Turmeric  Agrowon
ॲग्रो गाईड

Turmeric : हळदीमध्ये भरणीचे महत्त्व

सध्या पावसाने उघडीप दिली असून याचा फायदा घेत हळद पिकाची भरणी करावी. तसेच शिफारशीत खतमात्रा, तण नियंत्रणाची कामे करून घ्यावी. माती लावताना कंद संपूर्ण झाकावा. भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जातात, त्यांची चांगली वाढ होते.

टीम ॲग्रोवन

डॉ. मनोज माळी, डॉ. जितेंद्र कदम

हळद हे प्रमुख नगदी मसाला पीक (Turmeric Spice Crop) म्हणून ओळखले जाते. हळदीचा उपयोग दैनंदिन आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनामध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये (Turmeric Use In Pesticide) मोठ्या प्रमाणावर होतो. विविध गुण वैशिष्ट्यांमुळे हळदीला ‘सुपर फूड’ (Turmeric Super Food) म्हटले जाते. महाराष्ट्रातील हवामानात हळद पिकाचे उत्पादन उत्तमरीत्या घेता येते. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळद उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते.

सध्या हळद लागवड होऊन दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पिकाच्या शाकीय वाढीचा (४६ ते १५० दिवस) हा कालावधी असतो. या काळात साधारण २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान असते. या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. हळद पिकाला ९ महिन्याच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेत निश्‍चित होते. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची भरपूर वाढ होते.

सध्या पावसाने उघडीप दिली असून, याचा फायदा घेत पिकांत आंतरमशागतीची कामे तत्काळ पूर्ण करून घ्यावीत. भरणी करणे, खते, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण इ. महत्त्वाच्या कामांचा आंतरमशागतीमध्ये समावेश होतो.

भरणी करणे ः

- लागवडीनंतर अडीच ते ३ महिन्यांनंतर हळद पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करणे आवश्यक असते. कारण या कालावधीमध्ये फुटवे येण्यास व हळकुंड फुटण्यास सुरुवात होते.

- सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्ड्यामधील मोकळ्या जागेतील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूच्या गड्ड्यांना लावणे म्हणजेच भरणी करणे होय.

- संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी. भरणी केल्यानंतर पाऊस नसेल तर पिकास हलके पाणी द्यावे. जेणेकरून भर लावलेली माती पावसाच्या पाण्याने वाहून जाणार नाही.

- भरणी केल्यामुळे नवीन येणारे हळकुंडे झाकले जाऊन त्यांची चांगली वाढ होते. भरणी केल्यामुळे उत्पादनात साधारण १० ते १५ टक्के वाढ होते. भरणी न केल्यास सूर्यप्रकाशात हळकुंड उघडे पडून ते हिरवे होते आणि वाढ खुंटते.

- गादी वाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साह्याने किंवा दोन गादीवाफ्यांमधील माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करताना ड्रीपर मातीखाली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

भरणीचे फायदे ः

- पावसामुळे उघडे पडलेले हळदीचे गड्डे झाकले जातात. गड्डे झाकले गेल्यामुळे कंदमाशीसारख्या किडींना गड्ड्यांवर अंडी घालता येत नाहीत. त्यामुळे या किडीची पुढील पिढी नष्ट होण्यास मदत होते. तसेच कंदकुज रोगाला आळा बसतो.

- उघड्या गड्ड्याच्या बाजूने नव्याने येणारी हळकुंडे संपूर्ण झाकली जातात. त्यांची वाढ चांगली होते.

- उथळ झालेल्या सऱ्या भरणी केल्यामुळे खोल होण्यास मदत होते. त्यामुळे पिकास व्यवस्थित व समप्रमाणात पाणी मिळते.

- भरणी करतेवेळी शिफारस केलेली खतमात्रा दिल्यामुळे संपूर्ण खते मातीखाली झाकली जातात. खतांच्या मात्रा हळदीच्या मुळांलगत पडल्यामुळे चांगला फायदा होतो. खतांची कार्यक्षमता वाढते.

- मातीखाली झाकलेल्या हळदीच्या जेठ्ठा गड्ड्यांची वाढ चांगली होते. तसेच हळकुंडांची संख्या वाढण्यास मदत होते. परिणामी उत्पादनात वाढ होते.

- भरणीमुळे हळदीची लांब मुळे तुटली जातात. आणि कार्यक्षम तंतुमय मुळे जास्त प्रमाणात तयार होऊन आवश्यक अन्नघटक

शोषणाची क्रिया चांगली होते.

- तणांचा नाश होतो. निंदणीच्या खर्चात बचत होते.

- माती मोकळी झाल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंडे चांगली पोसली जातात.

खत व्यवस्थापन ः

- हळद पिकांस हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश देण्याची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्यावेळी आणि नत्र दोन समान हप्त्यात विभागून द्यावे. नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी आणि दुसरा हप्ता भरणीच्यावेळी (लागवडीनंतर १०० ते १०५ दिवसांनी) द्यावा.

- भरणी करतेवेळी युरिया २१५ किलो, फेरस सल्फेट (हिराकस) १२.५० किलो आणि झिंक सल्फेट १० किलो आणि निंबोळी किंवा करंजी पेंड २ टन प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. भरणीवेळी खतांच्या मात्रा दिल्यामुळे खते योग्यरीत्या मातीमध्ये मिसळली जातात.

पाणी व्यवस्थापन ः

- पावसाचे पाणी जमिनीत साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतामध्ये पाणी साचून राहिले तर मुळांना हवा (ऑक्सिजन) घेण्यास अडथळा येतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज मलूल होतात. अशावेळी साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा.

- ऑगस्ट, सप्टेंबर हा हमखास पावसाचा कालावधी असल्याने वाकोऱ्याची शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी काढून द्यावे. जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन सिंचनाचे नियोजन करावे.

- रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबकचा कालावधी कमी जास्त करावा. सतत सिंचन केल्यामुळे जमिनीत अति ओलावा तयार होऊन हळकुंडे कुजण्याची शक्यता असते.

तणनियंत्रण ः

शेणखताच्या माध्यमातून शेतात तणांचे बी मोठ्या प्रमाणात येते. या तणांचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. तणांचा प्रादुर्भाव पाहून लागवडीनंतर ६०, ९० आणि १२० दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार मजुरांच्या मदतीने निंदणी करावी. हळद पिकांत उगवणीनंतर कोणतेही तणनाशकाची फवारणी करू नये. तणनाशकांमुळे हळद पिकाच्या शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते.

- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४

(प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT