ॲग्रो गाईड

Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी हिरवळीची पिके

टीम ॲग्रोवन

डॉ. अर्चना कवडे, अभिजित पवार

-----------------------------

हिरवळीच्या खतांचा (Green Manuring Fertilizer) वापर करून मुख्य पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा (Nutrients Supply For Crop) आणि जमिनीची सुपीकता (Fertility Of Soil) या गोष्टी साध्य करू शकतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला हिरवळीच्या पिकांची (Green Manuring Crops) पेरणी करावी. पीक फुलोरा अवस्थेमध्ये जमिनीत गाडावे. यापासून जमिनीत सेंद्रिय घटकांची उपलब्धता होते. सेंद्रिय घटक जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म वाढवितात. उष्ण प्रदेशात जमिनीतून मुक्त होणारा कर्ब टिकून राहत नसल्यामुळे कमतरता जाणवते. त्यामुळे त्यांचे प्रमाण टिकवण्याकरिता जमिनीला नेहमी सेंद्रिय घटकांचा पुरवठा करणे आवश्यक असते.

मुळावर गाठी असलेली शेंगवर्गीय पिके तसेच मुळावर गाठी नसलेली पिके हिरवळीच्या खताकरिता निवडतात. मुळावरील गाठीतील जिवाणू वातावरणातील नत्राचे शोषण करून गाठीत स्थिर करतात. पिकांना उपलब्ध करून देतात. हिरवळीच्या पिकांचे अवशेष सेंद्रिय खत म्हणून उपलब्ध होतात. मात्र मुळावर गाठी नसलेल्या पिकामधून फक्त जमिनीला सेंद्रिय खत उपलब्ध होते.डाळवर्गीय पिकांमुळे जमिनीत नत्राचा पुरवठा होत असतो. पण यातून मिळणाऱ्या नत्राचे प्रमाण त्या पिकाची जात, शाकीय वाढ आणि जमिनीत गाडताना त्या पिकाचे वय या बाबीवर अवलंबून असते.

डाळवर्गीय पिकांमधून मिळणाऱ्या सेंद्रिय मूळ घटकांचे वजन आणि नत्राची टक्केवारी आणि एकरी मात्रा

अ.क्र.--- पीक --- ---शाकीय भागाचे सरासरी एकरी उत्पादन (किलो)---नत्राचे शेकडा प्रमाण---

एकरी मिळणारी नत्राची एकूण मात्रा (किलो)

१)---ताग ---८४६० ---०.४२ ---३९

२)---धैंचा---८०१०---०.४१ ---३५

३)---वाटाणा ---८०५० ---०.३५ ---२९

४)---गवार ---८०३५ ---०.३३ ---२७

५)---उडीद ---४७५० ---०.४० ---२२

६)---चवळी ---६०८० ---०.४८ ---२४

७)---हुलगा ---४०५० ---०.३२ ---१३

८)---लाख ---४८५० ---०.५३ ---२७

९)---मसूर ---२२५० ---०.६८ ---१६

१०)---बरसीम ---६१६० ---०.४२ ---२६

हिरवळीच्या खतांचे फायदे :

१) जमिनीचा पोत सुधारतो. वातावरणात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

२) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.धूप होत नाही. सूक्ष्म जिवाणूंचे प्रमाण वाढते.

३) जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढते.

पिकांचे गुणधर्म :

१. कमी कालावधीत वाढणारे आणि भरपूर पालेदार, हिरवेगार पीक असावे.

२. सुरवातीच्या काळात भरपूर वाढणारे असावे.

३. पिकांचे खोड कोवळे आणि लुसलुसीत असावे. यामुळे कुजण्याची क्रिया लवकर होते.

४. पीक द्विदल वर्गातील असावे, म्हणजे वातावरणातील नत्र स्थिर होण्यास मदत होते.

५. पिकांची मुळे खोलवर जाणारी असावीत. यातून जमिनीखालच्या थरातील अन्नद्रव्ये वरच्या थरांपर्यंत येतात.

६. पीक हलक्या जमिनीवर, कमी पाण्यावर जोमाने वाढणारे असावे.

खत तयार करताना :

१) पीक भरपूर वाढणारे असावे. रसरशीत व तंतूचे असावे, ते लवकर कुजते.

२) कोणत्याही जमिनीत वाढणारे आणि शेंगावर्गीय असावे.

३) पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडावे.

४) सिंचनाची सुविधा असावी, म्हणजे पीक वाढण्यास मदत होते.

हिरवळीची पिके ः

१) ताग :

- खरीप हंगामात याची लागवड करावी. ४५ ते ६० दिवसांत पीक दोन मीटर उंच वाढते.

- झाडांना भरपूर पाने आणि फांद्या असतात. त्यामुळे सेंद्रिय घटकांचे प्रमाण जास्त मिळते.

- फुलावर येण्यापूर्वी पिकांची गाडणी करावी. त्यानंतर जमिनीला ओलित करावे म्हणजे कुजण्याची क्रिया लवकर होते.

- या झाडापासून काही ठिकाणी दोरखंड बनविण्याकरिता वाख काढतात. त्याला बोरू म्हणतात. याचा बोरू शुभ्र पांढरा आणि त्यातील तंतू अधिक टिकाऊ असतात.

२) धैंचा :

- ४५ ते ६० दिवसांत पिकाची दोन मीटर वाढ होते. पाने बारीक व चिंचेच्या पानाप्रमाणे असतात. शेंगेचा आकार मेथीच्या शेंगेप्रमाणे लांब व गोल असतो. बियांचा मेथीच्या बियांसारखा असतो.

- यास तागापेक्षा जास्त फांद्या असतात. क्षारपड- चोपण जमिनीत हिरवळीचे पीक म्हणून लागवड केल्यास क्षारता कमी होते.

३) गवार :

- ४५ ते ६० दिवसांत १.५ ते २ फुटांपर्यंत वाढते. फुले येण्यापूर्वी जमिनीत गाडावे.

- कोरड्या वातावरणात चांगली वाढ होते.

४) चवळी :

- ५० ते ६० दिवसांत पीक १ ते १.५ फूट वाढते.

- पाने मोठी व खोड लुसलुशीत असते. खोडावर मोठ्या प्रमाणात फुटवे येतात.

- फुले येण्यापूर्वी पीक जमिनीत गाडावे, म्हणजे कुजण्याची क्रिया जलद होते.

५) उडीद, मूग :

- ही पिके चवळीप्रमाणे झुडपी वाढ होणारी आहेत. उभ्या पिकातील मधल्या पट्ट्यात हिरवळीचे खत म्हणून लागवड करावी.

हिरवळीच्या खतासाठी गिरीपुष्प, रुई ः

- हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प, रुईची झाडे बांधावर लावावीत. कोवळ्या फांद्या तोडून शेतात गाडाव्यात. कुजल्यावर त्यापासून सेंद्रिय घटकांचा पुरवठा होतो.

- एका गिरिपुष्प झाडापासून वर्षाला १५० ते २०० किलो ताजी पाने मिळतात. यामध्ये नत्राचे प्रमाण भरपूर असते. रुईच्या एका झाडापासून १० ते १२ किलो ताजी पाने मिळतात.

----------------------------------------------------------

संपर्क ः

- डॉ. अर्चना कवडे, ९५६२९०४७०३ (सहायक प्राध्यापिका, कृषिविद्या विभाग, श्री. वैष्णव इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चर, इंदूर, मध्य प्रदेश)

- अभिजित पवार, ९९६०३९२९९७ (सहायक प्राध्यापक, कृषी विस्तार शिक्षण विभाग, कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट, जि. सिंधुदुर्ग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT