मत्स्यबीज वाहतूकः

प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये मत्स्यबीज वाहतूक करणे हा एक सर्वांत उत्तम पर्याय समजला जातो पण मत्स्य बोटुकलीचे आकारमान जास्त असल्यास त्यांना प्लॅस्टिक पिशवीमध्ये पॅकिंग करणे अयोग्य ठरते. यामध्ये प्लॅस्टिक पिशवी फाटून गळतीचे प्रमाण अधिक असते. अशावेळी बिजांची वाहतूक करण्याकरिता खुल्या पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने ट्रक, ट्रॉली वाहतूक, इत्यादींचा वापर केला जातो. सर्वप्रथम वाहतुकीच्या कॅरिअर भागात जाड ताडपत्रीचा वापर करून पाणी अडवून कृत्रीम छोट्या आकाराचा तलाव तयार केला जातो.

तयार केलेल्या तलावामध्ये जाळ्याचा वापर करून विभाजन करून घेतल्यास एका वाहतुकीमध्ये एकाच वेळी विविध प्रजातींच्या बीजांची वाहतूक करणे शक्य होते. यामध्ये क्षमता व गरजेनुसार पाणी भरणा केले जाते. प्रति १००० लिटर पाण्यामध्ये २०००० ते ३०००० मत्स्यबीज (५-१० ग्रॅम आकार) एका वेळी ४ ते १२ तासांपर्यंत वाहतूक करणे शक्य असते. मत्स्यबीज घनता ही मत्स्य बीज आकारमान नुसार व प्रजातीनुसार बदलावे लागते. प्रवासा दरम्यान पाण्याचे तापमान वाढल्यास शक्य असल्यास पूल मधील पाणी १० ते २० टक्के बदलणे योग्य समजले जाते.

मत्स्यबीज संचयनः

१) तलावाच्या ठिकाणी पोहोचताच त्वरित मत्स्यबीजाच्या पिशव्या वाहनातून उतरवून संचयन तलावाच्या पृष्ठभागावर ठेवावे. यामुळे पिशवीतील पाण्याचे तापमान, तलावाच्या पाण्याच्या तापमानातील अंतर कमी होण्यास मदत होते. मत्स्यबीजावर तापमानामुळे ताण येत नाही.

२) संचयन करण्यापूर्वी पाण्यामध्ये १ ते २ पीपीएम (१००० लिटर मागे १ ते २ ग्रॅम) पोटॅशिअम परमॅग्नेटचा वापर करून निर्जंतुकीकरण केल्यास मत्स्यबीजांवर येणाऱ्या रोगांवर नियंत्रण मिळविणे शक्य होते.

३) १० ते १५ मिनिटांपर्यंत मत्स्यबीज पिशव्या पाण्यावर ठेवल्यावर पिशव्या हळूवार उघडून तलावातील पाणी हळूवार पिशवीतील पाण्यासोबत मिश्रित करून मत्स्यबीजाला तलावात सोडण्यात येते.

४) शक्य असल्यास मत्स्यबीज थेट तलावात सोडण्याआधी, लहान (२ बाय २)च्या हापा नेटमध्ये किमान २ ते ५ तासांपर्यंत सोडल्यास मत्स्यबीजाच्या हालचालीवर, मरतुकीवर लक्ष देणे शक्य होते. असे केल्यास यामुळे पुढील काळात योग्य व्यवस्थापन करण्यास मदतीचे ठरते.

५) खुल्या पद्धतीचा वापर करून वाहतूक केलेल्या मत्स्यबीजाला सोडताना, अगोदर संचयन तलावातील पाणी ट्रॅक मधील पाण्यात मिश्रित करण्यात येते व माशांना १५ ते २० मिनिटांनंतर हळुवार तलावात सोडण्यात येते.

६) वाहतूक व संचयनादरम्यान योग्य व्यवस्थापन केल्यास ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत मत्स्यबीज जगण्याचे प्रमाण मिळू शकते.

संपर्क ः किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(किरण वाघमारे हे पुणे येथे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहेत. शुभम कोमरेवार हे गडचिरोली येथे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT