Poultry Diseases
Poultry Diseases Agrowon
ॲग्रो गाईड

Poultry Diseases : कोंबड्यांतील अंतःपरजीवी आजारांची ओळख

Team Agrowon

डॉ. आर. सी. कुलकर्णी, डॉ. के. वाय. देशपांडे, डॉ. आकाश मोरे

Poultry business : कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा अयोग्य व्यवस्थापन पद्धतींमुळे विविध आजारांची बाधा कोंबड्यांना होते. योग्य पद्धतीने व्यवस्थापन केल्यास आजाराचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होते.

कोंबड्यांना विविध जिवाणू, विषाणू आणि परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे अनेक आजारांचा प्रादुर्भाव होते. याचा वाढीवर आणि एकूणच उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यासाठी कोंबड्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आजारी कोंबड्यांचे योग्य निदान करून ताबडतोब पशुवैद्यकांच्या सल्ल्ल्यानुसार ओषधोपचार सुरू करावेत.

१) गोलकृमी ः

- अस्कॅरिडिया गॅली, हेटरॉकीस व टेट्रामेअर इत्यादींचा समावेश होतो.

- गोलकृमी आकाराने लांब व दोन्ही टोकाला निमुळते असतात.

- आतड्यात राहून अन्नरस व रक्ताचे शोषण करतात. आतड्यांतील पेशींना इजा पोहोचवितात.

- कृमींची अंडी पक्ष्यांच्या विष्ठेमधून जमिनीवर पडल्यामुळे काही प्रमाणात जमिनीमध्ये त्यांची वाढ होते.

- कृमींच्या जमिनीवर पडलेल्या अंडी, अळी अवस्था झुरळे, गांडुळे किंवा किडींनी खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरात गोलकृमीची वाढ होते. या यजमानांमार्फत कोंबड्यांमध्ये कृमींचा प्रादुर्भाव होतो.

लक्षणे ः

- बाधित कोंबडीची विष्ठा पातळ होते. आतड्यांवर सूज येते.

- लहान कोंबड्या आजाराला लवकर बळी पडतात.

- अशक्त आणि मलूल होतात.

- खालेल्या खाद्याचे अंडी व मांसामध्ये रूपांतर करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे अंडी व मांस उत्पादनात घट येते.

निदान व उपचार ः

- आजारी कोंबड्यांची विष्ठा वेळोवेळी तपासून घ्यावी.

- मृत कोंबडीचे शवविच्छेदन करून घ्यावे.

- बाधित कोंबडीवर पशुवैद्यकाच्या सल्याने उपचार करावेत. जंतनाशकांचा वापर करावा.

गादीवर संगोपन केलेल्या लेअर कोंबड्यांसाठी जंतनाशक मात्रा ः

जंतनाशक पाजण्याची वेळ---वय

प्रथम---४ ते ६ आठवडे

द्वितीय---८ ते १० आठवडे

तृतीय---१२ ते १४ आठवडे

२) पट्टकृमी (चपटे जंत) ः

- हे कृमी रिबिनीच्या फितीप्रमाणे लांब असतात. लांबी काही मिलिमीटर ते मीटरपर्यंत असू शकते.

- एकाच कृमीमध्ये नर व मादीचे जननेंद्रिय असतात.

- कोंबड्यात विशेषत: रेलिटिना, अमोबोटेनिया, कोनटेनिया, डेवेनिया इ. पट्टकृमी आढळतात.

- विष्ठेद्वारे जंताची अंडी जमिनीवर टाकली जातात.

- दूषित विष्ठा गांडूळ, माश्‍या, खरपडे, किड्यांनी खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटात कृमींची वाढ होते. या यजमानांमार्फत जंताचा प्रादुर्भाव कोंबड्यात होतो. पुन्हा बाधित कोंबड्यांच्या विष्ठेमधून कृमीची अंडी जमिनीवर पडतात. अशाप्रकारे हे जीवनचक्र पूर्ण होते.

लक्षणे ः

- भूक मंदावते. अन्न कमी खाल्ल्यामुळे अशक्तपणा वाढतो.

- वाढ खुंटते, वजनात घट येते. पक्षी मलूल पडतात. हगवण लागते.

- बरेच दिवस सौम्य स्वरूपात आजाराची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे कोंबड्या वेगाने श्‍वास घेतात. मृत्यू होण्यापूर्वी कोंबड्या थरथरतात.

उपचार ः

- आजारी कोंबड्यांच्या विष्ठेचे निदान करून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.

- शेडच्या परिसरात खरपडे, माशी, किडे इत्यादींचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.

३) पर्ण कृमी ः

- पाणथळ, दलदल, तलाव, नदी इ. ठिकाणी हे कृमी जास्त आढळतात.

- कृमींचा प्रादुर्भाव गोगलगाई मार्फत होतो.

- जंत पानांच्या आकाराचे असून वरील व खालील भाग चपटा असतो.

- हे कृमी कोंबडीच्या आतड्यांत चिकटून राहतात. त्यासाठी कृमींमध्ये हूक्स किंवा सकर असतात.

- कोंबड्यात विशेषत: प्रोस्थोगोनिमस, इकायनोस्टोमा इ. चा प्रादुर्भाव होतो.

- जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी गोगलगाय व ड्रॅगन माशी माध्यम म्हणून काम करते.

लक्षणे ः

- प्रोस्थोगोनिमस मुळे कोंबडीच्या अंड्याचे कवच एकदम पातळ होते किंवा बऱ्याच वेळा कवच तयार होत नाही. यामुळे अंडी वेड्यावाकड्या आकाराची बनतात.

- अंड्यावर कॅल्शिअमचा थर नसल्यामुळे गुदद्वारावाटे पांढरा चमकणारा पदार्थ बाहेर पडतो.

- अंड्यावर कवच तयार होत नसल्यामुळे अंडी उत्पादन कमी होते.

- बाधित कोंबडी पाय फाकवून चालते. पेरीटोनायटिस होऊन त्वचा व गलोल काळसर पडते.

निदान व उपचार ः

- मृत कोंबडीचे शवविच्छेदन केल्यानंतर आतड्यामध्ये कृमी आढळतात.

- आजारी कोंबड्यांची विष्ठा नियमितपणे तपासून घ्यावी.

- पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकांचा वापर करावा.

- गोगलगाय व ड्रॅगन माश्यांचे निर्मूलन करावे.

४) रक्ती हगवण (कॉक्सिडिओसिस) ः

- हा प्रोटोझोआमुळे होणारा आजार आहे. यामध्ये ८ ते ९ प्रकारच्या कॉक्सिडियाचा समावेश होतो.

- उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये आजाराचा प्रादुर्भाव वाढतो.

- साधारणपणे ६ ते ८ आठवडे वयाच्या कोंबड्या जास्त बळी पडतात.

- शेडमधील दमट, उष्ण व कोंदट वातावरण हे कॉक्सीडियाच्या वाढीसाठी पोषक असते.

- दूषित पाणी किंवा खाद्य यांच्या सेवनामुळे प्रादुर्भाव होतो.

- कॉक्सीडिया आतड्यात जाऊन बसतात. लहान व मोठ्या आतड्यात त्यांचे प्रथम, द्वितीय व तृतीय अशाप्रकारे अलैंगिक पद्धतीने प्रजनन होते. शेवटी लैंगिक पद्धतीने प्रजनन होऊन विष्ठेद्वारे अंडी बाहेर पडतात.

लक्षणे ः

- सुरुवातीला पातळ विष्टा होते. आतड्याला जखमा झाल्यामुळे रक्तमिश्रित विष्ठा होते.

- चोच, पाय, तुरा, गलोल इत्यादी भाग पांढुरके दिसतात.

- लहान व मोठ्या आतड्यावर सूज येऊन रक्त साकाळते.

- वाढ खुंटते, वजनात घट येते. कोंबडी मलूल पडते.

- शरीरातील पाण्याचे व क्षारांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कोंबडी अशक्त होते.

- वेळीच उपचार न झाल्यास ३ ते ४ दिवसांत शेडमधील सर्वच कोंबड्यांची मरतुक होते.

निदान व उपचार ः

- कोंबडीच्या विष्ठेचे नमुने तपासून घ्यावेत. शेडमध्ये रोगाचा संसर्ग झाल्याची शंका आल्यास कोंबडीची विष्ठा वारंवार गोळा करून जाळून टाकावी.

- बाधित कोंबडीचे शवविच्छेदन केल्यास, आतड्यात कॉक्सिडिया आढळून येतात. त्यामुळे पुढील मरतुक रोखता येते.

- आजारी कोंबडीची विष्ठा तपासून व मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.

आजाराची बाधा टाळण्यासाठी काळजी ः

- शेड नेहमी कोरडे, स्वच्छ व हवेशीर ठेवावे.

- शेडमधील गादी जास्त ओली होणार नाही याची दक्षता घ्यावी. गादीमध्ये साधारण १५ ते २५ टक्के या दरम्यान ओलावा असावा.

- गादीसाठी वापरलेल्या तुसाची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.

- नवीन बॅच घेण्यापूर्वी शेडमध्ये पोटॅश व फोर्मेलीनचा धूर करावा.

- पाणी व खाद्याची भांडी स्वच्छ ठेवावीत.

- शेडमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी

- मोठ्या कोंबड्या, लहान पिलांचे स्वतंत्र व्यवस्थापन करावे.

- आजारी कोंबडी वेगळी ठेवावी.

- कोबड्यांना नियमित जंतनाशकांची मात्रा द्यावी. त्यानंतर लसीकरण करून घ्यावे.

- कोंबड्यांमध्ये आजाराची लक्षणे दिसताच त्वरित पशुवैद्यकांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.

- खाद्यामध्ये रोग प्रतिबंधक औषधांचा अंतर्भाव असल्याची खात्री करावी.

डॉ. कुलदीप देशपांडे, ८००७८६०६७२, (पशुपोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

डॉ. आर. सी. कुलकर्णी, ७७७६८७१८००, (कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT